Govinda’s ‘cameo’ in Avatar Fire and Ash: हॉलिवूडमधील चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते. अवतार फायर अँड अॅश हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने ८८ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. हा चित्रपट अमेरिका आणि कॅनडामध्ये देशांतर्गत बॉक्स-ऑफिस चार्टवर अव्वल स्थानावर होता. त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचा आणखी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पहिल्या अवतारने २.९ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. त्यानंतर द वे ऑफ वॉटरने जगभरात २.३ अब्ज डॉलर्सची कमाई केली. त्यामुळे अवतारच्या या पुढील भागाकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. जगभरात चित्रपटाचे कथानक आणि परिणाम यांची चर्चा सुरू असली तरी भारतात मात्र प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची या चित्रपटातील भूमिका याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक क्लिप वायरल झाली आहे. यात गोविंदा अवतार: फायर अँड अॅशमध्ये कॅमिओ करताना दिसत आहे. परंतु, ही क्लिप त्या चित्रपटातील नाही. तरीही त्या क्लिपचा आणि चित्रपटाचा संबंध का जोडला जात आहे, याचाच घेतलेला हा आढावा.

गोविंदाच्या ‘कॅमियो’मागील सत्य

सध्या ऑनलाइन फिरणारा गोविंदाचा व्हिडिओ खरा नाही. तो एआयच्या मदतीने तयार केलेला आहे. या व्हिडिओचा फायर अँड अॅश या मूळ अवताराशी कोणताही संबंध नाही. संपादित केलेल्या या फूटेजमध्ये गोविंदा त्याच्या खास मुंबईच्या बोलीत बोलताना दिसत आहे. त्याच वेळी पाठीमागे जॅक सुली आणि त्याचे कुटुंब दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्ष चित्रपटात असे कोणतेही दृश्य नाही. म्हणजेच, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून केवळ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

इंटरनेटवरील प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी त्याची थट्टा करायला सुरुवात केली. कमेंट सेक्शनमध्ये विनोद आणि उपरोधिक कौतुकाचा पाऊस पडला. एका वापरकर्त्याने विचारले, “हे खरंच आहे का?” तर दुसऱ्याने लिहिले, “हे दृश्य पाहून अंगावर काटा आला,” त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. काही जणांनी तर हा सगळा प्रकार पूर्णपणे विनोद म्हणूनच घेतला. “हे अजिबात अपेक्षित नव्हतं, पण कॅमिओ आवडला,” अशी टिप्पणी एका युजरने केली. तर दुसऱ्याने गंमतीत लिहिले, “ओग परत आलाय, आधी अक्षय खन्ना आणि आता लॉर्ड गोविंदा.” चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा एआय प्रँक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला आणि पाहता पाहता तो सर्वाधिक व्हायरल मीम्सपैकी एक ठरला.

गोविंदाचे जेम्स कॅमेरॉनशी नाते

गोविंदाबाबत सध्या फिरणाऱ्या एआय व्हिडिओमागची कल्पना त्याने पूर्वी केलेल्या दाव्यांमधून निर्माण झाली असावी. गोविंदाने अनेक वेळा सांगितले आहे की, २००९ साली प्रदर्शित झालेल्या अवतार चित्रपटासाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता. गोविंदाच्या म्हणण्यानुसार, तो अमेरिकेत असताना त्याची ओळख एका सरदारजींशी झाली. त्यांना दिलेली एक व्यवसायिक कल्पना यशस्वी ठरली. काही वर्षांनंतर त्यांनीच गोविंदाची भेट दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनशी करून दिली. कॅमेरॉनने त्याला एका चित्रपटाची ऑफर दिली होती.

गोविंदाचा दावा आहे की, त्या चित्रपटातील नायक अपंग असल्याचे कळताच त्याने भूमिका नाकारली. त्यासाठी त्याला १८ कोटी रुपयांची ऑफर होती आणि सुमारे ४१० दिवस शूटिंग करावे लागणार होते. शरीरावर रंग लावून काम करावे लागेल, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल, अशी भीतीही त्याने व्यक्त केली होती. हा दावा त्याने याच वर्षी एका यूट्यूब मुलाखतीत केला होता.

गोविंदाने असेही सांगितले की, चित्रपटाचे नावसुद्धा त्यानेच सुचवले होते आणि नंतर ही ऑफर नाकारल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. कारण अवतार हा चित्रपट जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला. मात्र, गोविंदाचा दीर्घकाळचा सहकारी आणि निर्माता पहलाज निहलानी यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या मते, गोविंद कदाचित हॉलीवूडच्या अवतार चित्रपटाची गल्लत बॉलीवूडमधील एका जुन्या प्रोजेक्टशी करत असावा. निहलानी यांनी सांगितले की, ‘अवतार’ हे नाव ऐकून गोविंदाच्या मनात गोंधळ निर्माण झाला आणि त्यातून असे दावे पुढे आले.

अवतार या सिनेमालिकेचा प्रभाव

इतक्या मोठ्या आर्थिक यशानंतरही अवतारचा सांस्कृतिक प्रभाव किती आहे, यावर सतत चर्चा होते. एखाद्या चित्रपटाचा प्रभाव मोजण्यासाठी बॉक्स ऑफिस कमाई, डीव्हीडी/ ओटीटीवरील लोकप्रियता, सोशल मीडियावरील संदर्भ, मीम्स, फॅनफिक्शन, आणि सार्वजनिक चर्चांतील उल्लेख असे निकष वापरले जातात. संशोधनानुसार, अवतारने फॅनफिक्शन, GIFs किंवा ऑनलाइन चर्चांमध्ये इन्सेप्शन, टॉप गन किंवा स्टार वॉर्ससारख्या फ्रँचायझींइतकी ठळक छाप पाडलेली नाही. याचे एक कारण म्हणजे या सिनेमालिकेतील भागांमधील दीर्घ अंतर आणि पात्रांची तुलनेने मर्यादित गुंतागुंत.

अवतारची कथा प्रामुख्याने मानव आणि पँडोरावरील मूळ रहिवासी नावी यांच्यातील संघर्षाभोवती फिरते. ‘लोभी मानव विरुद्ध निष्पाप स्थानिक’ असा सरळ संघर्ष असल्याने अनेक पात्रे लक्षात राहत नाहीत, अशी टीकाही झाली आहे. फायर अँड अॅशमध्ये ‘वाईट’ नावी जमात दाखवून कथेला थोडी खोली देण्याचा प्रयत्न केला असला, तरी पात्रांभोवतीची चर्चा अद्याप मर्यादितच आहे.

मात्र, सांस्कृतिक चर्चेपलीकडे पाहिले तर अवतारचा सर्वात मोठा ठसा चित्रपट तंत्रज्ञानावर आहे. कॅमेरॉनने 3D सिनेमा, व्हर्च्युअल कॅमेरा, परफॉर्मन्स कॅप्चर आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये क्रांतिकारी बदल घडवले. पाण्याखालील शूटिंग आणि वास्तववादी डिजिटल जग उभे करण्यासाठी विकसित केलेली तंत्रज्ञान प्रणाली आजच्या आधुनिक सिनेमाचा पाया ठरली आहे. अनेक चित्रपटगृहांना डिजिटल प्रोजेक्शनकडे वळण्यास अवतारनेच चालना दिली.

पुढील अवतार ४ आणि अवतार ५ हे भाग अनुक्रमे २०२९ आणि २०३१ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. इंटरनेटवरील चर्चांपेक्षा, अवतार ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून चित्रपट निर्मितीच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरलेली आहे. म्हणजेच, सांस्कृतिक प्रभावाबाबत मतभेद असले तरी, सिनेमाच्या तांत्रिक आणि दृश्य भाषेवर अवतारचा प्रभाव अतिशय खोल आणि दीर्घकालीन आहे.

एकीकडे अवतार: फायर अँड अॅश जागतिक पातळीवर बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवत असताना, दुसरीकडे एआय-जनरेटेड व्हिडिओमुळे निर्माण झालेला गोविंदाचा ‘कॅमिओ’ हा प्रकार सोशल मीडियाच्या नव्या वास्तवाचे दर्शन घडवतो. हा प्रसंग केवळ एका अफवेपुरता मर्यादित नसून, डिजिटल युगात माहिती, करमणूक आणि गैरसमज किती वेगाने पसरू शकतात याचे उदाहरण आहे. अखेरीस, अवतार ही सिनेमालिका कथेपेक्षा तंत्रज्ञान आणि दृश्य भव्यतेसाठी ओळखली जाते, तर गोविंदाच्या नावाने व्हायरल झालेली क्लिप ही सिनेमापेक्षा इंटरनेट संस्कृतीचीच निर्मिती असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रेक्षकांनी व्हायरल कंटेंटकडे पाहताना उत्सुकतेबरोबर जागरूकतेचीही गरज आहे, हेच या सगळ्या चर्चेचे खरे सार म्हणावे लागेल.