देशांतर्गत सुवर्ण बाजारपेठेत अचानक खरेदी वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरांना अलीकडे झळाळी प्राप्त झाली आहे. दुसरीकडे, जागतिक भू-राजकीय तणावासह कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि आर्थिक अनिश्चितता, या घटकांमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारातील अस्थिरता अद्याप कायम आहे. त्यामुळे रक्षाबंधनापर्यंत दोन्ही धातूंचे दर आणखी वाढतील की घटतील, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

जळगावमध्ये आता काय स्थिती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत १२ ऑगस्ट रोजी चांदीचा दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २ लाख ४८ हजार २३० रुपयांवर पोहचला. हाच दर ऑगस्टच्या पहिल्या तारखेला प्रति किलो २ लाख २६ हजार रुपयांपर्यंत होता. म्हणजे अवघ्या १२ दिवसांत चांदीच्या दरात सुमारे २२ हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. दरम्यान, २४ कॅरेट सोन्यातही या कालावधीत लक्षणीय उसळीनंतर १२ दिवसांत ११००० रुपयांची वाढ नोंदवली गेली असून सोन्याचा दर १ लाख ५८ हजार ३११ रुपयांवर पोहचला आहे. अर्थात, सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडत असला तरी सणासुदीसाठी केल्या जाणाऱ्या खरेदीच्या उत्साहात अद्याप फारशी घट झाल्याचे दिसून आलेले नाही.

चांदीची झेप अधिक ठळक?

सणासुदीमुळे सोन्याची मागणी आणि दर वाढत असले तरी अलीकडील तेजीमध्ये चांदीची हालचाल अधिक आक्रमक राहिली आहे. जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत चांदीचा दर १२ ऑगस्टपर्यंत २ लाख ४८ हजार रुपयांवर गेल्याच्या पार्श्वभूमीवर या दरवाढीमागे केवळ सणासुदीची मागणी कारणीभूत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, औद्योगिक मागणी, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा मौल्यवान धातूंकडे वाढलेला कल देखील कारणीभूत आहे. चांदीकडे केवळ दागिने किंवा पूजेची वस्तू म्हणून नव्हे, तर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढत असल्याचे मत बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

जागतिक अस्थिरतेचाही परिणाम?

पश्चिम आशियातील तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या दरातील वाढ यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. तेलाचे दर वाढल्यास जागतिक महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता असते. अशा वातावरणात जोखीमपूर्ण मालमत्तेच्या तुलनेत सोने, चांदी तुलनेने सुरक्षित पर्याय मानले जाते. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेच्या काळात देशांतर्गत सोन्या-चांदीच्या मागणीलाही आधार मिळत आहे. चलन बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या मूल्यातील बदलांचा भारतीय बाजारातील सोने-चांदीच्या किमतीवर सातत्याने परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, स्थानिक सराफा बाजारात दर ठरविताना जागतिक बाजारातील संकेतांबरोबरच रुपयाची स्थिती आणि आयात-संबंधित खर्चही महत्त्वाचा ठरत आहे.

पुढेही अस्थिरतेची शक्यता?

सध्या सोने-चांदी बाजारासाठी दोन परस्परविरोधी शक्ती कार्यरत आहेत. एका बाजूला सणासुदीची देशांतर्गत मागणी आणि जागतिक अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढत आहे; तर दुसऱ्या बाजूला वाढलेले दर ग्राहकांना खरेदीपूर्वी अधिक विचार करण्यास भाग पाडत आहेत. पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाचे दर, महागाईची दिशा, प्रमुख केंद्रीय बँकांचे धोरण, डॉलरची हालचाल आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल हे आगामी काळात मौल्यवान धातूंच्या दरांसाठी निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वेगाने चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सणासुदीमुळे स्थानिक सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण असले, तरी सध्याची तेजी केवळ सणासुदीच्या मागणीपुरती मर्यादित नसून तिच्यामागे जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय घटकांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते.

रक्षाबंधनामुळे बाजारात गर्दी?

रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण न राहता भेटवस्तूंच्या बाजारासाठीही महत्त्वाचा काळ ठरतो. भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक म्हणून पारंपरिक वस्तूंबरोबरच सोन्या-चांदीच्या वस्तूंना ग्राहकांकडून पसंती मिळते. त्यानुसार, यंदाही आतापासून चांदीच्या भेटवस्तू, नाणी आणि आकर्षक राख्यांची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा पारंपरिक राख्यांसोबत ९२.५ स्टर्लिंग सिल्व्हर आणि गोल्ड फॉइलने सजवलेल्या प्रीमियम राख्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. शुभश्री, स्वस्तिक आणि नजर सुरक्षा यांसारखी धार्मिक चिन्हे, आधुनिक डिझाइन आणि आकर्षक फिनिशिंग यामुळे या राख्यांना भेटवस्तू म्हणूनही मागणी आहे. प्रीमियम पॅकेजिंगमुळे त्यांचे सादरीकरण अधिक आकर्षक झाले असून, बदलत्या ग्राहक पसंतीचे हे एक उदाहरण मानले जात आहे.

तज्ज्ञांचा गूंतवणुकदारांना सल्ला काय?

तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या अस्थिर वातावरणात मौल्यवान धातूंमध्ये संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचे धोरण अधिक योग्य ठरू शकते. किंमत घसरल्यास अतिरिक्त खरेदी करण्याची संधी ठेवणे आणि नियमित अंतराने गुंतवणूक करणे, यामुळे बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांचा परिणाम काही प्रमाणात संतुलित करता येऊ शकतो. मात्र, सोने किंवा चांदीच्या किमती पुढे नक्की वाढतील किंवा कमी होतील, याची खात्री नसल्याने गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीमक्षमतेनुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. रक्षाबंधनानंतर तीज आणि त्यानंतर येणाऱ्या विविध सणांमुळे सराफा बाजारातील ग्राहकांची वर्दळ कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात सण आणि शुभमुहूर्ताच्या काळात सोने-चांदी खरेदीला पारंपरिक महत्त्व असल्याने दर वाढले तरी मागणी पूर्णपणे कमी होत नाही, हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

patil.jitendra@expressindia.com