गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थाचे अतिसेवन केल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी गोरेगाव पूर्व येथील वनराई पोलिसांनी सहा जणांना अटक केली. परंतु हे अमली पदार्थ या कार्यक्रमात पोहोचले कसे, पोलिसांकडून तपासणी होत नाही का, तपासणीत हे अमली पदार्थ का आढळत नाहीत, आदी प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत हा आढावा…
गोरेगावात नेमके काय घडले?
गोरेगाव पूर्वेकडील नेस्को प्रदर्शन केंद्रात ११ एप्रिल रोजी पाश्चात्य संगीताच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये प्रवेश फी आकारण्यात आली होती. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन तरुणांनी एमडीएमए (पिल्स) या अमली पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर या तरुणांनी मद्यपानही केले. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे यापैकी तीन तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांचा अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला तर एका तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. यामध्ये दोन महाविद्यालयीन तरुण, अमली पदार्थांचा पुरवठादार आणि तिघा आयोजकांचा समावेश आहे. या तरुणांकडून एमडीएमए अमली पदार्थाच्या सहा ते सात गोळ्या जप्त करण्यात आल्या आहे. हे अमली पदार्थ मुंबईबाहेरून आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
कार्यक्रमात अमली पदार्थ कसे?
गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र वा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) मैदान असो, या ठिकाणी प्रामुख्याने पाश्चात्य संगीताच्या रजनीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची पोलिसांनी शंका होती. मात्र कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत नव्हती. अशा कार्यक्रमात तपासणीसाठी खासगी सुरक्षा रक्षकांचा वापर केला जातो. पोलिसांना अशा कार्यक्रमात शिरकाव करण्याचीही परवानगी नसते. आता गोरेगावसारखी घटना घडल्यामुळे अशा कार्यक्रमातील अमली पदार्थांचा मुक्त संचार पुन्हा सिद्ध झाला आहे. अशा कार्यक्रमात अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली तरी अशा कार्यक्रमात तपासणीसाठी जाण्याची पोलिसांना परवानगी नसते. याबाबत कुणी गेलेच तर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून संबंधितांची कानउघाडणी केली जाते. त्यामुळे स्थानिक पोलीस वा मुंबई पोलिसांचा अमली पदार्थ प्रतिबंधक कक्ष अशा कार्यक्रमाकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. याचाच फायदा उठवत अमली पदार्थ पुरवठादार अशा कार्यक्रमात प्रवेश शुल्क भरुन प्रवेश मिळवत असतात व अमली पदार्थाचा पुरवठा करतात, असे गोरेगावच्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.
कोणत्या अमली पदार्थांना मागणी?
मेथाअॅम्फिटामाईन म्हणजेच क्रिस्टल मेथला सर्वाधिक मागणी आहे. खरेतर याआधी हा रासायनिक पदार्थ अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेत येत नव्हता. याचा वापर व्यसनमुक्तीसाठी केला जात असल्याचा दावा होता. परंतु व्यसनमुक्तीपेक्षा आता तो व्यसनाधीनतेसाठीच अधिक वापरला जातो. हा अमली पदार्थ स्पीड, अप्पर, मेथ, क्रिस्टल मेथ, चॉक, आईस, ग्लास, ख्रिस्तमस ट्री, क्रँक आदी कितीतरी नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय मेफेड्रॉन (मियाव मियाव), मॉर्फिन, चरस, अफगान हेरॉईन आदींना मागणी आहे. गोरेगावच्या कार्यक्रमात ‘एक्स्टसी’ (एमडीएमए किंवा पिल्स) या अमली पदार्थांच्या गोळ्यांचे वितरण झाले होते. या एका गोळीचे सेवन केले तरी आवश्यक ती नशा मिळते. आणखी नशेसाठी अतिसेवन केल्यास ते घातक ठरते. अमली पदार्थासोबत मद्यपान म्हणजे मृत्यूला आमंत्रण. गोरेगावच्या कार्यक्रमात संबंधित तरुणांनी अमली पदार्थांच्या सेवनाबरोबरच मद्यपान केल्यामुळे ते जीवघेणे ठरले.
एमडी ड्रग घातक का?
कुठल्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केले तरी ते जीवघेणेच आहे. परंतु त्यातही एमडी अमली पदार्थ अधिक घातक आहे. थेट मज्जासंस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे हा अमली पदार्थ हृदय, किडनी तसेच मानसिक आजारासाठी अत्यंत धोकादायक समजला जातो. मौली, एम क्रिस्टल, क्लब ड्रग अशी कितीतरी नावांनी हा ओळखला जातो. या अमली पदार्थाच्या सेवनामुळे शरीरातील तापमानात अचानक प्रचंड वाढ होते आणि शरीरातील पाण्याचे पातळी मोठ्या प्रमाणात कमी होऊन किडनी आणि यकृत निकामी होऊन मृत्यू होतो. या अमली पदार्थाच्या सेवनामुळे स्मरणशक्ती मंदावणे, नैराश्य, चिंता आदी आजार बळावतात. या अमली पदार्थाचे सेवन, उत्पादन, विक्री आणि तस्करी करणाऱ्याला १० ते २० वर्षे इतकी शिक्षा होऊ शकते. तरीही हे अमली पदार्थ आजही सहज उपलब्ध आहेत.
गरीबांचे ‘कोकेन’
कोकेन हा उच्चभ्रूंना परवडणारा अमली पदार्थ प्रचंड महाग आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या हायड्रोफोनिक (हायड्रो) गांजा या अमली पदार्थाला सर्वाधिक मागणी आहे. कोकेनप्रमाणेच नशा देणारा हा अमली पदार्थ प्रामुख्याने बँकॉक, मलेशिया येथून नेपाळमार्गे उत्तर प्रदेश, बिहार येथे आणि तेथून मग देशात सर्वत्र पुरविला जातो. राष्ट्रीय अमली पदार्थ प्रतिबंध विभाग तसेच राज्यातील अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून मोठ्या प्रमाणात हायड्रो गांजा हस्तगत केला जातो. तरीही याची तस्करी थांबलेली नाही. एक ग्रॅम कोकेनसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागत असतील तर हायड्रो गांजासाठी एक ते दीड हजार रुपये द्यावे लागतात. दहा हजार रुपयांच्या हायड्रो गांजापासून पुरवठादार २५ लाख रुपये कमावतो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हायड्रो गांजाला गरीबांचे कोकेन असेही संबोधले जाते.
अमली पदार्थ येतात कोठून?
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या स्थायी समितीने आपल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, म्यानमार, थायलंड आणि लाओस हे देश ‘गोल्डन ट्रायँगल’ तर इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना ‘गोल्डन क्रेसेन्ट’ संबोधले आहे. या देशांमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात होते. या चक्रव्यूहात भारताची हद्द अडकल्याने अमली पदार्थांच्या तस्करीला मोकळे रान मिळाले आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अफुची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अफू म्हणजे खसखसची शेती. अफुच्या बोंडाला चिरा मारून त्यातून दूध काढले जाते. त्यावर प्रक्रिया करून त्याच्या चकत्या पाडतात त्याला अफिम म्हणतात. शासनाकडून अधिकृत परवानगी घेऊन अशी शेती केली तरी तो माल शासनाला द्यावा लागतो. यावर अमली पदार्थ प्रतिबंधक अधिकाऱ्याचे लक्ष असते. परंतु दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक मालाचे उत्पादन करून ते विकले जाते. अफिमवर रासायनिक प्रक्रिया करून पांढरे म्हणजे चांगल्या प्रतीचे हेरॉईन व त्यापासून पुढे ब्राऊन शुगर बनविली जाते. चरस हे प्रामुख्याने नेपाळमधून येते तर पाकिस्तानही चरसचा पुरवठादार आहे. कोकेन मात्र आफ्रिकन देशांतून येते. दिल्लीत, मुंबईजवळ नालासोपारा, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी ही मंडळी झुंडीने राहतात.
तस्करीचे मार्ग?
पश्चिम भारतात अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात हेरॉईनची तस्करी होते तर म्यानमारमधून पूर्व भारतात हेरॉईनचा पुरवठा होतो. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीरमार्गे तस्करी होते. प्रामुख्याने सीमेवरून किंवा हवाईमार्गे हा पुरवठा होत होता. आता जलमार्गाचा वापर केला जातो. गुजरातमध्ये अलीकडे सापडलेला अमली पदार्थांचा साठा हा त्याचाच भाग होता. नेपाळ, बांगलादेश, भुतान, म्यानमार या देशांतून भारतात होणाऱ्या तस्करीमुळे मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगला, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमार्फत दिल्ली व मुंबईत पुरवठा होतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान वा म्यानमार सारख्या देशांमधून अमली पदार्थांच्या पुरवठ्याद्वारे छुपे युद्ध खेळले जात आहे. त्यामुळेच काश्मीर, पंजाब, गुजरात, मणिपूर तर कधी महाराष्ट्रासारख्या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे सापडतात. गेली तीन दशके पाकिस्तान ड्रोन, बोटी, सुरुंग, स्त्रिया आदींच्या मदतीने भारतात अमली पदार्थ पोहोचवत आहे. देशाच्या आजूबाजूचेच नव्हे तर अगदी दक्षिण अमेरिकेमधील काही देशांमध्येही प्रचंड प्रमाणावर अमली पदार्थांना आवश्यक असणाऱ्या मालाचे उत्पादन होते. हाच माल कंटेनरमध्ये भरुन समुद्रमार्गे जगभर पोहोचवला जातो. तसाच तो भारतातही येतो आणि इथून अन्यत्रही पोहोचवला जातो.
कारवाई का होत नाही?
महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा विचार केला तर सध्या दोन्ही स्तरावर अमली पदार्थविरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. राज्य सरकारने अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना संघटित गुन्हा मानून, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय जामीन मिळाल्यानंतरही अवैध कारवाया सुरू ठेवणाऱ्या सराईत अमली पदार्थ गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग (पीआयटी-एनडीपीएस) कायद्याचा सक्रियपणे वापर सुरु केला आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे सहा हजार कोटी किमतीचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स राज्य पोलिसांनी सुरू केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी राज्य सरकारने १९३३ ही हेल्पलाईनही कार्यान्वित केली आहे. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग आणि वरिष्ठांचा दबाव ही पोलिसांपुढे डोकेदुखी आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला मिळालेली माहिती योग्य असल्यास कुठेही जाण्याची मुभा हवी, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
nishant.sarvankar@expressindia.com
