Gold Mutual Fund investment process and benefits for long-term wealth creation: ‘गोल्ड म्युच्युअल फंड’ हा सोन्यासारख्या गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांवर आधारित व आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालणारा एक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीत नफा कमावण्यासाठी ही एक ‘सुवर्णसंधी’ ठरू शकते.
सोन्यात थेट गुंतवणूक
गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवलेले पैसे तो म्युच्युअल फंड फक्त थेट सोने किंवा सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवतो. त्यामध्ये मुख्यतः सोन्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स किंवा गोल्ड ETF सारख्या सोन्याशी संबंधित संसाधनांचा समावेश असतो. गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवलेले पैसे कोणत्याही परिस्थितीत सोन्याशी संबंधित साधनांखेरीज अन्य कुठल्याही साधनांमध्ये गुंतवले जात नाहीत, हे गोल्ड म्युच्युअल फंडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. यामुळे आपल्याला सोन्याच्या किमतीत झालेल्या चढ -उतारांचा फायदा मिळतो. त्यासाठी प्रत्यक्ष सोनं खरेदी करायची गरज पडत नाही.
गोल्ड म्युच्युअल फंड्सची कार्यपद्धती :
- १. गोल्ड म्युच्युअल फंड कंपनी विविध गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन एक ‘सोने गुंतवणूक निधी ‘ उभा करते.
- २. हा निधी वापरून कंपनी प्रत्यक्ष सोन्याची किंवा सोने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स किंवा गोल्ड ETF सारख्या सोन्याशी संबंधित संसाधनांची खरेदी करते.
- ३. इच्छूक गुंतवणूकदार हे त्या म्युच्युअल फंड कंपनीच्या शेअर्सची , इतर शेअर्स प्रमाणेच, खरेदी आणि विक्री करू शकतात.
- ४. बाजारात सोन्याच्या किमतीत होणाऱ्या चढ -उतारानुसार त्या निधीची किंमत बदलत राहते. जर सोन्याची किंमत वाढली तर त्या गोल्ड म्युच्युअल फंडची किंमत वाढते, पर्यायाने गुंतवणूकदाराने घेतलेल्या त्या म्युच्युअल फंडच्या युनिटची म्हणजे शेअरची किंमत वाढते. यावेळी गुंतवणूकदाराला फायदा होतो. उलट सोन्याची किंमत कमी झाली तर त्या फंडच्या शेअरची किंमत कमी होते. त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांला नुकसान सहन करावे लागते.
- ५. गुंतवणूकदार त्याच्या इच्छेनुसार शेअरची खरेदी -विक्री करू शकतो. त्यामुळे त्या शेअर्स मधून फायदा मिळायची शक्यता अधिक असते.
- ६. सोन्याची किंवा सोन्यासंबधीच्या संसाधनाची खरेदी करण्यासाठी तसेच जमा होत असलेल्या निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून ठराविक शुल्क घेते.

गोल्ड म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचे फायदे :
१. सुरक्षितता :
सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही नेहमीच अत्यंत सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. युद्ध , चलन फुगवटा, आर्थिक मंदी या सारख्या परिस्थिती मध्ये इतर बहुतेक सर्व शेअर्स किंवा मालमत्ता यांचे भाव घसरू लागतात. पण अशा परिस्थिती सुद्धा सोन्याचे भाव स्थिर राहतात किंवा उलट ते वाढू लागतात. त्यामुळे गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्या पोर्टफोलिओला नैसर्गिकरित्या, काही प्रमाणात स्थैर्य आणि सुरक्षा मिळते.
२. दीर्घकालीन नफा :
काही अनपेक्षित कारणांमुळे सोन्याशी संबंधित साधनांच्या भावात घट झाली तरी ती तात्पुरती असते. ती कारणे दूर झाल्यावर सोन्याची किंमत पुनः वाढते. बहुतेक वेळेस ती उसळी घेऊन पहिल्या पेक्षा सुद्धा अधिक होते. त्यामुळे गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक बहुतेक वेळेस दीर्घकालीन फायदाच देते.
३. शुद्धतेची पडताळणी करावी लागत नाही :
जेव्हा आपण सोन दागिने किंवा बिस्कीट यांच्या सारख्या भौतिक स्वरूपात खरेदी करतो तेव्हा त्या सोन्याची शुद्धता पडताळून पाहणं हे जिकिरीचं काम असतं. कधी कधी आपण खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता तपासून घेताना आपली गल्लत सुद्धा होऊ शकते. गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवल्यास आपल्याला सोन्याची शुद्धता तपासून घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे त्या तपासणीत चूक झाल्यास होणारं नुकसान टाळता येतं.
४. सांभाळण्याची जोखीम नसते :
भौतिक स्वरूपात खरेदी केलेलं सोनं सुरक्षितपणे सांभाळणं हा एक चिंतेचा असतो. घरी ठेवलेलं सोनं कायम सुरक्षित राहील, याची खात्री देता येत नाही. ते चोर किंवा अगदी घरातल्या नोकर- चाकरांपासून सुरक्षित ठेवणं हे एक आव्हान असतं . बँकेमध्ये लॉकर घेऊन सोनं सुरक्षित ठेवता येतं पण त्यासाठी कागदपत्रं किंवा तत्सम औपचारिक बाबींची पूर्तता करावी लागते. तसेच त्यासाठी अतिरिक्त खर्च सुद्धा येतो. गोल्ड म्युच्युअल फंडा मध्ये पैसे गुंतवल्यास सोन्याच्या सुरक्षिततेची चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
५. कमी भांडवलात सुद्धा गुंतवणूक करता येते:
प्रत्यक्ष सोन्यामध्ये गुंतवणूक करताना किमान वजनाचे सोने , मग ते एक किंवा अर्धा ग्रॅम इतक्या कमी वजनाचे का असेना , खरेदी करावे लागते. सोन्याचा दर मुळातच खूप महाग असल्याने या कमी वजनाच्या सोन्यासाठी सुद्धा मोठी रक्कम द्यावी लागते. सामान्य गुंतवणूकदाराला ते प्रत्येक वेळी साध्य होतेच असे नाही. गोल्ड म्युच्युअल फंडा मध्ये ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजे SIP च्या माध्यमातून अगदी लहान आणि स्वतःला शक्य होईल तितक्या रकमे पासून गुंतवणुकीला सुरवात करता येते. त्य्यामूळे लहान गुंतवणूकदारांसाठी तो एक चांगला पर्याय ठरतो.
६. गरजेनुसार वेळेवर परतावा मिळतो :
रोख पैशाची गरज पडली आणि पैसे उभे करण्याची वेळ आली तर प्रत्यक्ष सोन विकून मिळणारे पैसे हे सोन्याच्या त्यावेळच्या बाजार भावापेक्षा बरेच कमी असतात. तसेच समजा आपली गरज कमी म्हणजे दहा हजार रुपये असली आणि आपल्या जवळचा दागिना वीस हजार रुपयांचा असला, तर आपल्याला तो संपूर्ण दागिनाच विकावा लागतो. गोल्ड म्युच्यअल फंडाच्या बाबतीत मात्र आपल्याला गरज आहे तेवढेच पैसे रीडिम करता येतात. त्यामुळे बाकीची गुंतवणूक अबाधित राहते. गोल्ड म्युच्युअल फंडातील आपल्या भागाची विक्री कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रियेशिवाय, सहजतेने करता येते.
७. व्यावसायिक व्यवस्थापन :
गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवलेल्या पैशांचं व्यवस्थापन कुशल फंड मॅनेजर्स करतात. त्यामुळे आपल्याला बाजारभावाचा मागोवा घेत राहण्याची गरज पडत नाही. तसेच हे मॅनेजर्स अनुभवी आणि त्यांच्या कामात कुशल असल्यामुळे त्या गुंतवणुकीतून आपल्याला अधिक नफा होण्याची शक्यता असते.
८. भावनिक तणाव येत नाही :
आपल्या जवळच्या सोन्याच्या जवळपास सगळ्याच दागिन्यांशी आपली काही या काही भावनिक जवळीक असते. काही दागिने आपल्याकडे आपल्या आई वडिलांच्या वारसाने आलेले असतात , काही आपण एखाद्या शुभ प्रसंगी खरेदी केलेले असतात तर काही आपल्याला जवळच्या व्यक्तीने भेट दिलेले असतात. त्यामुळे वेळप्रसंगी ते दागिने विकताना आपल्याला भावनिक त्रास होऊ शकतो. या उलट गोल्ड म्युच्युअल फ़ंड मध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे व्यवहारी दृष्टीने केलेली असते. त्यामुळे ती मोडून त्यातून पैसे उभे करताना भावनिक त्रास होत नाही .
गोल्ड म्युच्यअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यातील जोखीम :
इतर गुंतवणुकांप्रमाणेच गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यात सुद्धा काही जोखीम असते .:
१. बाजारातील चढ उतारांची जोखीम:
जागतिक राजकीय घडामोडी , त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आणि त्यामुळे सोन्याच्या मागणी आणि पुरवठ्यात होणारे बदल यामुळे सोन्याच्या किमतीत चढ -उत्तर होत असतात. त्यामुळे गोल्ड फंडाची किंमत आणि परिणामी ,त्याच्या युनिट म्हणजे शेअरच्या भावामध्ये सुद्धा बदल होत असतात. त्यातून कधीतरी गुंतवणूकदारांना सुद्धा नुकसान सहन करावे लागू शकते.
२. इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढीची जोखीम :
जेव्हा चलनाचे मूल्य कमी होते तेव्हा सोन्याची किंमत वाढते. वाढलेली सोन्याची किंमत हे एकप्रकारे चलनवाढी विरुद्ध संरक्षण असते. हे सर्व घडताना त्या मागे बरीच गुंतागुंतीची आकडेमोड आणि प्रक्रिया झालेली असते. सामान्य गुंतवणूकदार त्या बाबतीत अनभिज्ञ असतो. त्यामुळे त्याला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
३. फ्युचर काँट्रॅक्टस म्हणजे भविष्यातील कराराची जोखीम :
काही म्युच्युअल फंड भविष्यात सोन्याची किंमत काय असेल याचा अंदाज बांधून त्यानुसार सोन्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. यामध्ये सोन्याची किंमत त्यावेळच्या अपेक्षित किमती पेक्षा वेगळी झाली , किंवा त्यावेळी गोल्ड म्युच्युअल फंड कंपनी तिने मान्य केलेलं सोन किंवा पैसे चुकते करू शकली नाही तर त्या म्युच्युअल फंडाची किंमत कमी होते. त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसतो.
४. व्यवस्थापकीय जोखीम:
गोल्ड म्युच्युअल फंड कंपनीचं यश किंवा अपयश हे प्रामुख्याने त्या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या निर्णयांवर अवलंबून असतं. जर त्या व्यवस्थापनाने जाणते -अजाणतेपणी काही चुकीचे निर्णय घेतले किंवा काही पक्षपातीपणा केला तर म्युच्युअल फंडाची किंमत कमी होते. या निर्णयावर सामान्य गुंतवणूकदारांचा कोणताही ताबा नसतो. तरीही कंपनीच्या व्यवस्थापनाच्या चुकीचा भूर्दंड सामान्य गुंतवणूकदाराला भरावा लागतो. तसेच काही गोल्ड म्युच्यअल फंड कंपन्या त्या देत असलेल्या सेवेसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त शुल्क आकारतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा नफा कमी होतो.
सोन्यामधील गुंतवणूक ही पारंपरिकदृष्ट्या सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणूक आहे. त्या गुंतवणुकीला आता आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान यांची जोड मिळाल्यामुळे ती पारंपरिक गुंतवणूक आता अधिक सहज, किफायतशीर आणि सुरक्षित झाली आहे. ‘गोल्ड म्युच्युअल फंड’ हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एक प्रभावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ लाभलेला उत्तम पर्याय आहे.
पुढील भागात आपण भारतात कोणते गोल्ड म्युच्यअल फंड उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करावी याविषयी सविस्तर चर्चा करू.
