Gold-Silver Prices Continue To Fall : सुवर्ण बाजारपेठेत सातत्याने नवीन उच्चांक गाठणाऱ्या सोन्या–चांदीच्या दरांना अखेर मोठा ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. अवघ्या तीन दिवसांतच मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे- २९ जानेवारीला सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यापाठोपाठ चांदीच्या दरानेही मोठी उसळी घेतल्याने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत मौल्यवान धातूंचे भाव गगनाला भिडले होते. यादरम्यान सोने–चांदीची विक्रमी दरवाढ व घसरण पाहता गुंतवणूकदारांची संभ्रमावस्था वाढली आहे. दोन्ही धातूंचे दर यापुढील काळात आणखी घसरणार की वाढणार असा प्रश्न अनेकांना सतावत आहे, त्याविषयीचा हा आढावा…
सोने-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरणीची लाट सोमवारीही (२ फेब्रुवारी) कायम राहिली. अचानक झालेल्या या घसरणीमुळे उच्चांकी दरात पिवळ्या धातूंची खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागला. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात झालेली ३० टक्क्यांहून अधिकची पडझड ही १९८० नंतरची सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलर वधारल्यामुळे सोन्याच्या मागणीवर दबाव निर्माण झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोन्याचा भाव झपाट्याने कोसळला
२९ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ५,५९४ ते ५,६२६ (सुमारे ५.१२ ते ५.१५ लाख रुपये) डॉलर्सवर पोहोचला होता. त्यानंतर दोनच दिवसांतच त्यात चार ते पाच टक्क्यांची घसरण झाली. सोमवारी (२ फेब्रुवारी) सोन्याचा दर प्रति औंस ४,५०० ते ४,७०० (सुमारे ४.१२ ते ४.३० लाख रुपये) पर्यंत खाली आला. भारतात रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याआधी २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा एक लाख ७० हजार इतका होता. सोमवारी सराफा बाजार उघडताच हाच दर घसरून एक लाख ५५ हजारांपर्यंत आला.
आणखी वाचा : India-US Trade Deal: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताचे व्यापार धोरण कसे बदलले?
चांदीच्या दरात सर्वात मोठी पडझड
२०२६ मध्ये सर्वच मालमत्तांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चांदीलाही सोमवारी मोठा तडाखा बसल्याचे दिसून आले. २९ जानेवारीला (गुरुवार) आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस १२१.६४ या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. त्यानंतरच्या तीन दिवसांत त्यात तब्बल ३० टक्क्यांनी घसरण झाली. सोमवारी चांदीचे दर अधिक घसरून प्रति औंस ७३ ते ८० डॉलर (सुमारे ६,६८० ते ७,३२० रुपये) इतक्यावर आले. १९८० नंतरची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे मत सराफ तज्ज्ञांनी व्यक्त केले. भारतीय सराफा बाजारपेठेत शुक्रवारी एक किलो चांदीच्या दराने चार लाख २० हजार रुपये इतका उच्चांक गाठला होता. त्यानंतर दोन दिवसांतच त्यात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी भारतीय सराफा बाजारात चांदीचा भाव प्रति किलो तीन लाख ४५ हजारांवर आला होता.
गुंतवणूकदारांना बसला मोठा फटका
आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ्सवरही मोठा परिणाम दिसून आला. सोन्यावर आधारित ईटीएफ्समध्ये तीन ते सहा टक्क्यांची घसरण झाली; तर चांदीवरील ईटीएफ्समध्ये १० ते १५ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. यादरम्यान वाढत्या अस्थिरतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेअर बाजारांतील अनेक गुंतवणूकदारांनी सर्किट लिमिट्स लागू केल्याचे दिसून आले. सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या दरातील सध्याची घसरण तीव्र असली तरीही येत्या काही दिवसांत बाजाराची दिशा आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून राहणार आहे. गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील हालचालींचा अभ्यास करूनच पुढील पावले उचलावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
सोन्या-चांदीच्या दरात घसरण का होत आहे?
सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या घसरणीमागे- अमेरिकन डॉलर मजबूत होणे, नफावसुली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केलेली नियुक्ती ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. केविन वॉर्श हे महागाईविरोधी कठोर भूमिका घेणारे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे आगामी काळात अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला आहे. त्याशिवाय जागतिक बाजारात डॉलर वधारल्याने गुंतवणूकदारांनी उच्चांकी स्तरावर सोन्या-चांदीची विक्री करून नफा पदरात पाडून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच सीएमई ग्रुपने मौल्यवान धातूंच्या फ्युचर्स करारांवरील मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्यासाठी हे मार्जिन सहा टक्क्यांवरून आठ टक्के, तर चांदीसाठी ११ टक्क्यावरून १५ टक्के करण्यात आले आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना व्यवहार सुरू ठेवण्यासाठी मोठी रक्कम जमा करावी लागत असल्याने बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे.
हेही वाचा : जनरल नरवणे यांच्या ‘त्या’ पुस्तकात नक्की काय आहे? लोकसभेतील गदारोळ कशासाठी?
सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढणार?
सोन्यातील सद्यस्थितीतील घसरण तात्पुरती असून मध्यम आणि दीर्घ मुदतीत सोने तेजीतच राहणार असल्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. २०२६ च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस ५,००० ते ६,३०० (सुमारे ४.५८ ते ५.७७ लाख रुपये) पर्यंत जाऊ शकतो. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची मोठी खरेदी (सुमारे ८०० टन) याला बळ देईल, असे केसीएमचे मुख्य ट्रेड विश्लेषक टिम वॉटरर यांनी सांगितले आहे. चांदीच्या बाबतीत मात्र काही तज्ज्ञ अधिक सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. चांदीच्या किमतींवर परिणाम करणारे घटक आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. त्यामागचे कारण म्हणजे- सोन्याप्रमाणे चांदीला केंद्रीय बँकांची थेट मागणी नाही. सध्या चांदीसाठी ७५ ते ८० डॉलर्स प्रति औंस ही एक स्थिर पातळी मानली जात असल्याचे दलाल संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सोने-चांदीचे आजचे भाव काय?
सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ३ फेब्रुवारी २०२६ रोजी देशात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाख ४९,४२० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेटचे सोने खरेदीसाठी ग्राहकांना प्रति तोळा एक लाख ३६,९६८ रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे १ किलो चांदीचा दर दोन लाख ५४,०२० रुपये असल्याचे दिसून येत आहे. उत्पादन शुल्कासह राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत दररोज बदल होत असतात. मौल्यवान धातूंमध्ये मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

