Gold-Silver Price Prediction Expert Opinion Marathi : जागतिक बाजारात सातत्याने नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या सोने-चांदीच्या दराला अखेरीस मोठा ब्रेक लागला. आठवडाभरात मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी सुवर्ण बाजारापेठेत सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा वणवा पेटल्यानंतर अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला पसंती दिली होती. तरीदेखील आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंचे दर नेमके कशामुळे कोसळले? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

सोने-चांदीचा भाव कशामुळे घसरला?

जागतिक पातळीवर युद्धाचे सावट निर्माण झाल्यास शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळते. परिणामी सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे सुवर्ण बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या दरातही झपाट्याने वाढ होते. अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यात संघर्ष असूनही जागतिक बाजारपेठेत वेगळेच चित्र दिसत आहे. अमेरिकन डॉलरला मिळालेली बळकटी आणि ट्रेझरी बाँडच्या (सरकारी रोखे परतावा) वाढत्या उत्पन्नामुळे मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. भू-राजकीय घडामोडी आणि वाढत्या महागाईच्या धोक्यांमुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे मत सराफा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केवळ सोने-चांदीच नव्हे, तर प्लॅटिनम आणि तांब्याच्या किमतींवरही मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याशिवाय अलीकडील तेजीच्या पार्श्वभूमीवर काहींनी नफा वसुली केल्याने या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा : US-Iran War : डोनाल्ड ट्रम्प नरमले? अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम होणार? वादात कोण करतंय मध्यस्थी?

सोने-चांदीचे दर आणखीनच घसरणार?

सोमवारी जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात २.३६ टक्के, तर चांदीच्या दरात ४.५२ टक्के इतकी मोठी पडझड झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याने प्रति औंस ४,४९४ डॉलरचा स्तर तोडल्यास नजीकच्या काळात त्यात आणखी मोठी घसरण होऊ शकते. मात्र, महागाई आणि जागतिक अनिश्चितता पाहता दीर्घकाळात सोन्याची मागणी वाढल्यास किमती पुन्हा सावरण्याची शक्यता आहे. सध्याची घसरण ही केवळ तांत्रिक स्वरूपाची आणि नफावसुलीमुळे असू शकते. महागाई वाढल्यास सोने पुन्हा एकदा ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून समोर येईल. जोपर्यंत अमेरिकन डॉलर वधारलेला असेल आणि रोखे परतावा उच्च स्तरावर राहील, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या किमती दबावाखाली राहू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या सोन्यासाठी प्रति औंस ५,१६३ डॉलर्सचा भाव हा महत्त्वाचा आधार आहे. जर ही पातळी ओलांडल्यास सोन्याचे दर पुन्हा ५,४७० डॉलर्स आणि त्यानंतर ५,५९८ डॉलर्स या विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणखी चिघळल्यास सोन्याची मागणी पुन्हा वाढू शकते; पण तणाव निवळल्यास किंवा अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदराच्या कपातीस विलंब केल्यास डॉलरला चांगली बळकटी मिळून सोने-चांदीच्या किमतीत घसरण होऊ शकते.

सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी अस्थिरता

दीर्घकाळाचा विचार करता महागाईचा धोका, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे या दोन्ही धातूंना भक्कम आधार मिळू शकतो. भविष्यात व्याजदरात कपात झाल्यास मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा एकदा उच्चांकी स्तर गाठू शकतात. सध्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत. शेअर बाजारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून नफा कमावण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुवर्ण बाजारात जरी सोने-चांदीच्या दरात कमकुवतपणा दिसत असला तरीही महागाईच्या चिंतेमुळे या धातूंचा दीर्घकालीन दृष्टिकोन स्थिर आणि सकारात्मक राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

गुंतवणूकदारांनी सध्या काय करावे?

सोन्या-चांदीच्या किमतीत होत असलेल्या मोठ्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. अमेरिकन डॉलरची वाटचाल आणि फेडरल रिझर्व्हचे व्याजदरांबाबतचे संकेत यांवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. डॉलर मजबूत राहिल्यास बाजारात अस्थिरता कायम राहू शकते.सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे किमतीतील चढ-उताराचा धोका कमी होऊ शकतो. सुवर्ण बाजारातील घबराट पाहून घाईघाईने सोने-चांदी खरेदीचा निर्णय घेऊ नका. तांत्रिक स्तरांचा अभ्यास करूनच आपली पुढील रणनीती ठरवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा : Blackout Challenge : ‘ब्लॅकआउट चॅलेंज’ म्हणजे नेमके काय? त्यामुळे लहान मुलांना का गमवावा लागतोय जीव?

महाराष्ट्रात आज सोने-चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रातील जळगाव शहरातल्या सुवर्ण बाजारपेठत गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. शनिवारी ती हजार ८११ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४८ हजार ६२९ रुपयांपर्यंत खाली आले होते; तर सोमवारी त्यात आणखी एक हजार ८५४ रुपयांची घट नोंदवली गेली. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोन्याच्या दरात पुन्हा ३९१४ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचे दर एक लाख ४८ हजार ८६१ रुपयांपर्यंत खाली आले. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मंगळवारी तब्बल नऊ हजार २७० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ३१ हजार ७५० रुपयांपर्यंत खाली आले आहे.