जागतिक सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजीचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत. सोन्याच्या किमतींनी वाढ नोंदवत तब्बल सात आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय सुधारणा झाल्याने मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचे चित्र आहे. तेजीचा हा प्रवास आणखी किती काळ टिकणार आणि त्याचा भारतीय बाजारावर काय परिणाम होणार, याबाबत गुंतवणूकदार, व्यापारी आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

सोने, चांदी दराची सद्यःस्थिती कशी?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत एक ऑगस्टपर्यंत २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,२९० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी अधिक फरकाने सातत्याने दरवाढ होत राहिल्याने सहा ऑगस्टपर्यंत सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,९५५ रुपयांपर्यंत पोहचले. तब्बल ५६६५ रुपयांची वाढ सोन्याच्या दरात नोंदवली गेली. विशेष म्हणजे तीन जुलैनंतर पहिल्यांदा दीड लाखांचा आकडा सोन्याने ओलांडला. अशाच प्रकारे जळगावात एक ऑगस्टपर्यंत चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,२६,००० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी अधिक फरकाने दरवाढ होत राहिल्याने सहा ऑगस्टपर्यंत चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,३४,८४० रुपयांपर्यंत पोहचले. तब्बल ८२४० रुपयांची वाढ चांदीत नोंदवली गेली.

सोन्याचे महत्व का वाढले?

जागतिक अर्थव्यवस्था सध्या अनेक आव्हानांना सामोरी जात आहे. अमेरिकेतील व्याजदर धोरण, युरोपमधील आर्थिक मंदीची भीती, चीनच्या अर्थव्यवस्थेतील संथ गती, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता, या सर्व घटकांचा परिणाम आर्थिक बाजारांवर होत आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजार आणि इतर जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये मोठे चढ उतार होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर सोन्याने पुन्हा एकदा ‘सेफ हेवन’ म्हणून आपले महत्त्व सिद्ध केले आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकी डॉलर निर्देशांक १०० च्या खाली घसरल्याने सोन्याला मोठा आधार मिळाला आहे. डॉलर कमकुवत झाल्यानंतर इतर देशांच्या चलनधारकांसाठी सोने तुलनेने स्वस्त ठरते. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी वाढते आणि किमतींना चालना मिळते. डॉलर आणि सोन्याचा परस्परविरोधी संबंध अनेक दशकांपासून दिसून येतो. त्यामुळे डॉलरमध्ये कमजोरी कायम राहिली तर सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. त्याची प्रचिती सध्याही येत आहे.

चांदीकडेही गुंतवणूकदारांचा ओढा?

चांदीच्या बाजारातही सध्या सकारात्मक वातावरण कायम असून, केवळ मौल्यवान धातू म्हणून नव्हे तर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वापरामुळेही तिचे महत्त्व वाढत आहे. पूर्वी दागिने आणि भांड्यांपुरती मर्यादित असलेली चांदी आता सौरऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे आणि सेमीकंडक्टर उद्योगातील महत्त्वाचा कच्चा माल बनली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील विस्ताराबरोबर चांदीची मागणीही सातत्याने वाढत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, सौर पॅनेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने जागतिक औद्योगिक मागणी मजबूत होत आहे. त्याचबरोबर आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही अनेक गुंतवणूकदार चांदीकडे वळत आहेत. त्यामुळे गुंतवणूक आणि औद्योगिक वापर या दोन्ही घटकांमुळे चांदीच्या किमतींना दुहेरी आधार मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यापुढेही तेजी कायम राहणार?

भारतीय सराफ बाजारावर आंतरराष्ट्रीय किमतींशिवाय डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क, जीएसटी आणि स्थानिक मागणी यांचा मोठा प्रभाव नेहमीच दिसून येतो. त्यानुसार, रुपयाचे अवमूल्यन झाल्यास जागतिक बाजारात दर स्थिर असले तरी भारतात सोने महाग होऊ शकते. याशिवाय आगामी गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता दागिन्यांच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमती उच्च पातळीवर राहू शकतात. गुंतवणुकीसाठी सोन्याबरोबरच गोल्ड ईटीएफ, गोल्ड बाँडसारख्या पर्यायांकडेही गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. दागिन्यांऐवजी गुंतवणुकीच्या स्वरूपात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच, अल्पकालीन चढ-उतार असूनही दीर्घकालीन गुंतवणुकीत विशेषतः सोन्याने सातत्याने चांगला परतावा दिल्याने त्यावरील विश्वास कायम राहण्याची चिन्हे आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यांत अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत कोणता निर्णय घेते, डॉलरची दिशा काय राहते, जागतिक आर्थिक आकडेवारी कशी येते आणि भू-राजकीय घडामोडी कोणते वळण घेतात, यावर सोन्या-चांदीच्या किमतींची पुढील दिशा ठरणार आहे. व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यास सोन्याला आणखी मोठी चालना मिळू शकते. मात्र व्याजदर वाढले किंवा डॉलर पुन्हा मजबूत झाला तर काही प्रमाणात नफावसुली होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, सराफा बाजारात निर्माण झालेली तेजी ही केवळ अल्पकालीन हालचाल नसून तिच्यामागे अनेक जागतिक आर्थिक घटक कार्यरत आहेत. सुरक्षित गुंतवणूक, मध्यवर्ती बँकांची वाढती खरेदी, डॉलरची कमजोरी, घसरते बाँड परतावे, वाढती औद्योगिक मागणी आणि सणासुदीतील संभाव्य खरेदी या सर्वांचा एकत्रित परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर होत आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंचे दर आणखी उंचावतात की बाजारात नफावसुलीचे वारे वाहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

patil.jitendra@expressindia.com