अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारीला देशांतर्गत बाजारपेठेत सोने, चांदीच्या दरात विक्रमी दरवाढ नोंदवली गेली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही धातूंचे दर कमी झाले असले, तरी अस्थिरता कमालीची वाढली आहे. पाडव्याला सोने-चांदी खरेदी करावे की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत ग्राहक दिसून येत आहेत.
आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर दर कसे?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत २७ फेब्रुवारीपर्यंत २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६३,८७३ रुपयांपर्यंत होते. तर चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,८०,१६० रुपयांपर्यंत होते. अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमधील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण बाजारपेठ २८ फेब्रुवारीला अचानक मोठी उलथापालथ झाली. तब्बल १२ हजारांनी वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर १,७५,९२४ रुपयांपर्यंत वधारले, तर २३ हजारांनी वाढ झाल्याने चांदीचे दर ३,०३,८५० रुपयांपर्यंत वधारले. दोन्ही मौल्यवान धातूंत एकाच दिवसांत मोठी दरवाढ झाल्याने खळबळ उडाली.
अर्थात, मार्च महिना सुरू झाल्यावर जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे सोने-चांदीचे दर पुन्हा खाली आले. त्यानंतर सलग आठवडाभर दोन्ही धातूंची घसरण सुरूच राहिली. सात मार्चपासून दर थोडे सावरता दिसले; मात्र, सतत चढउतार सुरू राहिल्याने ते मर्यादितच राहिले. पाडवा दोन दिवसांवर आला असताना, १७ मार्चलाही सोन्याचे दर १,६१,७१० आणि चांदीचे दर २,७२,९५० रुपयांपर्यंतच होते.
अस्थिरतेचे कारण काय?
जागतिक स्तरावर युद्ध किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाली की सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीच्या किमती वाढतात, असा पारंपरिक अनुभव आहे. मात्र, सध्याच्या पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत या समजुतीला छेद देणारे चित्र दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात फार काही दखलपात्र वाढ झाली नसल्याचे दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत असली, तरी अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. डॉलर निर्देशांक सातत्याने मजबूत होत असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष डॉलरकडे वळत आहे.
परिणामी सोन्या-चांदीच्या दरातील वाढ मर्यादित राहून उलट घसरणीचा कल दिसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही या जागतिक घडामोडींचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, डॉलरची ताकद आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे स्थानिक बाजारातील मौल्यवान धातूंचे दर कमी झाले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून विशेषतः लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीला चालना मिळत आहे.
यापुढे चित्र कसे असेल?
सुवर्ण व्यवसायातील जाणकारांच्या मते, सध्याची परिस्थिती ही पारंपरिक ‘सुरक्षित गुंतवणूक’ संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. जागतिक आर्थिक घटक, चलन बळ आणि गुंतवणूकदारांचा बदलता दृष्टिकोन यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी वाढत असतानाही किमतीत अपेक्षित तेजी दिसून आलेली नाही.
अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या दरवाढीवर स्पष्ट मर्यादा येत आहे. सामान्यतः तणावाच्या काळात गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळतात, मात्र सध्या डॉलर निर्देशांक मजबूत होत असल्याने सोन्याच्या किमतींना अपेक्षित पाठबळ मिळालेले नाही. डॉलरमध्ये गुंतवणूक अधिक आकर्षक ठरत असल्याने सोन्यावरील दबाव कायम आहे.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने कठोर धोरण कायम ठेवले, तर डॉलर अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे, ज्याचा दबाव सोन्यावर कायम राहू शकतो. याउलट, फेडने नरमाईची भूमिका घेतल्यास सोन्याला काहीसा आधार मिळू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्याच्या किमतींसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचा सल्ला काय?
जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण मानली जाणारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक १७ मार्चपासून सुरू होत असून, १८ मार्च रोजी तिचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत सोन्या-चांदीच्या बाजारात गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या बैठकीत फेडकडून व्याजदर कपातीची शक्यता कमीच आहे. त्यामुळे डॉलर मजबूत राहण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर आगामी काळात होऊ शकतो. भू-राजकीय तणाव कायम असतानाही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता मात्र तज्ज्ञांनी फेटाळली आहे.
दुसरीकडे, अल्पकालीन काळात किमती मर्यादित पट्ट्यातच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बाजारात मोठी तेजी किंवा मंदी न दिसता स्थिरतेचा कल कायम राहू शकतो. गुंतवणूकदारांसाठीही तज्ज्ञांनी सावधगिरीचा सल्ला दिला आहे. किमतीत किरकोळ घसरण झाल्यास घाबरून सोन्याची विक्री करण्याऐवजी दीर्घकालीन गुंतवणूक धोरणावर भर देणे अधिक योग्य ठरेल. एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
patil.jitendra@expressindia.com
