Gold prices and china connection सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. सोन्याचे दर इतके वाढले आहेत की, सर्वसामान्यांनी सोने कसे खरेदी करावे अशी चिंता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांत सोन्याच्या दरात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा पडल्याने आता गुंतवणूकदारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की, भविष्यात सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढणार की घसरणार? आता एक नवा अहवाल समोर आला आहे. या अहवालात सोन्याच्या किमती वाढतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या वाढीचा आणि चीनचा संबंधदेखील अधोरेखित करण्यात आला आहे. या अहवालात नक्की काय? चीनमुळे सोने आणखी महागणार का? अमेरिकेने चीनवर काय आरोप केले? जाणून घेऊयात…
नवीन अहवाल काय सांगतो?
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२५ मध्ये चीनमधील कुटुंबांनी सुमारे ४३२ मेट्रिक टन सोन्याची नाणी आणि विटांची खरेदी केली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी अधिक आहे. मुख्य म्हणजे जागतिक स्तरावरील एकूण खरेदीच्या जवळपास एक तृतीयांश वाटा एकट्या चीनचा आहे. सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असूनही, चिनी ग्राहक आपल्या गुंतवणुकीच्या धोरणाबाबत ठाम आहेत. या अहवालात एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेने म्हटले आहे की, “मी अजूनही सोन्याबाबत सकारात्मक आहे, कारण मला वाटते की सोने ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम आहे.” पगार आणि जागतिक भू-राजकीय अस्थिरता ही सोने खरेदीमागची मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले.
चीनमधील अनेक कुटुंबांसाठी संपत्ती जपून ठेवण्याकरिता फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. देशांतर्गत मालमत्ता बाजार मंदावला आहे, शेअर बाजार अस्थिर आहे आणि बँकांमधील व्याजदरही कमी आहेत. या परिस्थितीमुळे महिलांपासून तरुण पिढीपर्यंत सर्वच जण सोने खरेदीकडे वळले आहेत. जागतिक धातू बाजारातील तेजीमध्ये चीन एक शक्तिशाली घटक म्हणून समोर आला आहे. सामान्य चिनी गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीला विक्रमी उच्चांकावर नेल्याचे या अहवालात म्हटले आहे.
मात्र, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नुसार, गेल्या काही आठवड्यांतील किमतींच्या अचानक झालेल्या बदलांमुळे हे गुंतवणूकदार काहीसे साशंक आहेत. आंतरराष्ट्रीय दरांच्या तुलनेत चीनमध्ये सोने आणि चांदी चढ्या दराने विकली जात आहे. याचे कारण म्हणजे तिथे मागणी अधिक आहे. गुंतवणूकदार ‘वीचॅट’ आणि ‘अलिपे’ सारख्या ॲप्सवरून अन्न मागवण्याइतक्याच सहजपणे ‘गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स’ (ईटीएफ) खरेदी करत आहेत. दुसरीकडे, शांघाय फ्युचर्स एक्स्चेंजवरील व्यवहारांनी गेल्या वर्षी विक्रमी पातळी गाठली आहे. याबरोबरच प्रत्यक्ष सोने, विटा, एक ग्रॅमचे ‘गोल्ड बीन्स’ आणि दागिन्यांची खरेदीदेखील तितकीच वाढली आहे.
सोन्याच्या किमतीतील अस्थिरतेचे कारण काय?
अमेरिकन डॉलरचे कमकुवत होणे, बॉण्डवरील कमी परतावा आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी, यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र, ३० जानेवारी रोजी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या नवीन अध्यक्षांच्या नामांकनामुळे डॉलर मजबूत झाला, तेव्हा सोने आणि चांदीच्या किमतीत ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली.
‘कॅपिटल इकॉनॉमिक्स’चे कमोडिटी अर्थतज्ज्ञ हमाद हुसेन यांच्या मते, चिनी सोशल मीडियावर अशा गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे. ज्या नागरिकांनी सोन्याच्या किमती वाढल्या असताना बाजारात प्रवेश केला, त्यांचे आता मोठे नुकसान झाले आहे. वाढत्या जोखीमीमुळे काही बँकांनी सोन्याच्या खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या मर्यादेवर निर्बंध आणले आहेत. या चढ-उतारांनंतरही चीनमधील ‘तिआनया ज्वेलरी मार्केट’मध्ये स्वस्त दरात सोने खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
सेल्स असोसिएट हाँग मियाओ यांच्या मते, सध्या ग्राहक बघ्याची भूमिका घेत आहेत; तर हेनानमधील जिया पेई यांच्यासारख्या काही गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी चांदीकडे आपले लक्ष वळवले आहे. त्या म्हणतात, “मी चांदी साठवण्यास सुरुवात केली आहे, किमती पडल्या तरी त्यात नुकसान नसेल.”
अमेरिकेचे चीनवर आरोप काय?
गेल्या आठवड्यात सुवर्ण बाजारात आलेल्या मोठ्या चढ-उतारांसाठी अमेरिकेने चिनी व्यापाऱ्यांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी म्हटले आहे की, चीनमधील अति सट्टेबाजीमुळे ही अस्थिरता निर्माण झाली आहे आणि चिनी प्रशासनाला कर्जाचे नियम कडक करण्याची गरज आहे. सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ आणि त्यानंतर अचानक आलेल्या घसरणीनंतर त्यांनी हे विधान केले. ही तेजी प्रामुख्याने सट्टेबाजी, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या स्वायत्ततेबद्दल वाढत्या चिंतेमुळे निर्माण झाली होती.
बेसेन्ट यांनी स्पष्ट केले की, गेल्या आठवड्यात बाजारात अचानक बदल झाला. जागतिक राजकीय अनिश्चिततेमुळे ही खरेदी वाढली होती. बाजारातील या अस्थिरतेमुळे जानेवारीच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच अमेरिकन डॉलरला नफा मिळवण्यास मदत झाली. दरम्यान, अमेरिकन अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेट नफ्यावरील गुंतवणूकदारांच्या विश्वासामुळे अमेरिकेचे स्टॉक एक्सचेंज ‘डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल एव्हरेज’ने पहिल्यांदाच ५०,००० चा टप्पा ओलांडला आहे.

