World cancer day Mouth cancer भारतात कर्करोगाची (कॅन्सर) नवीन प्रकरणे सातत्याने वाढत असल्याने तज्ज्ञांनी त्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कर्करोग हा जगातील सर्वांत मोठा मारक विकार ठरत आहे. तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाणही झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. गुटखा, तंबाखू, पान मसाला व तंबाखूयुक्त विड्यांचे सेवन हे भारतासमोरील सर्वांत गंभीर आव्हान आहे. ‘नॅशनल ओरल कॅन्सर रजिस्ट्री’च्या मते, “भारतात दररोज दर तासाला पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तोंडाच्या कर्करोगामुळे होतो आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हा यामागील एक धोकादायक घटक आहे.

देशभरातील लाखो लोक या पदार्थांचे सेवन करतात. अनेक जण याला केवळ एक सवय किंवा तणाव कमी करण्याचे साधन मानतात. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर (RGCIRC)मधील ‘हेड अँड नेक ऑन्कोलॉजी युनिट-२’चे युनिट हेड व वरिष्ठ सल्लागार डॉ. मुदित अग्रवाल यांनी याविषयी इशारा दिला आहे. ही साधी वाटणारी सवय तोंडाच्या आरोग्याचे नेमके कसे नुकसान करते? कालांतराने त्याचे रूपांतर जीवघेण्या कर्करोगात कसे होते? हे जाणून घेऊयात…

दात आणि हिरड्यांवर होणारा परिणाम

तंबाखूजन्य पदार्थांमध्ये दातांना इजा करणारे कण (Abrasive particles), निकोटिन आणि घातक रसायने असतात. त्याचा थेट परिणाम दात आणि दातांच्या मऊ उतींवर होतो. त्याच्या नियमित सेवनामुळे खालील समस्या उदभवतात :

  • दातांवर डाग पडणे आणि इनॅमलची झीज : त्यामुळे दात कमकुवत होतात आणि संवेदनशीलता वाढते.
  • हिरड्यांची तीव्र जळजळ : यामुळे हिरड्यांना सूज येते आणि रक्तस्राव होतो.
  • हिरड्या कमकुवत होणे : यामुळे दातांच्या मुळांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो.
  • तोंडाची दुर्गंधी: यामुळे तोंडातील नैसर्गिक जीवाणूंचे संतुलन बिघडते.

धूम्रपानापेक्षा चघळण्याचे पदार्थ जास्त काळ हिरड्या, गालाचा आतील भाग आणि जिभेच्या संपर्कात राहतात. त्यामुळे विषारी द्रव्ये थेट तोंडाच्या उतींमध्ये शोषली जातात.

कोणत्या पदार्थांचं व्यसन देतंय कर्करोगाला आमंत्रण?

सतत जळजळ होण्यामुळे तोंडात इम्फ्लेमेशन निर्माण होते. कालांतराने त्यामुळे ‘ओरल ल्युकोप्लाकिया’ (पांढरे चट्टे) व ‘एरिथ्रोप्लाकिया’ (लाल चट्टे) यांसारखी कर्करोगपूर्व स्थिती निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हे चट्टे वेदनारहित असू शकतात, ज्यामुळे डॉक्टरकडे जाणे अनेकदा टाळले जाते.

सुपारी आणि गुटख्याच्या सेवनाशी संबंधित आणखी एक सामान्य आजार म्हणजे ‘ओरल सबम्युकोस फायब्रोसिस’ (OSMF). हा एक पसरत जाणारा आजार आहे, ज्यामध्ये तोंड उघडण्यास अडचण येते, जळजळ होते आणि खाण्यापिण्यात किंवा बोलण्यात अडचण येते. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे काय असतात?

सतत तंबाखूच्या सेवनाने तोंडाच्या उतींचा संपर्क नायट्रोसामाइन्स आणि पॉलिसिक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्ससारख्या कार्सिनोजेन्सशी (कर्करोग निर्माण करणारी द्रव्ये) येतो. ही रसायने पेशींच्या स्तरावरील डीएनएवर परिणाम करतात. वारंवार होणाऱ्या संपर्कामुळे सामान्य पेशींमध्ये बदल होऊ लागतात, त्यांची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता नष्ट होते आणि त्यांची अनियंत्रित वाढ सुरू होते. परिणामी शरीरात कर्करोग बळावू लागतो.

हिरड्यांचा कर्करोग आणि तोंडाच्या इतर कर्करोगांची लक्षणे:

  • बरी न होणारी तोंडातील जखम किंवा अल्सर.
  • हिरड्यांवर किंवा गालावर गाठ किंवा जाडी वाढणे.
  • दात हलणे.
  • सतत वेदना होणे किंवा बधिरता येणे.
  • चघळताना, गिळताना किंवा बोलताना त्रास होणे.

जेव्हा लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात, तेव्हा हा आजार प्रगत टप्प्यावर पोहोचलेला असतो.

लवकर निदान होणे महत्त्वाचे का?

तोंडाचा कर्करोग हा टाळता येण्याजोगा असला तरी भारतात त्याचे निदान मोठ्या प्रमाणावर होते. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार करणे शक्य असते. नियमित दंत तपासणी, स्वतःच्या तोंडाची तपासणी आणि कोणत्याही बदलाकडे लक्ष देणे हे लवकर निदानासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

गुटखा, पान मसाला आणि तंबाखूच्या व्यसनातून बाहेर पडणे आव्हानात्मक आहे; परंतु योग्य वैद्यकीय मदतीने हे शक्य आहे. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमधील विशेष ‘तंबाखूमुक्ती केंद्र’ लोकांना सुरक्षितपणे तंबाखू सोडण्यास मदत पुरवते. रुग्णांना व्यसन सोडताना होणारा त्रास कमी करण्यासाठी, पुन्हा व्यसन लागू नये म्हणून धोरणे आखण्यासाठी नियमित पाठपुरावा करून मदत केली जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे तंबाखूमुळे तोंडात होणाऱ्या सुरुवातीच्या बदलांचीही तपासणी केली जाते, ज्यामुळे गंभीर आजार होण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे शक्य होते. गुटखा, पान मसाला व तंबाखू सोडणे हे तोंडाचा कर्करोग रोखण्यासाठी उचललेले सर्वांत प्रभावी पाऊल आहे. जागरूकता, मानसिक पाठबळ, वेळेवर मिळणारे वैद्यकीय मार्गदर्शन आदींमुळे व्यक्ती व्यसनातून मुक्त होऊ शकते.