भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये वाढते हवा प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनविषयक विकारांचा सामना करावा लागत आहे. एरवी हिवाळ्यात उद्भवणारी ही समस्या आता उन्हळ्यातही दिसून येते. त्याबरोबरीने आता जमिनीवरील वाढते ओझोन प्रदूषण आता नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या समस्यांमध्ये आता ओझोन प्रदूषणाने आणखीन भर घातली आहे.
आता उन्हाळ्यातही प्रदूषण?
साधारणपणे हिवाळ्याच्या दिवसात वाऱ्यांचा वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेल्या प्रदूषकांचा निचरा लवकर होत नाही. परिणामी हवा प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, हिवाळा ऋतू संपून उन्हाळा ऋतू सुरू झाला की वाऱ्यांचा वेग वाढतो. जोरदार वाऱ्यांमुळे वातावरणात साचलेली प्रदूषके विखुरली जातात आणि हवा प्रदूषणापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळतो. सध्या मात्र उन्हाळाच्या दिवसात नागरिकांना हवा प्रदूषणापासून दिलासा मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जमिनीवरील ओझोनचे वाढते प्रमाण आता हवा प्रदूषणावर थेट परिमाण करीत आहे. ओझोनमुळे श्वसनमार्गांमध्ये दाह निर्माण होण्यासोबतच फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवरही परिमाण होऊ शकतो.
उष्णतेमुळे ओझोन तयार होण्याचा वेग अधिक
भारतातील ओझोन प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली येथील ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेने १ मार्च ते १० मे २०२६ या कालावधीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) २५ प्रमुख शहरांमधील आकडेवारीचे विश्लेषण केले. यातून भारताच्या हवा प्रदूषणात जमिनीवरील ओझोन परिणाम करीत असल्याचे समोर आले आहे. उष्णतेमुळे ओझोन तयार होण्याचा वेग वाढतो त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ओझोन प्रदूषण ही आता नियमित बाब झाली असून २५ पैकी १५ शहरात ओझोनचे सरासरी प्रमाण हे सीपीसीबीच्या ठरवून दिलेल्या प्रमाणाहून अधिक आहे. ओझोन हा अत्यंत प्रतिक्रियाशील आणि विषारी वायू असल्याने त्याचे मोजमाप आठ तासांच्या कमाल सरासरीवर आधारित केले जाते. याउलट धूलिकण प्रदूषणाचे मोजमाप २४ तासांच्या सरासरीने केले जाते.
जमिनीवर ओझोनची निर्मिती कशी?
मुंबई, पुणे यांसह राज्यातील हवा प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर प्रश्न होताना दिसत असून नागरिकांना दीर्घकाळ प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. हवा प्रदूषणामुळे होणारे परिणाम लगेच दिसून येत नाही. मात्र, हे परिणाम आरोग्यावर दीर्घकाळ परिमाण करतात असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्यास हानिकारक असणाऱ्या पीएम २.५ आणि पीएम१० धुलिकण हे वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण, कारखाने आणि बांधकाम स्थळांवरील प्रदूषण यामुळे हवेत पसरतात. तसेच डिझेलवर चालणारे जनरेटर, कचरा जाळण्यामुळे आणि वाहने आणि कारखान्यातील प्रदूषणामुळे नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साइड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे (व्हीओसी) यांसारखी प्रदूषके वातावरणात पसरतात. ही प्रदूषके खालच्या वातावरणात एकत्र येतात. तीव्र उष्णता आणि सूर्याच्या अतिनील किरणांच्या प्रभावामुळे त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन त्यातून ओझोनची निर्मिती होते. यालाच ग्राउंड-लेव्हल ओझोन असेही म्हणतात.
संशोधन अहवाल काय सांगतात?
‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५’ च्या अहवालानुसार, ओझोन प्रदूषणाचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. धुलिकणांमुळे नागरिकांच्या आरोग्यास सर्वाधिक धोका असला तरीही जमिनीवरील वाढता ओझोन आता श्वसनविकारांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये जगभरात दीर्घकाळ ओझोन प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने सुमारे ४ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज आहे. भारतातही ही संख्या मोठी आहे. प्रदूषकांचे वाढते प्रमाण, सूर्यप्रकाशाची वाढती तीव्रता आणि त्यामुळे होणारे तापमान वाढ यामुळे भारतात हवा प्रदूषणाचा धोका वाढत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात श्वसनविकारात वाढ
जमिनीवरील वाढत्या ओझोन प्रदूषणामुळे श्वसनविकारात वाढ झाली आहे असे अभ्यासकांचे मत आहे. तीव्र उष्णतेमुळे दम्यासारख्या विकारांमध्ये वाढ होताना दिसते. या घटनांचा आणि ओझोन प्रदूषणाचा थेट संबंध आहे का ते तपासण्यासाठी शहरनिहाय अभ्यासाची गरज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. यापूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात साधारणपणे श्वसनविकार असलेल्या रुग्नांणा हवा प्रदूषणात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळत असे, मात्र आता श्वसनविकारांची तीव्रता वाढत असून त्यामुळे औषधाचे प्रमाण कमी करणे शक्य होत नाही, असे निरीक्षणही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ नोंदवितात.
