बेसुमार उपसा आणि कमी पाऊस यामुळे राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २२३ तालुक्यांमध्ये भूजल घसरले आहे. यातील २६ तालुक्यांतील परिस्थिती भीषण, तर ४२ तालुक्यांत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळदाह जसाजसा वाढतो आहे, तसतसे मराठवाड्यासह राज्यात विंधनविहिरी घेणारी यंत्रे वाढू लागली आहेत. पाणी विक्री वाढते आहे. अनिर्बंध पाणी उपशावर नियंत्रण मात्र कोणाचेही नाही.

भूजलाची स्थिती काय?

राज्यात सप्टेंबर महिन्यात ३ हजार ६४६ विहिरींची पाणीपातळी तपासल्यानंतर त्याची तुलना गेल्या दहा वर्षांतील भूजलाशी केल्यानंतर सर्वाधिक भूगर्भातील पाणी घसरण असणाऱ्या तालुक्याचे नाव धाराशिव जिल्ह्यातील लोहारा. दुष्काळदाह वाढतो आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हाच एकमेव पर्याय असेल, असे चित्र ६८ तालुक्यांमध्ये असू शकेल. ते अधिक तीव्र होण्याचा कालावधी दीपावलीनंतर असेल. एखादे चक्रीवादळ आले, तरी पाऊस येईल का, याची आजही वाट पाहिली जाते. मराठवाड्यातून धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सरासरी ६०० आणि सर्वाधिक ८५० फूट खोलीपर्यंतच्या विंधनविहिरी घेण्यात आल्या आहेत. भूपृष्ठावरील पाणी आटत चालले आहे, उपसा वाढतो आहे. धाराशिव जिल्ह्यात केवळ पाच टक्के पाणी शिल्लक आहे. खरे तर मराठवाड्यातील ज्या तालुक्यांमध्ये भूजल खूप घटले आहे, अशा तालुक्यांमध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. मराठवाड्यातील ८७५ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर सरासरी ४.७४ मीटरची घसरण दिसून आली आहे.

महाराष्ट्राची वाटचाल वाळवंटीकरणाच्या दिशेने?

सर्वसाधारणपणे टंचाई आराखडे बनवण्यासाठी पाच वर्षांच्या भूजलाची सरासरी पूर्वी गृहीत धरली जात असे. या वर्षी गेल्या दहा वर्षांतील सरासरी गृहीत धरून पाणीपातळी मोजण्यात आली आहे. मराठवाड्यात गेली चार वर्षे अतिवृष्टीची होती. २०१८ ते २०२६ या कालावधीमधील भूजलाच्या निर्देशांकांची तुलना करता २०१८ मध्ये गंभीर भूजल असणारे सात तालुके होते. आता यात मोठी वाढ झाली असून, आठ वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळातील भूजलाचा निर्देशांक भीषण स्थितीमध्ये म्हणजे ०.६० पेक्षा कमी झाला आहे. ही महाराष्ट्राच्या वाळवंटीकरणाची प्रक्रिया असल्याचे काही जलअभ्यासक सांगू लागले आहेत.

पहिली विंधन विहीर कधी घेतली गेली?

आंतरराष्ट्रीय विकास संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील करारानुसार १९७२ मध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अर्थात जीएसडीए हा विभाग सुरू करण्यात आला. हे वर्षही दुष्काळाचे होते. याच काळात मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात ‘वॉर ऑन वॉंट’ ही ग्रामीण विकास आणि गरिबी निर्मूलन या क्षेत्रात काम करत होती. या संस्थेकडे काही रिग्ज् म्हणजे विंधन विहीर पाडण्याचे यंत्र होते. काही जलक्षेत्रातील अभ्यासकांच्या मते ‘युनिसेफ’कडून सरकारला काही यंत्रे मिळाली होती. यातील एक यंत्राने निलंगा तालुक्यातील याकतपूर नावाच्या पहिली विंधन विहीर घेतली. काहींच्या मते जालना जिल्ह्यात विंधन विहीर घेतली. तोपर्यंत विहीर हाच पाणी उपसा करण्याचे खासगी स्रोत होते. १९८० नंतर यात मोठा फरक पडला. याच काळात ऊस लागवड वाढू लागली. पुढे पीक पद्धतीच ऊस या पिकाभोवती केंद्रित झाली. आता प्रतिएकर दोन विंधनविहिरी घेतल्या जात आहेत. काही जणांनी १५ एकरांत ४७ विंधन विहिरी घेतल्या आहेत. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात याची खोली ८०० ते ९०० फूट एवढी आहे. परिणामी उपसा वाढला आहे.

पाणी बाजार कसा फुलतो आहे, त्याची कारणे कोणती?

जसजसे ऊस पीक वाढत गेले तसतसे विंधनविहिरी वाढत गेल्या. याची संख्या किती याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. ना खणलेल्या विंधनविहिरींची ना आटलेल्या. दक्षिणेतील राज्यातून विंधन विहिरी खणण्यासाठी रिग्ज् येतात. याचे दर पहिल्या ६० फुटांपर्यंत ६५ रुपये; मग पुढे प्रत्येक फुटास दहा रुपयांची वाढ. हा भाव ३०० फुटांच्या पुढे २० रुपयांनी वाढत जातो. मराठवाड्यात साधारण सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत एक विंधनविहीर खणली जाते. विहीर खणायची असेल, तर किमान आठ ते नऊ लाख रुपये लागतात. यामुळेही विंधनविहिरी वाढू लागल्या. आता अधिक खोलवर जाणारी प्रति चौरस इंच दाब अधिक देणारे यंत्रे विकसित झाले आहे. परिणामी अधिक खोलीवरून पाणी उपसा करता येताे. ऊस हे पीक अधिक घेता यावे, तसेच पाणी पुरवठ्याच्या अर्धवट योजना हे पाणी बाजार बहरण्याची मुख्य कारणे आहेत. फक्त मराठवाड्यातील दुष्काळी पट्ट्यात ७ हजार ३७४ योजनांसाठी १२ हजार ५०४ कोटी रुपयांची गरज होती. या योजनांवर आतापर्यंत ६९७८ कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि ५५२६ कोटी रुपयांची गरज आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याच्या योजना रखडल्या. छत्रपती संभाजीनगरसारख्या शहराची योजना तर गेली २० वर्षे सुरूच झाली नाही. मग नागरिकांना विंधन विहिरीतून पाणी विकणाऱ्यांची एका गल्लीत एक या प्रमाणात खूप सारी दुकाने उघडली. ती किती आहेत, हे सरकारला माहीत नाही. आता प्रत्येक ‘जार’साठी ४० रुपये देणारे नागरिक प्रत्येक घरी आहेत. लातूरसारख्या शहरात घरोघरी विंधन विहीर आहे. घर बांधताना विंधन विहीर हा पहिला टप्पा झाला आहे. पाणी बाजार हा असा फुलतो आहे. आता तर गावोगावी एक घागर पाणी घ्यायचे असेल तर दहा रुपये असा दर बीड जिल्ह्यातील पाटोद्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा विस्कळीत ठेवण्याच्या शासकीय वृत्तीमुळे पाणी बाजार फुलला आहे, असे जलतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

विंधन विहिरीच्या पाण्याचा दुष्काळग्रस्तांवर परिणाम किती ?

गेल्या २५ वर्षात मराठवाड्यात चार वेळा दुष्काळ पडले. या वेळी त्याची तीव्रता एल निनो मुळे अधिक आहे. यामुळे अधिक खोलीवरचे पाणी उपसून ते पिल्यामुळे मराठवाड्यात मूत्रपिंडाचे विकार अधिक आहेत. मूतखडा तसेच अयोग्य पाणी पिण्याचे आरोग्यावर मोठे घातक परिणाम दिसून येतात. पण हे सारे घडत असतना मराठवाड्यात आजही ५४ साखर कारखाने आहेत. काही बीअर उत्पादक कंपन्या आहेत आणि नदीकिनारी ऊस बहरतो आहे. या रचनेमुळे खोल जाणारे भूजल अधिक घसरणीला लागले आहे. दुष्काळ पडतच असतो. विंधन विहिरी घ्यायला हव्यात, हे सूत्र मानसिकतेत रुजले असल्याचे दिसून येते.

suhas.sardeshmukh@expressindia.com