देशातील सुवर्ण बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू होते. मात्र, आता पुन्हा दोन्ही धातुंच्या दराची तेजीकडे वाटचाल सुरू झाल्याने सामान्य ग्राहकांसह मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोने, चांदी दराची सद्यःस्थिती काय?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी १९ एप्रिलला २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५७,६९३ रुपयांपर्यंत, तर चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,६७,८०० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर सतत चढ-उतार सुरू राहिल्याने ३० एप्रिलअखेर सोन्याचे दर १,५४,९१२ रुपये, तर चांदीचे दर २,५१,३२० रुपयांपर्यंत स्थिरावले होते.

दरम्यान, अक्षय्य तृतीयेनंतर लग्नसराईचा जोर थोडा कमी होत असल्यामुळे मागणीत घट होऊन सोने, चांदीचे दर कमी होण्याची अपेक्षा ग्राहक बाळगून होते. परंतु, अक्षय्य तृतीयेनंतर मे महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही दोन्ही धातुंच्या दरात फार दखलपात्र घट झाली नाही. तशात बुधवारी अचानक प्रति १० ग्रॅम ३२०० रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोने तीन टक्के जीएसटीसह १,५६,०४५ रुपयांपर्यंत पोहचले. तर प्रति किलो ७२१० रुपयांची वाढ झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह २,५९,५६० रुपयांपर्यंत पोहचली. गुरुवारी देखील दोन्ही धातुंच्या दरातील तेजी कायम राहिली.

सोने, चांदी दरवाढीचे कारण?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावात काही प्रमाणात नरमाई आल्याच्या संकेतांमुळे जागतिक बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याचा थेट परिणाम सोने, चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण, डॉलरमधील झडती आणि जागतिक गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. अमेरिका आता संघर्षाऐवजी चर्चेच्या भूमिकेत असल्याचे संकेत बाजाराला मिळाले आहेत. या घडामोडींनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींना पुन्हा बळ मिळाले आहे.

एमसीएक्स, कॉमेक्स आणि स्पॉट मार्केटमध्येही सोन्याच्या दरात चांगली वाढ नोंदवली गेली. डॉलर कमकुवत झाल्याचा परिणामही सोन्याच्या बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. डॉलर कमकुवत झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी करणे आता तुलनेने स्वस्त झाले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढली असून त्याचा परिणाम दरवाढीवर होत आहे. चांदीच्या किमतींमध्येही याच कारणामुळे तेजीचे वातावरण कायम असल्याचे दिसून आले.

दरवाढीचा ग्राहकांवर परिणाम कसा?

काही दिवसांपूर्वी सोने, चांदीच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाल्यामुळे सणासुदीसह लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. अनेकांनी या संधीचा फायदा घेत खरेदी केली. मात्र, आता पुन्हा दर वाढू लागल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर लग्नकार्याच्या खर्चाचे गणित पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.

सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, आगामी काळात दर आणखी वाढल्यास ग्राहक दागिने खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकतात. दर घसरल्याने दिलासा मिळालेल्या ग्राहकांना आता पुन्हा वाढत्या किमतींचा सामना करावा लागेल. जागतिक राजकीय परिस्थितीत पुन्हा अस्थिरता निर्माण झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात तेजी परतली आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक कुवतीवर पुन्हा ताण वाढण्याची शक्यता आहे.

आणखी दरवाढीची शक्यता?

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक घडामोडींवर येत्या काही दिवसांत सोने-चांदीच्या दरांचा कल मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार असल्याचे सराफा बाजारातील जाणकारांचे मत आहे. विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध, पश्चिम आशियातील परिस्थिती, डॉलरची स्थिती आणि कच्च्या तेलाच्या दरांमध्ये होणारे चढ-उतार याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकांचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक घडामोडीकडे लागले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाल्याचे संकेत मिळत असले, तरी परिस्थिती पूर्णपणे स्थिर झालेली नाही. दोन्ही देशांमधील चर्चेचे प्रयत्न सुरू असतानाच कोणताही नवीन निर्णय किंवा लष्करी हालचाल बाजारपेठेला पुन्हा अस्थिर करू शकते. अशा वेळी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने दरात पुन्हा मोठी तेजी येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

सध्याच्या उच्च दरांमध्ये सोने-चांदी खरेदी करावी, नफा मिळवून विक्री करावी की पुढील वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूक कायम ठेवावी, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या बाजारात संधी आणि धोके दोन्ही समान प्रमाणात आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर राहिली आणि डॉलरमध्ये कमकुवतपणा कायम राहिला, तर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

विशेषतः जागतिक तणाव वाढल्यास गुंतवणूकदार पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतील, ज्याचा फायदा सोने-चांदीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी विशेषतः सोने अजूनही आकर्षक पर्याय ठरू शकते. मात्र, जागतिक पातळीवर परिस्थिती अचानक बदलल्यास किंवा डॉलर पुन्हा मजबूत झाल्यास सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याच्या तेजीत विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

patil.jitendra@expressindia.com