सध्याच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या काळात सर्व काही वेगाने खेळण्यावर अवलंबून असते. त्यामुळे फलंदाजांना आक्रमक खेळ करावा लागतो. मात्र, जो फलंदाज धिम्या गतीने फलंदाजी करत असल्यास त्याला संघाकडून ‘रिटायर्ड आउट’ म्हणजे ‘माघारचीत’ केले जाते. नक्की ‘माघारचीत’ म्हणजे काय, फ्रँचायझी संघांसाठी हा नियम  कोणत्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. याचा घेतलेला हा आढावा.

‘माघारचीत’ होण्याचा नियम काय आहे?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार पंचांची परवानगी न घेता किंवा कोणतीही दुखापत नसतानाही माघारी बोलावण्यात येणाऱ्या खेळाडूला ‘माघारचीत’ (रिटायर्ड आऊट) समजले जाते. फलंदाजाला माघारी परतण्यासाठी म्हणजेच मैदान सोडण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराचीही परवानगी घ्यावी लागत नाही. मैदान सोडणाऱ्या फलंदाजाची नोंद ही ‘माघारचीत’ अशीच  केली जाते आणि कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात त्याची नोंद होत नाही. ‘आयसीसी’चा हा नियम त्यांच्या नियमांचे पालन करणाऱ्या सर्व स्पर्धांना लागू होतो. याचा सर्वाधिक वापर आपल्याला ‘पॉवर हिटिंग’ म्हणून समजल्या जाणाऱ्या ट्वेन्टी-२० प्रारूपात पाहायला मिळत आहे.

‘डब्ल्यूपीएल’मध्ये प्रथमच खेळाडू ‘माघारचीत’

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सामन्यात गुजरातची आयुषा सोनी ‘माघारचीत’ झाली. ‘डब्ल्यूपीएल’मधील ही पहिलीच घटना ठरली. सोनी सहाव्या स्थानावर फलंदाजी करण्यास उतरली होती. मात्र, तिला अपेक्षित वेगाने खेळ करता येत नव्हता. डावाच्या १६व्या षटकात गुजरातची धावसंख्या १३५ होती, तेव्हा सोनीने १४ चेंडूंत ११ धावाच केल्या होत्या. याच वेळी धावांची गती वाढविण्याच्या दृष्टीने तिला ‘माघारचीत’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोनीचा ‘डब्ल्यूपीएल’मधील हा पहिलाच सामना होता. जायबंदी अनुष्का शर्माच्या जागी तिला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले होते. जगभरातील महिलांच्या फ्रँचायझी ट्वेन्टी-२० लीगमधील ही केवळ दुसरीच घटना आहे. यापूर्वी, २०२४ मध्ये ‘द हंड्रेड’मध्ये मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळताना नॉर्दर्न सुपरचार्जर्सविरुद्ध कॅथरीन ब्रायस हिला ‘माघारचीत’ करण्यात आले होते.

लीग क्रिकेटमध्ये ‘माघारचीत’ निर्णायक?

‘माघारचीत’ नियम हा प्रत्येक संघ सामन्यातील परिस्थितीनुसार वापरू शकतो. या नियमामुळे संथ खेळत असलेल्या फलंदाजाला माघारी बोलवून अन्य फलंदाजाला मैदानात धावांची गती वाढविण्याच्या दृष्टीने पाठवले जाते. त्यामुळे या नियमाला फ्रँचायझी ट्वेन्टी-२० लीगमध्ये महत्त्व आहे. ‘माघारचीत’ नियमाचा अवलंब केल्यानंतर संघाच्या रणनीतीनुसार, गरजेनुसार वेगाने धावा करणारा फलंदाज मैदानात येऊ शकतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ‘पॉवर हिटर’ या अखेरच्या षटकांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये चेंडूंचे महत्त्व खूप असल्याने असे खेळाडू धावसंख्या वाढविण्यास साहाय्य करतात. ‘डब्ल्यूपीएल’मधील उदाहरण पाहायचे झाल्यास सोनीला ‘माघारचीत’ केल्यानंतर भारती फुलमाळी फलंदाजीसाठी उतरली. तिने या संधीचा फायदा घेत १५ चेंडूंत ३६ धावा केल्या. त्यामुळे संघाला १९०हून अधिकची धावसंख्या उभारता आली.

कोणते खेळाडू ‘माघारचीत’?

मुंबई इंडियन्सकडून गेल्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळताना तिलक वर्माला ‘माघारचीत’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात, मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यानुसार ‘माघारचीत’ होण्याचा निर्णय हा तिलकचा होता. यामुळे ‘आयपीएल’मध्ये ‘माघारचीत’ होणाऱ्या फलंदाजांमध्ये तिलक वर्माच्या रूपाने आणखी एका खेळाडूची भर पडली. यापूर्वी, २०२२ मध्ये रविचंद्रन अश्विन राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ‘माघारचीत’ होणारा ‘आयपीएल’मधील पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर साई सुदर्शन, अथर्व तायडे, डेव्हॉन कॉन्वे हेदेखील ‘माघारचीत’ झाले होते. वर्षाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत ट्वेन्टी-२० प्रारूपात सहा फलंदाज ‘माघारचीत’ झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंडमधील सुपर स्मॅशमध्ये एकाच डावात दोन वेळा खेळाडू ‘माघारचीत’ होण्याची घटना घडली. तसेच, बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला ‘माघारचीत’ व्हावे लागले होते. भूतानचा सोनम तोबगे २०१९ मध्ये मालदीवविरुद्ध खेळताना ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ‘माघारचीत’ होणारा पहिला खेळाडू ठरला. तसेच, नामिबियाचा निकोलस डेव्हिन २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात ‘माघारचीत’ होणारा पहिला फलंदाज ठरला.

संपूर्ण ‘यूएई’ संघ ‘माघारचीत’!

गेल्या वर्षी झालेल्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचकासाठीच्या आशियाई पात्रता सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) संपूर्ण संघ कतारविरुद्धच्या सामन्यात ‘माघारचीत’ठरल्याची घटना आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमिराती संघाचे सलामी फलंदाज ईशा रोहित ओझा (११३) आणि तीर्था सतीश (७४) यांनी १९२ धावांची भागीदारी रचली. १६ षटकांतच १९२ केल्यानंतर या संघाने पुढे फलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला. एकही फलंदाज फलंदाजीला न आल्यामुळे संपूर्ण संघ ‘माघारचीत’ असे ठरविण्यात आले. कतारसमोर १९३ धावांचे आव्हान कायम ठेवण्यात आले. क्रिकेट इतिहासात संपूर्ण संघ ‘माघारचीत’ होण्याची घटना पहिल्यांदाच घडली. आव्हानाचा पाठलाग करणारा कतार संघ ११.१ षटकांत अवघ्या २९ धावांवर आटोपला. मात्र, अमिरातीचे असे करण्यामागचे कारण हे बँकॉकमधील वातावरण होते. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता होती. त्यामुळे पूर्ण गुण मिळवण्याच्या रणनीतीने अमिरातीने ‘माघारचीत’चा निर्णय घेतला.