मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस, इंडिया आघाडी, डावे पक्ष आणि त्यांच्या संघटना, ‘सीजेपी’सारखे नागरी गट रस्त्यावर उतरले असताना केरळमधील काँग्रेस सरकारने २००६मधील एका भ्रष्टाचार प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला आहे. त्याच्या केंद्रस्थानी ज्ञानेश कुमार असल्याने स्वाभाविकच त्याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे.
केरळम सरकारचा निर्णय
केरळमच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी विभागाने राज्याच्या बांधकाम विभागाचे २००६चे सचिव ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लाचखोरीच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही, असा सल्ला केरळमच्या अभियोजन विभागाचे महासंचालक टी. असफ अली यांनी राज्य सरकारला दिला आहे.
कायदेशीर सल्ला काय आहे?
आपल्या कायदेशीर अभिप्रायात अली यांनी नमूद केले आहे की, “मलेशियाचे अभियंता ली सी बीन यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या वस्तुस्थिती आणि परिस्थितीची तपासणी केल्यावर असे आढळते की, ज्ञानेश कुमार यांनी मृत व्यक्तीचा केलेला छळ हे या आत्महत्येचे तात्कालिक कारण आहे. हे कृत्य भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६अन्वये गुन्हा असून, त्याचा तपास आवश्यक आहे.” अली यांच्या मते वरिष्ठ पदावर असलेल्या कुमार यांनी कायद्याच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आपल्या अधिकारांचा व सत्तेचा वापर केला. तरीही कायदेशीर प्रक्रिया सुरू करून त्यांना जबाबदार धरले जाऊ शकते. यासाठी लागलेल्या विलंबामुळे कायदेशीर कारवाई अवैध ठरत नाही.
ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोप काय?
ज्ञानेश कुमार हे केरळम केडरचे १९९८च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. ते २००६मध्ये केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव होते. त्यांच्यावर केरळ राज्य परिवहन प्रकल्पात (केएसटीपी) लाचखोरी केल्याचा आणि त्या प्रकल्पावर काम करणारे मलेशियाचे अभियंता ली सी बीन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप आहे. ली सी बीन हे या प्रकल्पाअंतर्गत एम.सी. मार्गाच्या पुनर्बांधणीचे मुख्य प्रकल्प अधिकारी होते.
प्रकल्प काय होता?
‘केसीटीपी’ हा केरळमच्या हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प होता. या प्रकल्पासाठी १,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. जागतिक बँकेच्या कर्जातून १,६०० किमी लांबीच्या प्रमुख रस्त्यांचे आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. प्रकल्पाबाबत प्राथमिक चर्चा १९९६ ते २००१ या कालावधीत माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या उत्तरार्धात पूर्ण झाल्या होत्या. त्यावेळी केरळ काँग्रेस (जोसेफ) या फुटीर गटाचे नेते पी. जे. जोसेफ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. जोसेफ हे तेव्हा त्यावेळी डाव्या लोकशाही आघाडीमध्ये (एलडीएफ) होते. ते सध्या काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीबरोबर (यूडीएफ) आहेत.
प्रकल्पाला उशीर का झाला?
‘केसीटीपी’ प्रकल्पाच्या निमित्ताने केरळ सरकारने प्रथमच परदेशी कंत्राटदाराकडे एखादे काम सोपवले होते. एकूण १६०० कोटींच्या प्रकल्पामध्ये दक्षिण केरळमधील तिरुवनंतपुरम ते मध्य केरळमधील अंगमालीपर्यंतच्या एका महत्त्वाच्या रस्त्याचे आधुनिकीकरण करण्याचा समावेश होता. त्यासाठी २१६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. या २१६ कोटींच्या कामासाठी केरळस्थित भागीरथ इंजीनियरिंग लिमिटेड (बीईएल) आणि मलेशियाची फर्म ‘पीएटीआय’ यांनी संयुक्तरित्या निविदा भरली होती. ‘पीएटीआय-बीईएल’ यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारशी अंतिम करार केल्यानंतर डिसेंबर २००२मध्ये कामाला सुरुवात केली. त्यावेळी इंडियन यूनियन मुस्लीम लीगचे नेते एम.के. मुनीर हे सार्वजनिक बांधकाममंत्री होते. मात्र, सरकारने पुरेशी जमीन अधिग्रहित न करताच प्रकल्पाचे काम ‘पीएटीआय-बीईएल’कडे सोपवले. जमीन अधिग्रहणाची अधिसूचना २००४मध्ये काढण्यात आली. यामुळे हे काम मूळ मुदतीत पूर्ण होणे शक्य नसल्याचे कंत्राटदारांनी ऑक्टोबर २००६मध्ये राज्य सरकारला कळवले आणि बांधकामाचा खर्च वाढल्याने कंत्राटाची रक्कम ३० टक्क्यांनी वाढवून मागितली. त्याला सरकारने नकार दिला आणि या कामाच्या निविदा पुन्हा काढण्यासाठी जागतिक बँकेची परवानगी मागितली.
आत्महत्येचे प्रकरण काय होते?
मलेशियाचे ली सी बीन हे ‘पीएटीआय-बीईएल’च्या कामाचे मुख्य प्रकल्प अधिकारी होते. या कामासाठी कंपनीने २००६मध्ये १८ कोटींची बिले सादर केली. विधानसभेच्या कागदपत्रांनुसार, ‘पीएटीआय-बीईएल’च्या अधिकाऱ्यांनी देयकासाठी मंत्र्यांची अनेक वेळा भेट घेतली. देयक चुकते करण्यासाठी ली सी बीन यांच्यावर उपकंत्राटदार आणि बांधकाम साहित्य पुरवठदारांचा दबाव वाढत होता. कामाला विलंब होत असल्याने विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारवर दबाव वाढवत या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. प्रकल्पाचा खर्च वाढवण्यात राज्य सरकारही सहभागी असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. यानंतर ११ नोव्हेंबर २००६ या दिवशी ली सी बीन यांनी क्वालालंपूर येथे आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी बिले चुकते करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप केला होता. या चिठ्ठीत ज्ञानेश कुमार यांचेही नाव असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, ती चिठ्ठी कधीही सार्वजनिक केली गेली नाही.
चौकशीचे काय झाले?
ली सी बीन यांच्या आत्महत्येमुळे नोकरशाहीचे अडथळे, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक कामांच्या अंमलबजावणीतील विलंब यांसारखे मुद्दे चर्चेत आले. एका महिन्यानंतर, राज्य सरकारने ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले आणि दक्षता विभागाकडे चौकशी सोपवली. तसेच, सरकारने ‘पीएटीआय-बीईएल’बरोबरचे कंत्राटही रद्द केले. पुढे, मार्च २०१०मध्ये तत्कालीन गृहमंत्री आणि माकप नेते के. बालकृष्णन यांनी विधानसभेत माहिती दिली की, याप्रकरणी दोन दक्षता चौकशी सुरू होत्या. पहिली चौकशी काँग्रेस सत्तेत असताना २००३-०४ या काळात करण्यात आली. ती केएसटीपी प्रकल्पाच्या परदेशी सल्लागारांशी संबंधित होती. ‘केएसटीपी’च्या कामातील त्रुटींशी संबंधित दुसरी चौकशी ली यांच्या आत्महत्येनंतर एका महिन्याने, डिसेंबर २००६मध्ये सुरू करण्यात आली. मात्र, ही चौकशी पुढे सरकली नाही. काँग्रेस नेते एम वेणुगोपाल यांच्या मते आधीची चौकशी अर्धवटच थांबवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदावरून हटवण्यात आलेल्या ज्ञानेश कुमार यांना राज्यात कोणतीही नवीन नियुक्ती दिली गेली नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार असताना ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर नवी दिल्लीला गेले.
प्रकल्पाचे काय झाले?
पुढे, प्रकल्पाला झालेल्या उशीरामुळे जागतिक बँक कारवाई करू शकते या कारणामुळे २००७च्या सुरुवातीला डाव्या आघाडीच्या सरकारने कंत्राट रद्द केले. या प्रकल्पासाठी नंतर कोणीही निविदा न भरल्यानंतर सरकारने ‘पीएटीआय-बीईएल’ यांच्या बरोबरच्या कंत्राटाचे नूतनीकरण केले. त्यासाठी ७२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला. अशा तऱ्हेने हा प्रकल्प पुन्हा एकदा त्याच कंपनीला मिळाला.
nima.patil@expressindia.com
