Gold Prices Falling सलग काही महिने सोन्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १५,४२० रुपये प्रति ग्रॅम, २२ कॅरेटसाठी १४,१३५ रुपये व १८ कॅरेटसाठी ११,५६५ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला. सोन्याच्या किमतींमधील ही मोठी घसरण मानली जात आहे. सोन्याच्या या अस्थिर दरांमुळे लग्नसराईत दागिने खरेदी करणारी कुटुंबे, डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणारे छोटे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. आता गुंतवणूक करावी, सोनेकधी खरेदी करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत बदल का होत आहेत? सोन्याची खरेदी-विक्री कधी करावी? गुंतवणूक कशी करावी? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात…

जागतिक स्तरावर किमतीत बदल का होत आहेत?

सोन्याच्या दरातील ही घसरण एकाएकी झालेली नाही. अमेरिका आणि चीनमधील सुट्यांच्या हंगामामुळे व्यापारातील हालचाल मंदावली आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा सहभाग कमी झाला आणि किमतींवरील दबाव वाढला आहे. तसेच, अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर चलन वापरणाऱ्या खरेदीदारांसाठी सोने महाग झाले आहे आणि परिणामी जागतिक मागणी घटली आहे. त्याच वेळी अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीमुळे सोने आणि चांदी यांसारख्या सुरक्षित मालमत्तांचे आकर्षण कमी झाले आहे. व्याजदर स्थिर राहतील या अपेक्षेमुळे कोणताही परतावा न देणाऱ्या वस्तूंमधील गुंतवणूकही कमी झाली आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत सोन्याचे दर प्रति औंस ४,९३० ते ४,९५० डॉलरदरम्यान आहेत.

मुंबईस्थित इन्व्हेस्टमेंट कंपनी ‘INVasset PMS’चे बिझनेस हेड हर्षल दसानी म्हणतात, “सोन्याने ऐतिहासिकदृष्ट्या मोठ्या तेजीच्या काळातही अनेकदा मध्यम स्वरूपाची घसरण पाहिली आहे. “यापूर्वी अनेकदा किमती पुन्हा वाढण्यापूर्वी १० ते २० टक्के घसरण होणे सामान्य होते. उदाहरण द्यायचे झाल्यास जागतिक बाजारपेठेत शिथिलता असताना, नवीन उच्चांक गाठण्यापूर्वी सोन्याचे दर अनेकदा वेगाने खाली आले आहेत.” ते पुढे सांगतात, “गुंतवणूकदारांनी हे समजून घेतले पाहिजे की, सोन्यात अस्थिरता असणारच आहे आणि ही घसरण या प्रक्रियेचाच एक भाग आहे.” जगभरातील मध्यवर्ती बँकाही काही वर्षांपासून सोन्याच्या मोठ्या खरेदीदार राहिल्या आहेत. मात्र, त्यांच्या खरेदीच्या पद्धतीत झालेला छोटासा बदलही मोठा परिणाम करू शकतो.

सोन्याच्या दरात आणखी घसरण होईल का?

गेल्या महिन्यात भारतातील सोन्याच्या दराने १.७५ लाख रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. ‘Multifyi’ या शेअर बाजार सल्लागार फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन राठोड म्हणाले की, मोठ्या वाढीनंतर सोन्यात अल्पकालीन घसरण दिसून येते. “हे बाजाराचे सामान्य वर्तन आहे. सोन्याचे दर अमेरिकेतील व्याजदर, महागाई, डॉलरची मजबुती व जागतिक अनिश्चितता यांवर अवलंबून असतात. जेव्हा व्याजदर जास्त राहतात किंवा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोने थोडे घसरू शकते. ऐतिहासिकदृष्ट्या मोठ्या तेजीनंतर सोने अनेकदा पाच ते १० टक्के खाली येते. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की, सोन्यामध्ये अल्पकालीन अस्थिरता सामान्य आहे,” असेही त्यांनी सांगितले.

सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का?

दागिन्यांची खरेदी आणि गुंतवणुकीचा निर्णय या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या निकषांवर ठरतात. दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस, डिझाइन प्रीमियम व पुनर्विक्रीच्या वेळी होणारी कपात यांमुळे मिळणारा परतावा कमी होतो. लग्नासाठी एखादा दागिना खरेदी करण्याची भावना सौंदर्याशी संबंधित आहे; गुंतवणुकीच्या फायद्याशी निगडित नाही.

दुसरीकडे, सोन्याची नाणी आणि बिस्किटांमध्ये पारदर्शकता असते; पण तिथे सुरक्षा आणि साठवणुकीचा प्रश्न येतो. डिजिटल गोल्डमध्ये प्रत्यक्ष हाताळणीची गरज नसते; पण ते प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता आणि नियमांवर अवलंबून असते. ‘ईटीएफ’ व ‘सॉव्हेरिन गोल्ड बाँड्स’सारख्या पर्यायांमध्येही किमतीतील वाढीबरोबरच व्याजही मिळते. प्रत्येक पर्यायाची स्वतःचे जोखीम, कर नियम आणि फायदे आहेत. हा फरक समजून घेतल्यास खरेदी आणि आर्थिक धोरण यांची गल्लत होणार नाही.

हर्षल दसानी पुढे म्हणतात, “सोने हा केवळ वेगाने नफा मिळवण्याचा मार्ग नसून, जागतिक अनिश्चितता आणि चलनातील अस्थिरतेपासून संरक्षण देणारा पर्याय आहे. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोने कमी असेल, तर हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अर्थपूर्ण ठरते. मात्र, मोठ्या तेजीनंतर एकदम मोठी रक्कम गुंतवणे जोखमीचे ठरू शकते. तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या १०-१५ टक्के वाटा सोन्यात असावा.”

दर्शन राठोड सांगतात की, सोने ही स्थैर्यासाठी वापरली जाणारी दीर्घकालीन मालमत्ता आहे. ते म्हणतात, “सर्व पैसे एकाच वेळी गुंतवण्याऐवजी, टप्प्याटप्प्याने खरेदी केल्यास किमतीच्या जोखमीचे व्यवस्थापन होते. तज्ज्ञ पाच ते १५ टक्के गुंतवणूक सोन्यात ठेवण्याचा सल्ला देतात. किमती जास्त असतानाही टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणूक सरासरी खर्च कमी करण्यास मदत करते.”

सोने कधी विकावे?

राठोड सांगतात की, सोने विकण्याचा निर्णय हा तुमच्या आर्थिक गरजा आणि गुंतवणुकीच्या संतुलनावर अवलंबून असावा. ते सांगतात, “जर किंमत वाढल्यामुळे तुमच्या एकूण गुंतवणुकीत सोन्याचा वाटा खूप वाढला असेल, तर थोडा नफा मिळवणे योग्य ठरू शकते. तसेच नियोजित खर्चासाठी सोने विकणे योग्य आहे.” मात्र, थोड्या घसरणीमुळे घाबरून सोने विकण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोन्याचा वापर दीर्घकालीन स्थैर्यासाठी केला जातो. त्यामुळे विक्रीचा निर्णय आर्थिक उद्दिष्टांवर आधारित असावा. हर्षल दसानी यांनीही असेच मत व्यक्त केले. ते म्हणतात, “जर सोन्याचे दर खूप वाढले असतील आणि ते तुमच्या ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाले असेल, तर काही प्रमाणात विक्री करणे शहाणपणाचे आहे. मात्र, जागतिक अनिश्चिततेच्या काळात पूर्णपणे गुंतवणूक थांबवणे योग्य नाही.”

सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे का?

मध्यमवर्गीयांसाठी सोन्याच्या घसरणाऱ्या किमती लग्नसराई किंवा सणासुदीत खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र, जास्त दरात सोने खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तात्पुरते कमी झाल्याची चिंता वाटू शकते. सध्या गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष सोन्याव्यतिरिक्त गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड व सॉव्हेरिन गोल्ड बाँड्स असे अनेक कार्यक्षम पर्याय उपलब्ध आहेत. एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी महिनाभरातील पद्धतशीर गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.