Gold price drop Dhanteras 2026 Marathi: धनत्रयोदशी अवघ्या काही दिवसांवर आली असताना सोन्याच्या दरात झालेली मोठी घसरण ग्राहकांसाठी काहीशी दिलासादायक ठरली आहे. जानेवारीमध्ये १० ग्रॅममागे सुमारे १.८० लाख रुपयांचा विक्रमी टप्पा मिळवणारं सोनं आता जवळपास २० टक्क्यांनी कमी दरात मिळणार आहे. अलीकडील व्यवहारांमध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर १० ग्रॅममागे सुमारे १.४२ लाख रुपयांवर आला आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना पुन्हा एकदा संधी मिळते आहे. दर कमी झाल्याने सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढत असून, ६ नोव्हेंबरच्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साहही दिसून येत आहे.

सोन्याच्या दरातील या घसरणीचा परिणाम, धनत्रयोदशीच्या काळात सोन्याच्या विक्रीच्या प्रमाणात मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी वाढ होऊ शकते असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे. मात्र, सध्याची वेळ सोनं खरेदी करण्यासाठी योग्य आहे का, की सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे? पैशांची गुंतवणूक दागिन्यात करावी की सोनं खरेदी करण्यात? त्याचबरोबर, सोन्याच्या दरातील चढ-उतारांचा विचार करता ग्राहकांनी किती जोखीम पत्करावी? – असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. 

भू-राजकीय तणाव कायम; तरी सोन्याच्या दरात घसरण?

जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता किंवा आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली असता, गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात, त्यामुळे अशा काळात सोन्याची मागणी आणि दर वाढणं स्वाभाविक आहे. मात्र, सध्याच्या घडामोडींमध्ये हे चित्र काहीसं बदललेलं दिसतं.

अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदार सोन्याऐवजी सरकारी रोख्यांकडे वळत आहेत. याचं गणित अगदी सोपं आहे – सोन्यातून नियमित व्याज मिळत नाही, तर रोख्यांमधून ठराविक परतावा मिळतो. त्यातच अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले असून, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेची सेंट्रल बँक व्याजदर वाढवू शकते. डॉलर मजबूत झाल्यानेही सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे. 

‘वेल्थ१’चे संस्थापक नरेंद्र अग्रवाल यांच्या मते,

“अमेरिकेतील १० वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील परतावा ४.९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यातच ३० ऑक्टोबरला एआय आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी सोनं विकायला सुरुवात केली. परिणामी, एका दिवसात सोन्याचे दर ३.६ टक्क्यांनी घसरले. मात्र, जगभरातील सेंट्रल बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी आणि जागतिक अनिश्चितता यामुळे भविष्यात सोन्याच्या दरांचा पुन्हा आधार मिळू शकतो.”

ही सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का?

सोन्याचे भाव स्वस्त झाले म्हणून ही सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आहे, असा ग्राहकांचा समज होणं साहजिक आहे. मात्र, दर आणखी घसरणार नाहीत याची खात्री देता येत नाही. जागतिक अस्थिरता आणि सेंट्रल बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी यामुळे पुढील सहा ते बारा महिन्यांत दरांना आधार मिळू शकतो. मात्र, अमेरिकेतील व्याजदर महागाई आणि डॉलरची स्थिती यावर सोन्याची पुढील वाटचाल अवलंबून असेल. 

नरेंद्र अग्रवाल यांच्या मते,

“पुढील तीन ते पाच वर्षांचा विचार करणाऱ्यांसाठी सध्याची घसरण खरेदीची संधी ठरू शकते. मात्र, दरांचा नेमका तळ गाठणं कठीण असल्याने गुंतवणुकीपैकी १० ते १५ टक्के रक्कम सोन्यात ठरू शकते. मात्र, सण किंवा लग्नासाठी दागिने खरेदी करणं आणि गुंतवणुकीसाठी सोनं घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे खरेदी करण्यासाठी आपला उद्देश आणि आर्थिक क्षमता लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.” 

धनत्रयोदशीला दागिने, नाणी की गोल्ड ईटीएफ खरेदी करावं?

सोनं खरेदी करताना केवळ दर किती कमी झाले आहेत, एवढाच विचार पुरेसा नाही. आपल्याला सोनं कशासाठी हवं आहे, यानुसार खरेदीचा पर्याय निवडणं आवश्यक आहे.

बडजाते वेल्थचे सहयोगी फंड व्यवस्थापक मंगेश नरनवरे यांच्या मते,

“लग्नासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी दागिने खरेदी करणं योग्य ठरू शकतं. मात्र, दागिने घेताना घडणावळ (Making Charges) आणि पुन्हा विक्री करताना होणारी कपात लक्षात घेऊन मगचं सोनं खरेदी करावं. सोनं मालकीच्या स्वरूपात ठेवायचं असल्यास नाणी किंवा सोन्याच्या विटा हा पर्याय असू शकतो. त्यात दागिन्यांच्या तुलनेत घडणावळीचा खर्च कमी असतो.”

दुसरीकडे, केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने सोनं खरेदी करायचं असल्यास गोल्ड ईटीएफ हा पर्याय सोयीचा ठरू शकतो. यात प्रत्यक्ष सोनं साठवून ठेवण्याची किंवा त्याच्या शुद्धतेची काळजी करण्याची गरज नसते. सध्याच्या अस्थिर बाजारपेठेत एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. त्याचप्रमाणे संपूर्ण गुंतवणूक केवळ सोन्यात न करता विविध पर्यायांमध्ये विभागून ठेवणं अधिक योग्य ठरेल, असं नरनवरे सांगतात.

सोन्याचे दर कमी झाल्याने यंदा सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ आणि लग्नसराईसाठी दागिन्यांच्या आगाऊ नोंदणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांनी सीएनबीसी-टीव्ही१८ला दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीला आणि शुभ मुहूर्तावर दागिने खरेदी करण्याची भारतीयांची परंपरा यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे. लग्नसराईत एका ग्राहकाकडून होणारी सरासरी खरेदी सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत राहण्याचा त्यांचा अंदाज आहे. लग्नसराईच्या मुख्य काळात विक्रीत १५ ते २० टक्क्यांची वाढ होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

कटारिया ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी यश कटारिया यांच्या मते,

“ग्राहक दागिने खरेदी करताना आता वजन आणि किमतीचा अधिक विचार करत आहेत, त्यामुळे हलक्या वजनाचे कानातले, ब्रेसलेट, नाजूक नेकलेस आणि पारंपरिक नक्षीकामासोबत आधुनिक शैलीचा मिलाफ असलेल्या दागिन्यांना पसंती मिळू शकते.”

कॅरेटलेनच्या मुख्य विपणन अधिकारी शैफाली गौतम यांच्या मते, यंदाच्या सणासुदीच्या काळात विविध प्रकारचे ग्राहक दागिन्यांच्या खरेदीसाठी पुढे येऊ शकतात. पहिल्यांदाच हिऱ्यांचे दागिने खरेदी करणारे ग्राहक तसेच मोठ्या किमतीचे सॉलिटेअर हिरे घेणारे ग्राहक यांचाही त्यात समावेश असेल.

दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी किंवा विटा खरेदी करणं हाही एक पर्याय आहे. मात्र, त्यासाठी द्यावी लागणारी अतिरिक्त किंमत, सोन्याची शुद्धता, सुरक्षित साठवणूक आणि पुन्हा विक्री करताना मिळणारी किंमत या गोष्टी तपासणं आवश्यक आहे.

गोल्ड ईटीएफमध्ये सोनं खरेदी न करता सोन्याच्या किमतीतील बदलांनुसार गुंतवणूक करता येते. यात दागिन्यांप्रमाणे घडणावळीचा खर्च नसतो आणि सोनं साठवण्याचीही चिंता नसते. गरजेनुसार शेअर बाजारातील व्यवहाराच्या दिवशी त्याची विक्री करता येते.

नरेंद्र अग्रवाल यांच्या मते,

“गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ हा अधिक सोयीचा पर्याय आहे. मात्र, गोल्ड फंड ऑफ फंड्समध्ये नव्याने गुंतवणूक करण्यावर सेबीच्या निर्देशांनुसार मर्यादा आल्याने, डिमॅट खात्याच्या माध्यमातून थेट एक्स्चेंजवर गोल्ड ईटीएफ खरेदी करण्याचा पर्याय गुंतवणूकदार वापरू शकतात.”

भारतातील सोन्याच्या मागणीत घट होणार का?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारतातील सोन्याची मागणी ६५० टनांपर्यंत घसरू शकते. २०२० नंतरची ही सर्वात कमी पातळी असेल. जुलै ते सप्टेंबर यादरम्यान सोन्याची मागणी २९ टक्क्यांनी घटली. वाढलेले दर, महागाई आणि ग्रामीण भागातील उत्पन्नावरील दबाव ही त्यामागील प्रमुख कारणं आहेत. भारतातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी निम्म्याहून अधिक मागणी ग्रामीण भागातून येते, त्यामुळे दरवाढीचा परिणाम या भागातील खरेदीवरही झाला आहे.

मात्र, दिवाळी आणि लग्नसराईमुळे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. नरेंद्र अग्रवाल यांच्या मते,

“२० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे खरेदीला चालना मिळू शकते. तरीही सोन्याच्या दरांची पुढील दिशा अमेरिकेतील व्याजदर आणि डॉलरवर अवलंबून असेल. अमेरिका व्याजदर वाढवत नसेल किंवा अमेरिका-इराण संघर्ष निवळून तेलाचे दर कमी झाले तर सोन्याला आधार मिळू शकतो.”

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

केवळ दर कमी झाले आहेत म्हणून सोनं खरेदी करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे : 

दागिने खरेदी करताना : 

  • दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्क आणि एचयूआयडी क्रमांक असल्याची खात्री करावी.
  • सोन्याची शुद्धता आणि घडणावळीचे शुल्क तपासावे.
  • भविष्यात दागिने परत विकताना किंवा बदलून घेताना लागू होणाऱ्या अटी समजून घ्याव्यात.

सोन्याच्या दरांतील महत्त्वाच्या पातळ्या : 

  • देशांतर्गत बाजारात १० ग्रॅममागे १.३० लाख ते १.३२ लाख ५०० रुपये ही आधार पातळी ठरू शकते.
  • १.४५ लाख ते १.५० लाख रुपये ही प्रतिरोधक पातळी आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात ३,५०० ते ३,५५० डॉलर ही घसरणीच्या दृष्टीने महत्त्वाची पातळी आहे.
  • दीर्घकालीन परिस्थितीत सोन्याचा दर ५,१०० डॉलरपर्यंत जाऊ शकतो, असा मंगेश नरनवरे यांचा अंदाज आहे.

संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करावी, त्यामुळे दरातील चढ-उतारांचा धोका कमी होऊ शकतो.

सोन्याच्या दरांत पुढे कोणते बदल : 

  • अमेरिकेतील व्याजदरांचा दबाव कमी झाला आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी वाढली, तर दर सावरण्याची शक्यता आहे.
  • डॉलर मजबूत राहिला, महागाई कायम राहिली आणि अमेरिकेतील व्याजदर उच्च पातळीवर राहिले, तर सोन्याच्या दरातील घसरण आणखी काही काळ सुरू राहू शकते.

सध्याची घसरण खरेदीची संधी असली तरी भविष्यात दर आणखी कमी होतील की वाढतील हे निश्चितपणे सांगता येत नाही.