युद्धजन्य परिस्थिती, भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, या बाबी पारंपरिकदृष्ट्या सोन्यासाठी अनुकूल मानल्या जातात. मात्र, पश्चिम आशियात संघर्ष सुरु असतानाही सोन्याच्या दरात अलीकडे घसरण झाली आहे. त्यामुळे संकटाच्या काळातील सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याची भूमिका बदलत आहे का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.
सोन्याच्या दरात चढ उतार कसा?
गेल्या दोन महिन्यांत जळगावमधील प्रसिद्ध सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांपासून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्वांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात दिवसागणिक चढ उतार होत असतानाही महिनाअखेरीस २४ कॅरेट सोन्याच्या दरात १३ हजारांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेत, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढलेला कल आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात तेजीचा कल कायम राहिला. मात्र, सप्टेंबरमध्ये परिस्थिती काहीशी बदलली. महिनाभर सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार सुरू राहिले. काही दिवस दरात मोठी वाढ झाली, तर त्यानंतर अचानक घसरणही पाहायला मिळाली. महिनाअखेरीस २४ कॅरेट सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांपेक्षा अधिक घट झाल्याचे चित्र दिसून आले.
गुंतवणूकदार सोन्यापासून दूर?
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरातील अलीकडील घसरण पाहता गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवली आहे, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. सोन्याच्या किंमतीवर अल्पकालीन दबाव असला तरी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अद्याप कायम आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, चलनवाढीची शक्यता आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदार सोन्याचा विचार पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी करत आहेत. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अंदाजानुसार, २०२६मध्ये सोन्याच्या मागणीला गुंतवणूक क्षेत्राकडून महत्त्वाचा आधार मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः आशियाई बाजारपेठांमध्ये सोन्याची गुंतवणूक मागणी कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारातील सध्याची घसरण ही सोन्यावरील विश्वास पूर्णपणे कमी झाल्याचे लक्षण मानता येणार नाही. मात्र गुंतवणूकदारांचा सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे दिसते. पूर्वी जागतिक संघर्ष किंवा आर्थिक संकटाची बातमी आली की सोन्याच्या दरात वाढ होईल, अशी साधारण अपेक्षा केली जात होती. आता मात्र चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अमेरिकेतील व्याजदर, डॉलरची दिशा, रोख्यांवरील परतावा, महागाईचे संकेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती यांचा सोन्याच्या दरावर तितकाच प्रभाव पडत आहे.
सोन्याऐवजी इतर पर्यायांचा विचार?
सोन्याच्या दरातील सततच्या चढ-उतारामुळे काही गुंतवणूकदार अधिक परतावा मिळवून देणाऱ्या पर्यायांकडे वळू शकतात. मात्र याचा अर्थ सोन्यातील गुंतवणूक पूर्णपणे संपुष्टात येत आहे, असा होणार नाही. गुंतवणूकदार आता एकाच मालमत्तेवर अवलंबून राहण्याऐवजी सोने, समभाग, रोखे आणि अन्य मालमत्तांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पाश्चिमात्य बाजारपेठांमध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणुकीवर वास्तविक व्याजदर, डॉलर आणि चलनविषयक धोरणाचा प्रभाव अधिक जाणवतो. दुसरीकडे, आशियाई बाजारात प्रत्यक्ष सोन्याची मागणी, दागिने आणि बचतीच्या पारंपरिक पद्धती यामुळे सोन्याला वेगळा आधार मिळतो. त्यामुळे ‘युद्ध सुरु म्हणजे सोन्याचे दर वाढणार’ हे समीकरण आता तितके सरळ राहिलेले नाही. सोन्याच्या दरात अलीकडील काळात झालेली अल्पकालीन घसरण ही गुंतवणूकदारांनी सोन्याला नाकारल्यापेक्षा, बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांच्या गुंतवणूक धोरणात होत असलेल्या बदलाचे प्रतिबिंब मानता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मजबूत डॉलरचा सोन्याला फटका?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रामुख्याने डॉलरमध्ये ठरवली जाते. त्यामुळे डॉलर मजबूत झाला की इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत सोन्याची किंमत तुलनेने महाग होते. परिणामी, डॉलरबाहेरील देशांतील गुंतवणूकदारांची सोन्याची खरेदी कमी होऊ शकते आणि त्याचा दबाव आंतरराष्ट्रीय सोन्याच्या दरावर येतो. याशिवाय डॉलर मजबूत होण्यामागे अनेकदा अमेरिकेतील उच्च व्याजदर किंवा व्याजदर आणखी वाढण्याच्या अपेक्षा कारणीभूत असतात. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना अमेरिकी सरकारी रोखे किंवा डॉलरमधील अन्य व्याज देणाऱ्या साधनांमधून आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता वाढते. सोने मात्र व्याज किंवा लाभांश देत नसल्याने त्याची तुलनात्मक आकर्षकता कमी होऊ शकते. भारतासारख्या देशामध्येही त्याचा परिणाम आणखी वेगळ्या पद्धतीने जाणवतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी झाला तरी रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण होत असेल, तर देशांतर्गत सोन्याच्या दरातील घसरण मर्यादित राहते. त्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी केवळ आंतरराष्ट्रीय सोन्याचा दर नव्हे, तर डॉलर-रुपया विनिमय दर देखील महत्त्वाचा ठरतो.
केंद्रीय बँकांच्या खरेदीचा सोन्याला आधार?
सोन्याच्या दीर्घकालीन मागणीसाठी केंद्रीय बँका अजूनही महत्त्वाचा आधार ठरत आहेत. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या आकडेवारीनुसार, २०२६च्या दुसऱ्या तिमाहीत केंद्रीय बँकांनी २८९ टन सोने खरेदी केले आहे. चीन आणि पोलंडसह काही केंद्रीय बँकांनीही सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे. केंद्रीय बँकांसाठी सोन्याची भूमिका अल्पकालीन नफ्यापेक्षा परकीय चलनसाठ्याचे विविधीकरण आणि आर्थिक भू-राजकीय जोखमीपासून संरक्षण अशी आहे. त्यामुळे बाजारातील अल्पकालीन घसरण आणि सोन्याची दीर्घकालीन मागणी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तज्ज्ञांच्या मते एकूण चित्र लक्षात घेता सध्याच्या घडामोडींवरून सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या भूमिकेचे स्वरूप बदलले आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
patil.jitendra@expressindia.com
