आयात शुल्कवाढीनंतर विक्रमी दर गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात गेल्या पंधरवड्यात मोठी घसरण नोंदविण्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जळगावसह देशातील सुवर्ण बाजारपेठांमध्ये पुन्हा खरेदीला वेग आला आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील सततचे चढ-उतार, डॉलरच्या मूल्यातील बदल आणि आयात धोरणांमुळे आगामी काळात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये पुन्हा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोने-चांदी दराची सद्यःस्थिती?
भारताने आयात शुल्कात वाढ केल्यानंतर देशभरातील सुवर्ण बाजारपेठांमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्ण बाजारावरही झाला. २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्याचवेळी चांदीनेही विक्रमी दर गाठत जीएसटीसह प्रति किलो तीन लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः लग्नसराई, गुंतवणूक आणि दागिने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी वाढत्या दरामुळे खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र बाजारात दिसून आले होते. सुदैवाने नंतरच्या पंधरवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. २७ मेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचे दर ५००० रुपयांपेक्षा अधिक घट नोंदवली गेल्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६१,७१० रुपयांपर्यंत खाली आले. दुसरीकडे, तब्बल २२ हजार रुपयांची घसरण झाल्याने चांदीचे दरही जीएसटीसह प्रति किलो २,७८,००० रुपयांपर्यंत खाली आले.
दर कमी होण्याचे कारण?
भारताने आयात शुल्कात वाढ केल्यानंतर देशभरातील सुवर्ण बाजारपेठांमध्ये १३ आणि १४ मे रोजी मोठ्या घडामोडी सोने, चांदीच्या दरात झाल्या. दोन्ही धातू पुन्हा नवा उच्चांक गाठतात की काय, अशी भीती ग्राहकांनी व्यक्त केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरच्या मूल्यातील बदल तसेच गुंतवणूकदारांकडून सुरू झालेली मोठ्या प्रमाणातील नफा वसुली यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे दर दोनच दिवसांत एका झटक्यात खाली आले. अधिक मासामुळे मागणी वाढल्यानंतरही सोने, चांदीच्या दरात नंतरच्या कालावधीत फार दखलपात्र बदल नोंदवला गेला नाही. दर स्थिरावल्यामुळे ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला. आयात शुल्क वाढीनंतर दर वधारल्याने विक्री घटण्याच्या शक्यतेने धास्तावलेल्या सुवर्ण व्यावसायिकांनी सुद्धा सुटकेचा निःश्वास सोडला.
बाजारात पुन्हा उत्साही वातावरण?
भारताने आयात शुल्कात वाढ जाहीर केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह गुंतवणूकदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ग्राहकांनी वाढत्या किमतीमुळे खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दर कमी झाल्यानंतर ग्राहकांची पाऊले पुन्हा सराफ बाजाराकडे वळू लागली आहेत. काही ग्राहक भविष्यात पुन्हा दर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सध्याच्या दर घसरणीचा फायदा घेऊन खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत बाजारातील उलाढाल आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरीही, सोन्या-चांदीच्या बाजारात अजूनही अनिश्चिततेचे वातावरण कायम असल्याचे जाणकारांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, जागतिक आर्थिक घडामोडी तसेच केंद्र सरकारच्या आयात धोरणातील संभाव्य बदल याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होण्याची चिन्हे आहेत.
पंतप्रधानांच्या आवाहनाचे काय झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या परकीय चलनाची बचत करण्यासाठी भारतीयांना पुढील किमान एक वर्ष अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. परंतु, पंतप्रधानांचे आवाहन केवळ मोठ्या गुंतवणुकदारांसाठीच आहे. लहान स्वरूपातील सामान्य ग्राहकांना पंतप्रधानांचा सल्ला बंधनकारक नाही, अशी समजूत करून घेतलेल्या अनेकांनी नंतरच्या काळातही सोने, चांदीच्या खरेदीत अजिबात हात आखडता घेतला नाही. तशात १७ मेपासून अधिक मास सुरु झाल्याने जावई तसेच भाच्यांना वाण देण्यासाठी सोन्याचे दागिने तसेच चांदीची भांडी खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढल्याचा प्रत्यय आला. पंतप्रधानांच्या सोने खरेदी कमी करण्याच्या आवाहनाचा कोणताच परिणाम सुवर्ण बाजारपेठेवर जाणवला नाही, असे जळगावमधील व्यावसायिकांनी सांगितले.
पुढील काळात चित्र कसे असेल?
सध्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या चढ-उतारानंतर काही प्रमाणात स्थिरता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत दरात झालेल्या घसरणीनंतर बाजारातील व्यवहार पुन्हा सुरळीत होऊ लागले आहेत. तथापि, सध्याची स्थिरता पुढेही कायम राहील याची खात्री देता येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, तसेच विविध देशांच्या आर्थिक धोरणांचा परिणाम थेट मौल्यवान धातूंच्या दरावर होत असतो. याशिवाय, जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता वाढल्यास गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दोन्ही धातूंच्या मागणीत वाढ होऊन दर पुन्हा वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारात सावध वातावरण असून ग्राहकांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील परिस्थितीचा अभ्यास करूनच खरेदी करावी. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांनी दरातील चढ-उतार लक्षात घेणे आवश्यक आहे.
patil.jitendra@expressindia.com
