Dyanesh Kumar ECI Controversy : निवडणूक आयोगातील अनियमिततेविरोधात देशभरात संतप्त वातावरण आहे. ज्ञानेश कुमार यांनी आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांचा आक्षेप डावलून एकतर्फी निर्णय घेतल्याच्या आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे देशातील विरोधी पक्ष आणि तरुणांनी रस्त्यावर उतरत ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनापासून थेट निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी “व्होट चोर, गद्दी छोड” आणि “डेमोक्रसी नॉट फॉर सेल” अशा घोषणांनी दिल्ली दणाणली होती.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर थेट ज्ञानेश कुमार यांना उद्देशून, “ज्ञानेश, इट्स डन ब्रो, टाइम टू रिसाईन” असे लिहिले. राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाविरोधातील आक्रमक भूमिका रस्त्यावरदेखील दिसून आली.
विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पोलिसांनी विरोधकांची वाट अडवली पण विरोधक मागे हटले नाहीत. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. त्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकामागोमाग एक ताब्यात घेऊन पोलिसांच्या बसमध्ये कोंबण्यास सुरुवात झाली, त्यामुळे घटनास्थळी काँग्रेसचे मोजकेच नेते उरले आणि आंदोलन जवळजवळ संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले.
मात्र, त्याचवेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अचानक वेगळी भूमिका घेतली आणि पोलिसांसह उपस्थित विरोधी नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला. दुपारीच या आंदोलनाला सुरुवात झाली होती. संसद मार्गावर असलेल्या नीति आयोगाच्या कार्यालयाजवळ राहुल गांधी बॅरिकेडवर चढले आणि त्यांनी तिरंगा फडकवला. संध्याकाळी सुमारे ८ च्या सुमारास पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह इतर विरोधी नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू केली, त्यामुळे आंदोलनाची सांगता होणार असे वाटत असतानाच गांधी भावंडांच्या अचानक हालचालींमुळे संपूर्ण आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.
रस्त्यावर बसलेल्या विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली असताना राहुल गांधी बॅरिकेडवरून खाली उतरले. काही मिनिटांनी ते आकाशवाणी भवनाजवळ उभ्या असलेल्या पोलिसांच्या बसकडे धावले. त्या बसमध्ये प्रियंका गांधी बसल्या होत्या. राहुल बसमध्ये चढणार इतक्यात दोघांची नजरानजर झाली आणि प्रियंका खाली उतरल्या. त्यानंतर दोघांनीही पोलिसांना चकवा देत आकाशवाणी भवनाच्या दिशेने चाल केली.
आकाशवाणी भवनाच्या कर्मचाऱ्यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधींना आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अखेर राहुल आणि प्रियंका गांधी दोघेही आत गेले आणि तेथेच आंदोलन सुरू केले. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, “हे नेमकं कसं घडलं आम्हालाही माहीत नाही. हा आधीच्या नियोजनाचा भाग नव्हता.” आणखी एका काँग्रेसच्या खासदाराने म्हटले की, “दोघांच्या मनात नेमकं काय होतं हे त्यांनाच माहीत नव्हतं.”
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर नीति आयोगाच्या कार्यालयाजवळ समाजवादी पक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी, प्रियंका गांधींसह सर्व नेत्यांनी “व्होट चोर, गद्दी छोड” आणि “डेमोक्रसी नॉट फॉर सेल” अशा घोषणा देत साडेदहा तास ठिय्या दिला.
यावेळी राहुल गांधी यांनी संतप्त होत प्रश्न उपस्थित केला, ‘कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आयोगासमोर आपली बाजू मांडण्यासाठी आले असताना आयोग त्यांची भेट का घेत नाही.’ उलट पोलिसांकडून खासदारांना रोखले जात आहे आणि धमकावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस खासदार ज्योतिमणी यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधक लाठ्या-काठ्या आणि गोळ्यांनाही सामोरे जातील, पण ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी आग्रही राहतील असे त्या म्हणाल्या. ‘ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही उद्ध्वस्त केली,’ असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘मतचोरी’चा आरोप केला. ज्यांनी त्यांना मतचोरीची ‘कला’ शिकवली, तेच सर्वांत मोठे चोर आहेत असा तिखट वार खरगेंनी केला.
तरुणांनीही उठवला आवाज
देशातील तरुणांनीदेखील रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगातील कारभाराविरोधात आवाज उठवला. ३ ऑक्टोबरला जंतरमंतर आणि आसपासच्या परिसरात विद्यार्थी आणि युवा संघटनांनी जोरदार निदर्शने केली होती. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी ७०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. ‘आप’च्या आतिशी, सौरभ भारद्वाज, संजीव झा आणि संजय सिंह यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्त्या नेहा बोरा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ने २ ऑक्टोबरला मुंबईत हजारो तरुणांच्या उपस्थितीत आंदोलन केले. मुंबईसह इतर भागातील तरुणांनी एकत्र येत ज्ञानेश कुमारांच्या राजीमान्याची मागणी केली. राजीनामा न दिल्यास १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
दीपके यांनी, “ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभरातील कॉक्रोच १० ऑक्टोबरला दिल्लीत येऊन जंतरमंतरवर आंदोलन करतील. दिल्ली पोलिसांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर ते ज्या ठिकाणी आम्हाला थांबवतील, ते ठिकाणच आमच्यासाठी जंतरमंतर असणार आहे,” असे एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
५ ऑक्टोबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी तीव्र झाली. दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई, माजी आयबी विशेष संचालक यशोवर्धन आझाद आणि माजी केंद्रीय सचिव अमिताभ पांडे यांच्यासह १५ माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून कुमार यांनी पद सोडावे, अशी मागणी करणारे ‘महाभियोगाचे पत्र’ जारी करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील अंजली भारद्वाज, अमृता जोहरी व आयशी घोष यांनीही या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
ज्ञानेश कुमारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर प्रक्रियेशी संबंधित फॉर्म ६ बाबत एकतर्फी निर्णय घेतल्याचे आरोप केले जात आहेत. ज्ञानेश कुमार यांंच्या एकतर्फी निर्णयांमुळे कोट्यावधी मतदार एसआयआर यादीतून वगळले गेले. इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारितेतून समोर आले की, इतर दोन निवडणूक आयुक्तांनी तब्बल १४ वेळा आयोगातील निर्णयांवर आक्षेप घेण्यात आले होते; परंतु त्या आक्षेपांना न जुमानता, ज्ञानेश कुमारांकडून निर्णय घेण्यात आले.
निवडणूक आयोगाने नमूद केले होते की, पात्र मतदाराचं नाव यादीतून वगळलं जाऊ नये आणि अपात्र नावं हटवली जावीत, या उद्देशानं ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र, या प्रक्रियेवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या वर्षी बिहारमधून सुरू झालेली एसआयआर प्रक्रिया आता देशातील इतर काही राज्यांमध्येही राबवली जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दाव्यानुसार, या प्रक्रियेंतर्गत तब्बल १३.८ कोटी मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. २०२५ मध्ये एसआयआर सुरू होण्यापूर्वी देशात ९४.७ कोटी मतदार होते, त्या एकूण मतदारांमधून सुमारे १४.६ टक्के नावे हटवण्यात आली असल्याचा दावा विरोधकांनी केला.
या प्रक्रियेची पद्धत आणि वेग यावर आधीपासूनच प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, दी इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारितेनंतर हा वाद चिघळला. आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे ज्ञानेश कुमारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, नव्या मतदारांची नोंदणी, Form 6 मध्ये करण्यात आलेले बदल, पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे समाविष्ट करण्याबाबत दाखल केलेली अपिले आणि गोव्यातील मतदारांच्या डेटाच्या हाताळणीवर दोन्ही आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केले होते. एका लेखी आक्षेपात संधू यांनी आयोगाने दोन्ही आयुक्तांच्या आक्षेपांना न जुमानता निर्णय घेतल्याचे नमूद केले आणि मतदार नोंदणी प्रक्रियेतील बदल “अनधिकृत आणि बेकायदेशीर” असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, सोमवारी सुप्रीम कोर्टानेही Form 6 मधील बदलांवरूनही निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केले की, Form 6 मध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही बदलाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिलेली नाही. आयोगाकडून अहवाल मिळाल्यानंतर हा फॉर्म नेमका कोणी बदलला, याचीही चौकशी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे Form 6 मधील बदलांचा निर्णय नेमका कोणी घेतला, याची न्यायालयीन चौकशी होणार आहे.
