आखाती युद्धामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. प्रामुख्याने दक्षिण आशियात भारतासह बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव; आग्नेय आशियातील म्यानमार, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्ससारखे देश खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी आखाती देशांवर अवलंबून आहेत. युद्धामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या प्रमुख तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रकल्पांवर हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणने आखातातील अमेरिकेच्या मित्र देशांचे तेल व वायू प्रकल्प आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. त्यामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. परिणामी पेट्रोल, डिझेलसह नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण भारत वगळता इतर अनेक आशियाई देशांत वाहतूक व स्वयंपाकाच्या इंधनदरांत वाढ झाली.

तांदूळ पिकावर विपरीत परिणाम?

आग्नेय आशियातील तांदूळ हंगाम प्रामुख्याने पावसाळ्यावर म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असतो. खरीप आणि उन्हाळी, या दोन हंगामात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात प्रामुख्याने मे – जूनमध्ये भाताची लागवड केली जाते आणि नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये भाताची कापणी होते. हाच सर्वात मोठा हंगाम असतो. थायलंड आणि फिलिपिन्समध्ये सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू आहेत. भारतासह आशियाई देशात उन्हाळी हंगामात तांदळाचे पीक घेतले जाते.

पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी जानेवारी – फेब्रुवारीमध्ये पेरणी केली जाते आणि मार्च – एप्रिलमध्ये कापणी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीच उन्हाळी हंगामात भाताची लागवड होते. सध्या थायलंडसह अन्य आखाती देशांमध्ये उन्हाळी हंगामातील भाताची कापणी सुरू आहे. पण, इंधनाचे दर महागल्यामुळे पाणी उपसा पंपांचा खर्च वाढला आहे. थायलंडमध्ये कापणीचा खर्च पिकाच्या किमतीपेक्षा जास्त झाल्यामुळे शेतकरी पीक शेतातच सोडून देऊ लागले आहेत. विशेषतः व्हिएतनामच्या मेकाँग डेल्टा भागात वर्षातून तीन वेळा पीक घेतले जाते, पण वाढत्या खर्चामुळे तेथील शेतकरी आता केवळ दोनच पिके घेण्याच्या विचारात आहेत.

भारतातील भाताची स्थिती काय?

देशात यंदाच्या उन्हाळी हंगामात तांदळाच्या पेरणीखालील क्षेत्रात घट झाली आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या दहा एप्रिलपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, उन्हाळी भाताची लागवड ३०.६ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली, जी मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी कमी आहे. पेरणीखालील क्षेत्रात २०२५ च्या तुलनेत यंदा २.४७ लाख हेक्टरची घट झाली आहे. शेतकऱ्यांनी तांदळाऐवजी कडधान्ये, भरड धान्य आणि तेलबियांच्या लागवडीवर भर दिला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरच्या काही भागांत उन्हाळी भात घेतला जातो. उन्हाळी हंगामात प्रखर सूर्यप्रकाश आणि कमी आर्द्रतेमुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो, ज्यामुळे पावसाळी भाताच्या तुलनेत उन्हाळी भाताची गुणवत्ता आणि तांदळाचे प्रमाण अधिक असते. पण, हा हंगाम पूर्णपणे धरणांच्या आणि कालव्यांच्या पाण्यावर किंवा सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीच घेता येतो.

आशियातील मुख्य हंगाम अडचणीत?

आशियातील प्रामुख्याने आग्नेय आशिया आणि भारतीय उपखंडात खरीप हंगामात  म्हणजे मे, जून आणि जुलै महिन्यात भाताची लागवड केली जाते. महाराष्ट्रात जुलैअखेरपर्यंत लागवडी होतात. किनारपट्टीवर मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वीच भाताची पेरणी (धूळ पेरणी) केली जाते. खरीप हंगामात भारतात सरासरी ११०० लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. त्यापैकी सुमारे ४०० लाख हेक्टरवर भाताची लागवड होते. एकूण खरिपाच्या सुमारे ४८ टक्के क्षेत्रावर भाताची लागवड होते. चीनमध्ये सुमारे २९० लाख हेक्टर, बांगलादेशात ११४ लाख हेक्टर, इंडोनेशियात ११४ हेक्टर, थायलंडमध्ये १०९ लाख हेक्टर, व्हिएतनाममध्ये ७० लाख हेक्टर, फिलिफिन्समध्ये ४७ लाख हेक्टर आणि जपानमध्ये १५ लाख हेक्टरवर भाताची पेरणी होते. पण खते आणि डिझेलच्या टंचाईमुळे यंदा अनेक शेतकरी भाताची लागवड टाळण्याचा किंवा कमी क्षेत्रावर पेरणी करण्याचा विचार करत आहेत. भातासाठी युरिया खताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यंदा युरियाची मोठी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

आयात – निर्यात साखळी विस्कळीत?

आशिया भाताचा सर्वात मोठा उत्पादक आणि वापरकर्ता असला तरी आशियाई देश तांदळाचे सर्वात मोठे निर्यातदारही आहेत. भारतातून दरवर्षी सरासरी २०० ते २५० लाख टन भाताची निर्यात होते. त्यात बासमती आणि बिगर बासमती आंबेमोहर, इंद्रायणी, सोना मसुरी, स्वर्ण, परमल, पोन्नी, मट्टा, शरबती, सुगंधा, पीआर – ११, पीआर – १४ आदी पारंपरिक आणि संकरित वाणाच्या भाताची निर्यात होते. भारतासह व्हिएतनाममधून ७० लाख टन, थायलंडमधून ७० लाख टन, पाकिस्तानमधून ५० लाख टन, कंबोडियामधून ४० लाख टन तांदळाची निर्यात होते. तर अमेरिका, युरोपिय देश, इराक, सौदी अरेबियेसह बहुतेक आखाती देश तांदळाचे मुख्य आयातदार आहेत. ओमानसारखा देश भारतीय तांदळावर अवलंबून आहे. पण, आखाती युद्धामुळे व्यापार विस्कळीत झाला आहे. एकीकडे तांदळाचा व्यापार ठप्प झाल्यामुळे दर्जेदार तांदळाच्या दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे तांदळाच्या लागवडीत आणि उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. दाट लोकसंख्येच्या आशियाई देशात तांदूळ उत्पादनातील घट महागाई, भूकबळी, कुपोषणाला आमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता आहे.

dattatray.jadhav@expressindia.com