अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांत जागतिक तसेच भारतातील बाजारपेठांमध्ये सोने, चांदीच्या दरांमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळाले. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर दोन्ही मौल्यवान धातुंच्या दरांनी अचानक मोठी उसळी घेतली होती. मात्र, आता अस्थिरता बरीच कमी झाल्याने दोन्ही धातुंचे दर स्थिरतेकडे झुकताना दिसत आहेत.
सोने, चांदी दराची वाटचाल कशी?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत साधारण ७ एप्रिलपर्यंत म्हणजेच अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण स्थिती कायम असेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६७६ रुपयांपर्यंत होते. मात्र, अमेरिकेने इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी ३४७२ रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,१४८ रुपयांपर्यंत पोहचले. अशाच प्रकारे, ७ एप्रिलपर्यंत चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४४,११० रुपयांपर्यंत होते.
अमेरिकेने शस्त्रसंधी करून एक पाऊल मागे जाण्याची तयारी दर्शविल्यानंतर चांदीचे दरही तब्बल १३,३९० रुपयांनी वाढून जीएसटीसह प्रति किलो २,५७,५०० रुपयांपर्यंत वधारले होते. एकूण चित्र लक्षात घेता सोने, चांदी आणखी नवा उच्चांक प्रस्थापित करतात की काय, अशी भीती ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना वाटू लागली होती. प्रत्यक्षात, शस्त्रसंधीचा प्रभाव केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहून मोठ्या चढ-उतारांना लगाम लागल्याने सोन्याचे दर शनिवारपर्यंत २,५५,४४० रुपयांवर स्थिरावले. दुसरीकडे, शनिवारपर्यंत कमी-अधिक फरकाने चढ-उतार सुरु असले, तरी चांदीचे दरही २,५५,४४० रुपयांवर स्थिरावल्याचे दिसून आले.
दरवाढ नेमकी कशामुळे थांबली?
अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात सोने, चांदीच्या दरवाढीचा भडका उडाल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना चांगलाच घाम फुटला होता. मात्र, दुसऱ्याच दिवसापासून सोने, चांदीचे दर वाढले नाही की फार कमी सुद्धा झाले नाहीत. युद्धजन्य परिस्थितीत काही गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुरुवातीला दरवाढ झाली होती. मात्र, त्यानंतर नफा वसुली आणि जागतिक बाजारातील बदलत्या संकेतांमुळे सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली. चांदीच्या दरातही नंतरच्या काळात सोन्याप्रमाणे फार घसरण झाली नाही. मात्र, चांदीच्या दरवाढीचा वेग बऱ्यापैकी मंदावल्याचे दिसून आले. डॉलरच्या मजबुतीचा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोने आणि चांदीच्या दरांवर तात्काळ प्रभाव पडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
बाजाराची सद्यःस्थिती कशी?
आंतरराष्ट्रीय तणाव आणि डॉलरच्या मजबुतीमुळे सोने, चांदीच्या दरात निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता नवीन दर आणि भविष्यातील ट्रेंडचा अभ्यास करून गुंतवणूक करण्याची भूमिका गुंतवणूकदारांनी घेतली होती. मात्र, अमेरिकेने इराणसोबत घोषित केलेल्या शस्त्रसंधीचा प्रभाव एका दिवसातच संपल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांत विशेषतः सोने आता बऱ्यापैकी स्थिरावले आहे. त्यात कोणतीच दखलपात्र वाढ अथवा घट झालेली नाही. दरातील मोठे चढ-उतार थांबल्यानंतरची ही स्थिती सामान्य ग्राहकांसाठी एक संधी मानली जात आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामासाठी सोने खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत झाल्याने सुवर्ण बाजारपेठेत पुन्हा चैतन्य दिसून येत आहे.
पुढे दर वाढतील की घटतील?
जाणकारांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केल्यावर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत सोन्याची खरेदी वाढविल्याने सोन्याच्या दरात मोठी उसळी दिसून आली होती. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बाजारात आता काही प्रमाणात स्थिरता येण्याची अपेक्षा आहे. ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना त्यांनी सहकार्य केले नाही तर पूर्वीपेक्षा अधिक प्राणघातक शस्त्रास्त्रांचा सामना करावा लागू शकतो, अशी कठोर भूमिका घेतल्यामुळे बाजारात थोडीशी अनिश्चितता कायम असली, तरी चर्चेच्या शक्यतेमुळे तणाव काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच, अमेरिका–इराण संबंधातील बदल, राजकीय वक्तव्ये आणि जागतिक घडामोडी यांचा सोने-चांदीच्या किमतींवर थेट आणि जलद परिणाम होत असल्याचे या घटनाक्रमातून स्पष्टपणे दिसून येते. भविष्यातील दोन्ही धातुंचे दर हे अमेरिका-इराण चर्चेच्या निकालावर आणि दोन्ही देशांच्या भूमिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतील.
तज्ज्ञांचा सल्ला काय?
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका–इराण तणाव, शस्त्रसंधीबाबतची अनिश्चितता आणि पश्चिम आशियातील वेगाने बदलणारी भूराजकीय परिस्थिती यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत सुरू होणार की नाही, याबाबतची अनिश्चितता तसेच तेल टँकर वाहतुकीतील अडथळे आणि शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या बातम्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर ताण वाढताना दिसत आहे. अनेक गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. पारंपरिकदृष्ट्या ‘सेफ हेवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी अशा अस्थिर काळात वाढते, त्यामुळे त्याच्या किमतीमधील चढ-उतार अधिक तीव्र होतात. काही वेळा नफा वसुलीमुळेही सोन्याच्या दरात तात्पुरती घसरण दिसून येते. अशा अनिश्चित वातावरणात सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांनी संयम बाळगावा. अचानक मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा बाजारातील परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरू शकेल.
