Maharashtra health scheme for organ transplant आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी असणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवाशांना आता हृदय, फुप्फुस व यकृत प्रत्यारोपणासारख्या प्रगत उपचारांसाठी २० लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत मिळू शकणार आहे. दुर्मीळ आणि महागड्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत नागरिकांना पाच लाख, तर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. मात्र, आता या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्यारोपणासाठी २० लाखांपर्यंतची मदत मिळणार आहे. त्यासाठी निकष काय? जाणून घेऊयात…

प्रत्यारोपणासाठी मिळणार २० लाख रुपये

दोन योजनांच्या अंतर्गत शासनाकडून हृदय प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपये, फुप्फुस प्रत्यारोपणासाठी २० लाख रुपये, हृदय-फुप्फुस एकत्रित प्रत्यारोपणासाठी २० लाख रुपये, यकृत प्रत्यारोपणासाठी २२ लाख रुपये, अस्थिमज्जा (बोन मॅरो) प्रत्यारोपणासाठी १७ लाख रुपये व ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन/रिप्लेसमेंट (TAVI/TAVR) साठी २० लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. या संदर्भातील निर्णय १४ ऑक्टोबर रोजी शासनातर्फे जारी करण्यात आला आहे. विस्तारित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत २० टक्के निधी आता राज्य आरोग्य विमा सोसायटीच्या राखीव निधीत हस्तांतरित केला जाईल.

राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक व आयईसी प्रभारी डॉ. कैलास बाविस्कर म्हणाले, “महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार, १४ ऑक्टोबरपासून प्रत्यारोपण सेवा सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणारे पात्र रुग्ण या लाभाचा आनंद घेऊ शकतात.” पूर्वी, सरकार प्रत्येक पात्र कुटुंबाला १,३५६ उपचारांसाठी वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करत होते. परंतु, गंभीर आजारांसाठीच्या महागड्या शस्त्रक्रिया यातून वगळण्यात आल्या होत्या, त्यामुळे अनेक रुग्णांना पुरेशा आर्थिक मदतीविना आवश्यक उपचार मिळत नव्हते.

ही उणीव दूर करण्यासाठी, आरोग्य सेवा उपआयुक्तांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यास समितीने पाच लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या नऊ मुख्य आजारांसाठी विमा संरक्षण वाढवण्याची शिफारस केली होती. या प्रस्तावाला १५ सप्टेंबर २०२५ रोजी नियामक परिषदेने मान्यता दिली. त्यानंतर राज्य आरोग्य हमी संस्थेला या योजनांतर्गत मंजूर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च ‘कॉर्पस फंड’मधून पुरवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळाने हे उपचार करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधारित प्रोत्साहन भत्त्यांनाही मंजुरी दिली आहे.

हेही वाचा

पात्रतेचे निकष काय?

या दोन आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना आयुष्मान कार्ड किंवा रेशन कार्डसह वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्येष्ठ नागरिक कार्ड, बँकेचे फोटो पासबुक, माजी सैनिक ओळखपत्र आणि अपंगत्व प्रमाणपत्र स्वीकारले जाईल. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थीसाठी कोणतीही विशिष्ट वयोमर्यादा नाही; परंतु उत्पन्नाचे निकष लागू आहेत. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एल लाख रुपयांपर्यंत आहे, ते या योजनांसाठी पात्र आहेत. त्याबरोबरच लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजनांतर्गत मिळणारे उपचार पूर्णपणे ‘कॅशलेस’ असतात, ज्यामुळे पात्र कुटुंबांसाठी आरोग्य सेवा सुलभ आणि परवडणारी झाली आहे.

समाविष्ट उपचार आणि खर्चाची मर्यादा

  • यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant): २२ लाख रुपयांपर्यंत
  • फुप्फुस किंवा हृदय-फुप्फुस एकत्रित प्रत्यारोपण: २० लाख रुपयांपर्यंत
  • हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant): १५ लाख रुपयांपर्यंत
  • अस्थिमज्जा प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant): ९.५ ते १७ लाख रुपये
  • TAVI आणि TMVR प्रक्रिया: प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंत

योजनेची नोंदणी प्रक्रिया

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?

  • योजनेसंदर्भातील माहितीसाठी https://www.jeevandayee.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या
  • तिथे आपली माहिती भरून लॉग इन करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवा फॉर्म उघडेल.
  • त्या फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती भरा आणि स्कॅन करत कागदपत्रे सबमिट करा.
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करून लाभ मिळवू शकता.

ऑनलाइन आयुष्मान कार्ड काढण्यासाठी काय करावे?

  • ‘आयुष्मान’ ॲप डाऊनलोड करा.
  • तुम्ही गूगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाऊनलोड करू शकता किंवा सरकारी वेबसाईटला भेट देऊन कार्डासाठी अर्ज करू शकता.
  • ॲप डाऊनलोड केल्यावर मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा.
  • पात्रता तपासा.
  • पात्र असाल, तर आधार ई-केवायसी करा.
  • फोटो अपलोड करा आणि कार्ड डाऊनलोड करा