Gulveli Side Effects On Liver Giloy Science Facts: ‘गुळवेलीचे रोज सेवन करा आणि आरोग्यावर चमत्कारी परिणाम पाहा’ या मथळ्यांखाली अनेकदा समाजमाध्यमांवर प्रसारित होणारी माहिती वाचून आपण तसे उपाय करायला जातो. परंतु, शास्त्रीय संशोधन काय सांगते, याकडे दुर्लक्ष करतो. गुळवेल ही औषधी असली तरी ती डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय, अती प्रमाणात किंवा सलग दीर्घकाळ घेणे धोकेदायक ठरू शकते.

इम्युनिटी बूस्टर गुळवेल

शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी. करोना महामारीपासून इम्युनिटी ही संज्ञा जनमानसात अधिक दृढ झाली आहे. मानवी शरीरात नैसर्गिक इम्युनिटी यंत्रणा अर्थात रोगप्रतिकारकशक्ती जन्मापासूनच असते. पोषक आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांच्या माध्यमातून इम्युनिटी यंत्रणा मजबूत करता येते. शिवाय, औषधी वनस्पती, आयुर्वेदिक उपाय यांचाही वापर इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी केला जातो. याच उपयांमध्ये टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) ही वनस्पती विशेष गुणकारी मानली जाते. टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) म्हणजेच गुळवेल किंवा गिलोय. आयुर्वेदात याला ‘गुडुची’ असेही म्हटले जाते.

आयुर्वेदात गुळवेलीला ‘अमृता’ मानले जाते

जुनी जाणती मंडळी तापापासून ते वेगवेगळ्या आजारांमध्ये गुळवेळीचा वापर करतात. आधुनिक कालखंडातही गुळवेळीच्या इम्युनोमोड्युलेटरी (immunomodulatory), दाहशामक अर्थात अँटी-इन्फ्लॅमेटरी (anti-inflammatory) आणि इतर जैविक गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला आहे. गुळवेलीच्या विविध भागांमध्ये ग्लायकोसाईड्स (glycosides), डायटर्पेनॉईड लॅक्टॉन्स (diterpenoid lactones), स्टिरॉईड्स (steroids), पॉलीसॅकराईड्स (polysaccharides)आणि इतर अनेक phytochemicals आढळतात. ग्लायकोसाईड्स व फायटोकेमिकल्स हे घटक उत्तम दाहशामक अर्थात अँटीऑक्सिडंट (Antioxidant) म्हणून काम करतात.

इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म

डायटर्पेनॉईड लॅक्टॉन्स शरीरातील संसर्ग (Infections) आणि तापाविरुद्ध लढण्यास अत्यंत प्रभावी ठरते. स्टिरॉईड्स शरीरातील दाह/ सूज (Inflammation) कमी करतात आणि सांधेदुखीमध्ये आराम देतात. पॉलीसॅकराईड्स रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वेगाने वाढवण्याचे आणि पांढऱ्या पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. त्यामुळे आयुर्वेदात गुळवेलीला ‘अमृता’ मानले जाते. प्रयोगशाळेत झालेल्या संशोधनात संशोधकांनी गुळवेलीच्या इम्युनोमोड्युलेटरी (immunomodulatory) गुणधर्मांकडे लक्ष वेधले आहे.

Gulveli Ayurveda
गुळवेल (Image- Health Benefits of Tinospora Cordifolia (Guduchi /Giloy/Gulvel) – Pharmacally)

संशोधन काय सांगते?

गुळवेलीचा मानवी प्रतिकारशक्तीवर (Immune system) होणारा परिणाम तपासण्यासाठी ६८ एचआयव्ही (HIV) बाधित रुग्णांना ६ महिने गुळवेलीचा अर्क (Extract) किंवा डमी औषध (Placebo) दिले गेले. हे औषध घेणाऱ्या रुग्णांना बरे वाटले. परंतु, रक्ताच्या तपासण्या आणि इतर वैज्ञानिक चाचण्या (Objective parameters) यांमध्ये मोठा किंवा चमत्कारिक बदल झाल्याचे आढळले नाही. दुसऱ्या एका प्रयोगात मधुमेहामुळे पायाला जखमा (Diabetic foot ulcer) असलेल्या रुग्णांवर गुळवेलीचा पूरक औषध म्हणून अभ्यास केला. यात शरीरातील रोगजंतू गिळून टाकणाऱ्या पेशींच्या (Phagocytosis) कार्यक्षमतेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले.

तरीही गुळवेळीला इम्युनिटी बूस्टर का म्हटलं जात?

२०२४ साली प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात ४५ दिवस गुडूची घनवटी घेणाऱ्या आणि ती न घेणाऱ्या व्यक्तींची तुलना करण्यात आली. गुळवेल घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कोविड-१९ च्या संसर्गाचे प्रमाण कमी आढळले; मात्र कोविड संसर्गाच्या दरातील हा फरक सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण (statistically significant) नव्हता. काही दुय्यम निष्कर्षांमध्ये (secondary outcomes) विशेषतः कोविडची तीव्रता आणि इतर गैर-कोविड आजारांच्या बाबतीत गुळवेल घेतलेल्या गटात अधिक चांगले परिणाम नोंदवले गेले. त्यामुळे गुळवेल ही एक उत्तम आयुर्वेदिक वनस्पती/ औषध आहे, हे निश्चित आहे. परंतु, गुळवेल ही दररोज खाण्याची गोष्ट आहे आणि ती खाल्ल्याने इम्युनिटी लगेच वाढते, असा सार्वत्रिक दावा चुकीचा ठरतो. गुळवेलीचा वापर गरजेनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध म्हणूनच होणे आवश्यक आहे.

यकृताच्या दुखापतीसंबंधी नोंद

करोना महामारीच्या काळात गुळवेलीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. परंतु, भारतात काही डॉक्टरांनी गुळवेलीच्या सेवनाशी संबंधित यकृताच्या दुखापतीच्या (liver injury) रुग्णांची नोंद केली. २०२२ साली ‘हेपॅटॉलॉजी कम्युनिकेशन्स’ (Hepatology Communications) मध्ये प्रकाशित झालेल्या भारतातील अभ्यासात (multicentre study) १३ केंद्रांमधून गुळवेल सेवनाशी संबंधित (temporally associated) यकृत दुखापत असलेले ४३ रुग्ण नोंदवले गेले. गुळवेल घेण्यास सुरुवात केल्यापासून लक्षणे दिसेपर्यंतचा (median) कालावधी ४६ दिवसांचा होता.

जुनाट यकृत आजारात वाढ

या रुग्णांमध्ये तीव्र यकृतदाह (acute hepatitis), आधीपासून असलेल्या जुनाट यकृत आजाराची (chronic liver disease) स्थिती अचानक बिघडणे आणि काही गंभीर वैद्यकीय समस्या आढळल्या. कारणमीमांसा मूल्यांकनात (causality assessment) ६७.४ टक्के प्रकरणे ‘संभाव्य’ (probable) श्रेणीत आली. काही रुग्णांमध्ये ‘ऑटोइम्यून’ (autoimmune) लक्षणेही दिसून आली. संशोधकांनी गुळवेल सेवनाचा तीव्र यकृतदाहाशी संबंध असल्याचे आणि काही व्यक्तींमध्ये आधीपासून सुप्त असलेला ऑटोइम्यून हेपॅटायटिस उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली. या संशोधनात मागील अनुभवांवर आधारित निरीक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु, हा मुद्दा वादग्रस्त ठरला.

हुबेहूब दिसणारी वनस्पती

काही संशोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे. बाजारात टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia – खरी गुळवेल) सारखीच हुबेहूब साधर्म्य असलेल्या ‘टिनोस्पोरा’च्या इतर प्रजाती (species) मिळतात. विशेषतः टिनोस्पोरा क्रिस्पा (Tinospora crispa) या प्रजातीमुळे यकृताला विषारी इजा (hepatotoxicity) होते हे यापूर्वीही संशोधन सिद्ध झाले आहे. बाजारात मिळालेली चुकीची वनस्पती किंवा भेसळीमुळे (adulteration) यकृताला इजा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. एका पुनरावलोकन अहवालात (review) ‘टी. कॉर्डिफोलिया’ (T. cordifolia), ‘टी. सायनेन्सिस’ (T. sinensis) आणि ‘टी. क्रिस्पा’ (T. crispa) या वनस्पतींची वनस्पतीशास्त्रानुसार अचूक ओळख कशी करावी (botanical identification) याविषयीची आव्हाने अधोरेखित करण्यात आली आहेत.

आणखी एक महत्त्वाचे वळण

पण या वादाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले. पूर्वी यकृताच्या दुखापतीची (liver injury) नोंद झालेल्या सहा व्यक्तींनी प्रत्यक्ष सेवन केलेल्या वनस्पतीचे चार नमुने (plant samples) आणि दोन व्यापारी उत्पादने (commercial preparations) संशोधकांना उपलब्ध झाले. त्यांचे फायटोकेमिकल विश्लेषण (phytochemical analysis) आणि डीएनए बारकोडिंग (DNA barcoding) करण्यात आले. या अभ्यासात तपासलेले सर्व सहाही नमुने हे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia – म्हणजेच खरी गुळवेल) असल्याचेच सिद्ध झाले; त्यामध्ये ‘टिनोस्पोरा क्रिस्पा’ (T. crispa) असण्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन हितवाह

एकुणातच, एकीकडे गुळवेलीच्या वापराने यकृताला इजा (liver injury) झाल्याची माहिती देणारे अभ्यास आणि वैद्यकीय अहवाल उपलब्ध आहेत; तर दुसरीकडे, गुळवेलीवर झालेल्या इतर वैद्यकीय व प्रयोगशालेय संशोधनांमध्ये ती यकृताचे रक्षण करते (hepatoprotective) असेही दिसून आले आहे. उदाहरणार्थ, क्षयरोगाच्या (Tuberculosis) औषधांमुळे यकृताला होणारी हानी रोखण्यासाठी वनस्पतीजन्य औषधांवर (herbal interventions) एक अभ्यास (Systematic Review and Network Meta-analysis) करण्यात आला होता. यामध्ये हळदीसोबत टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (गुळवेल) वापरलेल्या काही प्रयोगांमध्ये सकारात्मक फायदे आढळले. त्यामुळेच, गुळवेल यकृतासाठी उत्तम आहे किंवा गुळवेल यकृत खराब करते अशी दोन टोकाची विधाने करणे म्हणजे उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांचा चुकीचा अर्थ काढण्यासारखे ठरेल. म्हणूनच गुळवेलीचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे नेहमीच हितवाह ठरावे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.