अमेरिका व इस्रायलने इराण विरोधात २८ फेब्रुवारी पासून युद्ध पुकारले आहे. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कच्चे तेल व गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या युद्धात सहभागी देशांनी त्यांच्या नेव्हीगेशन यंत्रणेत बिघाड झाल्याचे अनुभवले आहे. त्यामुळे जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप करून होर्मुझ सामुद्रधुनीत जीपीएस जॅमिंग, जीपीएस स्पुफिंग केले जात आहे. जीपीएस जॅमिंग व स्पुफिंग म्हणजे नेमकं काय? त्याचा जहाजांवर काय परिणाम झाला? याबाबत जाणून घेऊयात.
होर्मुझ सामुद्रधुनी काय आहे? ती कुठे आहे?
होर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गातून तेलाची वाहतूक केली जाते. होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. ही सामुद्रधुनी सुरू होते व जिथे संपते त्याठिकाणी ५० किमी रूंद आहे. तर अरबी समुद्र व गल्फला जोडणाऱ्या भागात ती ३३ किमी रूंद आहे. ही सामुद्रधुनी अत्यंत खोल असल्याने मोठ्या जहाजांसाठी हा मार्ग महत्वाचा ठरतो. २०२५ मध्ये होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज तेलाचे २० दशलक्ष बॅरल जहाजांमार्फत वाहून नेण्यात आले. दरवर्षी या सामुद्रधुनीतून ६०० अब्ज डॉलरचा व्यापार होतो. या मार्गाने युरोप तसेच आशियातील भारत, चीन या देशांना तेल, गॅस पुरवठा केला जातो. होर्मुझ सामुद्रधुनीतून फक्त इराणमधूनच तेल येत नाही, तर इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई या देशांतील तेल देखील या मार्गाने जगभरात पोहोचवले जाते.
जीपीएस जॅमिंग आणि स्पुफिंग
विमान व जहाजांकडून ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिमचा (GNSS) वापर केला जातो. याचा वापर करून विमान व जहाजांना त्यांचे स्थान (Position), मार्गक्रमण (Navigation) आणि वेळ (Timing) यांबाबत माहिती मिळते. जीएनएसएस म्हणजेच जीपीएस हे अमेरिकेने तयार केलेले आहे. परंतु, काही देशांनी त्यांचे स्वतंत्र जीपीएस तयार केले आहेत. उदा. युरोपचे गॅलिलिओ, रशियाचे ग्लोनास्स, चीनचे बेईदौ आणि भारताचे नाविक.
विमान व जहाजांमध्ये GNSS सिग्नल रिसिव्हर बसवलेले असतात. हे रिसिव्हर अचूक असतात. परंतु, त्यांवर दिले जाणारे सॅटेलाइट नेव्हिगेशन सिग्नल मात्र कमजोर असतात. त्यामुळे त्यात इलेक्ट्रोनिक हस्तक्षेप करून छेडछाड केली जाते. हा एक प्रकारचा विमान व जहाजांवर केला जाणारा सायबर हल्ला असतो. दरम्यान, जीपीएस जॅमिंग व स्पुफिंग यांमध्ये फरक आहे.
जीपीएस जॅमिंग व जीपीएस स्पुफिंग म्हणजे काय?
जीपीएस जॅमिंगमध्ये जॅमरया उपकरणाचा वापर केला जातो. कमजोर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीवर नॉइज वाढवला जातो. त्यामुळे सिग्नल जीपीएस रिसिव्हरपर्यंत पोहोचत नाही. पर्यायाने जहाज किंवा विमानाला त्याचे स्थान, मार्ग, वेळ याबाबत माहिती मिळत नाही. जीपीएस स्पुफिंगमध्ये जीपीएस सिग्नल हॅक केला जातो. सिग्नल हॅक करून लोकेशनबाबत चुकीची माहिती पायलटला दिली जाते. जीपीएस स्पुफिंग हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. जहाज व विमानाची दिशाभूल करण्यासाठी पायलटला खोटी माहिती दिली जाते. यामुळे अनेकदा विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलचा गोंधळ उडतो. तसेच अपघात होण्याची शक्यतादेखील वाढते.
इराणवर संशय
वाइंडवार्ड या मरिटाइम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील १६५० जहाजांमध्ये ७ मार्च रोजी जीपीएस यंत्रणा हॅक किंवा त्यात इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप झाल्याची नोंद आहे. सौदी अरेबिया, कुवैत, यूएई, कतार, ओमान आणि इराण यांच्या समुद्रात व जमिनीवर ३० ठिकाणी जीपीएस जॅमर असल्याचे समोर आले आहे. जीपीएस स्पुफिंगमुळे चुकीची माहिती जहाजांना दिली जाते. त्यामुळे अनेक जहाज आहे त्या ठिकाणीच थांबल्या आहेत. खोट्या माहितीने जहाज एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडू शकते. या धोक्यामुळे जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, जीपीएसमध्ये छेडछाड करण्यात नेमकं हात कोणाचा, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, संशय इराणवर घेतला जात आहे, असे बीबीसीने म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी काही दिवसांपूर्वी दिली होती.
ड्रोन, मिसाईलचेही जीपीएस हॅक
युद्धात जीपीएसमध्ये हस्तक्षेप करून त्यात छेडछाड होणे हे काही नवीन नाही. ड्रोन व मिसाइलने अचूकपणे लक्ष्य भेदावे म्हणून त्यात जीपीएसचा वापर केला जातो. या जीपीएसला हॅक करून ड्रोन व मिसाइलची दिशाभूल केली जाते. रशिया-युक्रेन युद्धात ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. या युद्धात ड्रोनमधील जीपीएस हॅक झाल्याचे दिसून आले. जून २०२५ मध्ये इस्रायल-इराणमध्ये संघर्ष सुरू होता. त्यावेळी देखील जीपीएस जामरचा वापर करण्यात आला होता. जीपीएस हॅक झाल्यास ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिमचा वापर विमान व जहाजांमध्ये केला जातो.
भारतातही जीपीएसमध्ये इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप झाल्याचे दिसून आले होते. विमानतळ यंत्रणा आद्यायावत करताना इस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम बंद पडली होती. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली होती. नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जीपीएसमध्ये हस्तक्षेप झाल्याच्या ४६५ घटना सीमावर्ती भागात घडल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले होते. जम्मू व अमृतसर येथे सर्वाधिक जीपीएसमध्ये हस्तक्षेप आढळून आला होता. जीपीएस स्पुफिंगमुळे अमेरिकेचे जीपीएस वापरणे अनेक शिपींग कंपन्यांनी बंद केले आहे. भारतीय लष्कराकडून भारतीय बनावटीच्या नाविक (NavIC) चा वापर केला जातो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) नाविक ही नेव्हिगेशन यंत्रणा विकसित केली आहे. याचा वापर करून लोकेशन, वेळ याबाबत भारतात अचूक माहिती मिळते. तसेच भारताच्या सीमेबाहेरील १५०० किमी पर्यंतची नेव्हिगेशन माहिती नाविकवर मिळते.
