अधिक मासाच्या सुरुवातीला नवीन उंची गाठलेल्या सोने, चांदीच्या दरांमध्ये अखेरच्या टप्प्यात मोठी घसरण झाली आहे. वाढत्या किमतींमुळे खरेदी पुढे ढकलणाऱ्या ग्राहकांना त्यामुळे बराच दिलासा मिळाला असला, तरी जागतिक आर्थिक घडामोडींसह अमेरिकन डॉलरची मजबूत स्थिती आणि भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घसरण आणखी किती काळ टिकणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. दागिने खरेदी करावे की आणखी प्रतीक्षा करावी, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे.
देशांतर्गत सोने, चांदीचे दर कसे?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अधिक मासाची सुरुवात होताच म्हणजे १८ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६३,२५५ रुपयांपर्यंत, तर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,८२,२२० रुपयांपर्यंत पोहचले होते. वाण देण्यासाठी दागिने किंवा भेटवस्तू खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांनी त्यामुळे आर्थिक कुवतीचा अंदाज घेऊन हात आखडताच घेतला होता. नंतरच्या काळात दोन्ही धातुंच्या दरात कमी-अधिक फरकाने चढउतार सुरूच राहिले. मात्र, अधिक मासाच्या सुरुवातीला जेवढे दर होते, त्या पातळीपर्यंत नंतर ते कधीच पोहचले नाही. उलट अधिक मास संपण्याचे वेध लागल्यानंतर सोने, चांदीच्या घसरणच झाली. याचा परिणाम म्हणून १० जूनपर्यंत ११,३३० रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५१,९२५ रुपयांपर्यंत घसरले. दुसरीकडे, १० जूनपर्यंत तब्बल ३८,११० रुपयांची घट झाल्याने चांदी प्रति किलो २,४४,११० रुपयांपर्यंत घसरली.
दर घसरण्याचे कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव तसेच अमेरिकेची अपेक्षेपेक्षा मजबूत आर्थिक आकडेवारी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीबाबत कायम ठेवण्यात आलेली सावध भूमिका, यामुळे जागतिक मौल्यवान धातूंच्या बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचा ओढा कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली आहे. अमेरिकन डॉलरची मजबुती आणि बाँड उत्पन्नातील वाढ यांचाही परिणाम मौल्यवान धातूंवर झाला आहे. या घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत असून, देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अधिक मासाच्या प्रारंभी नव्या उंचीवर पोहोचलेले दर आता लक्षणीयरीत्या खाली आले आहेत. जागतिक स्तरावरील घसरणीचा परिणाम आगामी काळातही भारतीय बाजारातील दरांवरही होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दर घसरल्याचा ग्राहकांना फायदा?
अधिक मासाच्या सुरुवातीला नव्या उंचीवर पोहचलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी सर्वसामान्य ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर मोठा परिणाम केला होता. वाढत्या दरांमुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या अनेक ग्राहकांनी खरेदीचा निर्णय पुढे ढकलला होता. किंवा खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेषतः वाण देण्यासाठी किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेत सावध भूमिका स्वीकारली होती. मात्र, आताच्या दर घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिक मासाच्या सुरुवातीला वधारलेल्या सोन्याच्या दरात सुमारे ११ हजार रुपयांची घट झाली असून, चांदीचे दरही तब्बल ३८ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. महागाईमुळे खरेदी पुढे ढकलणारे ग्राहक पुन्हा बाजाराकडे वळण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होत आहे. अर्थात, किंमत कमी झाल्यानंतर काही ग्राहकांनी लगेच संधीचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. तरीही बाजारातील सोने, चांदीच्या खरेदीत अद्याप मोठी वाढ झालेली नाही.
दागिने खरेदी करावे की नाही?
सोने, चांदीच्या दरातील लक्षणीय घसरणीनंतर सराफा बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उच्चांकी दरांमुळे खरेदी टाळणाऱ्या ग्राहकांनी दर घसरणीकडे संधी म्हणून पाहिल्यास आगामी काही दिवसांत दागिने विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा सुवर्ण व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दर घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी बाजारातील अनिश्चितता पूर्णपणे संपलेली नाही. जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदरासंदर्भातील भूमिका, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि जागतिक गुंतवणूकदारांची बदलती रणनीती यांचा थेट परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर होत आहे. जाणकारांच्या मते, सोने आणि चांदीची सध्याची दर घसरण निश्चितच दिलासादायक व ग्राहकांना खरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारी आहे. मात्र, केवळ दर कमी झाले म्हणून घाईघाईने मोठी गुंतवणूक करण्याऐवजी जागतिक बाजारातील घडामोडी, स्थानिक मागणी आणि दरातील संभाव्य चढ-उतार यांचा विचार करूनच खरेदीचा निर्णय घेणे अधिक हितावह ठरणार आहे.
patil.jitendra@expressindia.com
