अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणकडून आखाती देशातील अमेरिकेच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीची झळ कोकणातील अर्थव्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे. कोकणातील मत्स्यव्यवसाय आणि हापूस आंब्याच्या निर्यातीवर या युद्धाचा विपरीत परिणाम होत आहे. तर दुसरीकडे आखाती देशात कार्यरत असलेल्या नोकरदारांनाही युद्धपरिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोकण आणि आखाती देश संबध
कोकणातून दरवर्षी हजारो तरुण नोकरी व्यवसायासाठी परदेशात स्थलांतरित होतात यात त्यांची पहिली पसंती आखाती देशांना असते, प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, कतार या देशात महाराष्ट्रातून रोजगारासाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण अधिक आहे. रोजगाराच्या मुबलक संधी, चांगला मोबदला, आयकरातून मिळणारी सूट ही आखाती देशांत स्थलांतरित होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्रातून जवळपास ८ ते १० लाख नागरिक आखाती देशात नोकरी व्यवसायानिमित्ताने स्थायिक आहेत. त्यात कोकणातील नागरिकांची संख्या मोठी आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, रोहा, पोलादपूर, मुरुड तालुक्यातील मुस्लिमबहुल परिसरातील कुटुंबातील किमान एक सदस्य आखाती देशांमध्ये रोजगारासाठी गेलेला आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, खेड रत्नागिरीमधून आखाती देशात स्थायिक असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम काय?
आखाती देशात स्थायिक असलेले हे नागरिक मोठा निधी आपल्या गावी पाठवत असतात. या पैशातून कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. घरबांधणी, शिक्षण, स्थानिक गुंतवणूक आणि पर्यटन व्यवसायात गुंतवणूक केली जाते. युद्ध परिस्थितीमुळे आखाती देशातील रोजगार अडचणीत येऊ शकतात. तसे झाल्यास त्याचा फटका कोकणातून स्थलांतरित झालेल्या तरुणांना बसू शकतो, त्याची झळ कोकणातील अर्थव्यवस्थेलाही बसू शकते. त्यामुळे आखाती देशात काम करणाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक तरुणांनी आखाती देशांमधून कोकणात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आंबा निर्यातीलाही झळ?
कोकणातील आंबा निर्यातीवरही आखाती देशातील युद्धाचे ढग दाटले आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १ लाख ८२ हजार हेक्टरवर आंबा लागवड करण्यात आहे. ज्यातून दरवर्षी साधारणपणे ३ लाख ८ हजार ४८० टन आंबा उत्पादन होते. कोकणातील एकूण आंबा उत्पादनापैकी जवळपास ४० टक्के आंबा हा मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत परदेशात निर्यात केला जातो. यातील ३० टक्के आंबा हा आखाती देशांमध्ये जातो. दरवर्षी साधारणपणे एप्रिल महिन्यात या निर्यातीला सुरुवात होते. पण सध्या ही निर्यात बाधित झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास कोकणील हापूस आंबा निर्यातीलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. निर्यात ठप्प झाली तर स्थानिक बाजारातच आंबा विक्री करण्याची वेळ बागायतदार आणि वितरकांवर येणार आहे. ज्यामुळे दर पडण्याची धास्ती आहे. दुबई, बहारिन, कतार, कुवेत, सौदी अरेबिया आणि जॉर्डन येथून कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी असते. पण युद्धस्थिती कायम राहिल्यास आंबा निर्यात कठीण होणार आहे.
मासेमारी व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग
आखाती युद्धाची झळ कोकणातील मत्स्य निर्यातीलाही पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी युरोप, अमेरिका, जपान, चीन यासह आखाती देशात जवळपास ६० हजार टन प्रक्रिया केलेली मासळी निर्यात केली जाते. यात कोकणातील १५ ते १६ हजार टन मासळीचा समावेश असतो. बांगडा, सुरमई, बगा, माकूळ आणि कोळंबी हे मासे प्रामुख्याने निर्यात केले जातात. पण युद्धामुळे त्याची झळ मत्स्य उत्पादन आणि निर्यातीवर होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. आखाती देशात निर्यात होणाऱ्या माशांचे प्रमाण कमी असले तरी इंधन तुटवडा निर्माण झाल्यास मत्स्य उत्पादन आणि निर्यातही बाधित होण्याची भीती मत्स्यप्रक्रिया उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.
इतर परिणाम कोणते?
रायगड जिल्ह्यातील जेएनपीए बंदरातून आखाती देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यात कृषीमालाचा मोठा वाटा असतो. कांदा, डाळिंब, कलिंगड, द्राक्ष यांची मोठी निर्यात होत असते. पण युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात निर्यातीसाठी आलेले जवळपास १ हजार २०० कंटेनर अडकून पडले आहेत. रमजानच्या महिन्यात रायगड जिल्ह्यातील कलिंगडांना परदेशातून मोठी मागणी असते. यावर्षी आखाती देशात कलिंगडांची निर्यात होऊ शकलेली नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात कमी दराने कलिंगड विक्री रण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, ज्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. कोकणातील पर्यटन व्यवसायालाही युद्धाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बाधित झाल्याने, हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत. गॅस सुरळीत झाला नाही तर येत्या काही दिवसात हॉटेल्स आणि खानावळी बंद करण्याची वेळ व्यवसायिकांवर येणार आहे.
harshad.kashalkar@expressindia.com
