Protests Against ECI Dyanesh Kumar : भारताच्या निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याभोवतीचा वाद अधिक तीव्र झाला आहे. दी इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारितेतून समोर आले होते की, आयोगातील दोन आयुक्तांनी एसआयआर प्रक्रिया आणि इतर आदेशांवर १४ वेळा आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांना डावलून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी निर्णय घेतल्याने त्यांच्या कारभाराविरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांसह अनेक संघटनांनी विविध भागांत ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
या पार्श्वभूमीवर केरळमधील एका जुन्या प्रकरणाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तसेच केरळच्या गृह विभागाने २००६ मधील रस्त्याच्या कामाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आहे. त्यावेळी ज्ञानेश कुमार केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) सचिव होते. केरळच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने या प्रकरणाची चौकशी केली होती. आता गृह विभागाच्या आदेशानंतर ही पुन्हा चौकशी सुरू होणार आहे.
२००६ मधील प्रकरणामुळे ज्ञानेश कुमार गोत्यात?
२००६ मध्ये मलेशियन अभियंता ली सी बीन यांच्या आत्महत्येनंतर ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशी सुरू झाली होती. बीन हे PATI-BEL या भारत-मलेशियन संयुक्त कंपनीच्या केरळमधील २१६ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक होते. त्यांनी सुसाईड नोट मध्ये कथितरित्या कुमार यांच्या नावाचा उल्लेख केला होता, कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कुमार यांनी लाच मागितल्याचा आरोप बीन यांनी केला होता, असे सांगितले जाते.
२००१ ते २००६ दरम्यान भूसंपादनाला झालेल्या विलंबामुळे रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे PATI-BEL आणि अभियंता बीन यांच्यावर दबाव वाढला होता. हा प्रकल्प जागतिक बँकेच्या निधीतून राबवला जात होता. बीन यांच्या मृत्यूनंतर महिनाभरात तत्कालीन CPI(M) सरकारने कुमार यांची सार्वजनिक बांधकाम विभागातून बदली केली. त्यानंतर युपीए सरकारच्या काळात त्यांची संरक्षण मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली.
आता केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला याप्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बाहेरील राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे ही चौकशी अर्धवट राहिल्याचा आरोप काँग्रेस नेते मलयंकिझू वेणुगोपाल केला होता. मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्याशी चर्चा केल्यानंतर या तक्रारीच्या आधारे सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चेन्निथला यांनी सांगितले.
ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांविरोधात गर्जना मोर्चा आणि सीजेपीचे आंदोलन
मुंबईत रविवारी शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एकत्र येत ‘विराट गर्जना मोर्चा’ काढला. यावेळी ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमारांसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. मतचोरीच्या मुद्द्यावरुन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाची एक विशेष बाब म्हणजे यावेळी दोन्ही पक्षांचे झेंडे किंवा चिन्हे दिसली नाहीत. त्याऐवजी कार्यकर्त्यांना केवळ तिरंगा घेऊन सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरुन व्यापक पाठिंबा मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न होता.
या मोर्चाच्या माध्यमातून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या, पहिली म्हणजे ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि दुसरी म्हणजे, महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) प्रक्रिया रद्द करावी. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणावेळी राज ठाकरे यांनी निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली. तर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर निशाणा साधला. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्तीच गैर असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी, शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीने (CJP) ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही सीजेपीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मुंबईसह विविध भागांतील तरुणांनी एकत्र येत ज्ञानेश कुमारांविरोधात घोषणाबाजी केली आणि ज्ञानेश कुमारांविरोधात नाराजी व्यक्त करणारे विविध पोस्टर्स झळकवण्यात आले. मतदार यादीतून लाखो लोकांची नावे वगळण्यात आली, मॅच फिक्सिंग करुन राज्यांत विरोधकांचे सरकार येऊ दिले आणि महाराष्ट्र, दिल्लीसारखी मोठ्या राज्य मतचोरी करुन भाजपने स्वत:कडे राखली, अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली.
शुक्रवारी जंतरमंतरवरील आंदोलन कसे रोखले?
दिल्लीमध्ये देखील ज्ञानेश कुमारांविरोधात सलग दोन दिवस २ आणि ३ ऑक्टोबरला आंदोलन सुरु करण्यात आले. पण हे आंदोलन पोलिसांनी आधीच रोखले आणि शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले. २ ऑक्टोबरला सुमारे ७०० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, आपचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा आणि योगेंद्र यादव तसेच डाव्या पक्षांतील नेत्या वृंदा करात यांचा समावेश होता.
याआधी १ ऑक्टोबरला दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका झाली. २ ऑक्टोबरला मध्य दिल्लीतील राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि जनपथसह १२ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आले. जंतरमंतर आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या. ३ ऑक्टोबरला पुन्हा आंदोलकांनी जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे १५० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्यात नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा समावेश होता.
याच दिवशी जंतरमंतर परिसरातील आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या पत्रकारांकडून तक्रारी मिळाल्याचे दिल्ली पोलिसांनी मान्य केले आहे. याप्रकरणी काही स्वतंत्र पत्रकार आणि न्यूज पोर्टल्सचे प्रतिनिधी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत कारवाईची मागणी केली. संबंधित महिला पत्रकारांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केली आहे.
इंडिया आघाडीची एकजूट; देशभर आंदोलनाचा निर्णय
निवडणुकीतील कथित अनियमितता आणि एसआयआरच्या मुद्द्यावर विरोधक पुन्हा एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक पार पडली. एसआयआरच्या मुद्द्यांवर इंडिया आघाडीने संयुक्त आंदोलनाची घोषणा केली. या अंतर्गत देशभरात निदर्शने केली जाणार आहेत, तसेच विरोधी खासदार निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार असून १ नोव्हेंबरला दिल्लीत मोठी सभा होणार आहे.
सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीला १९ पक्षांचे नेते आणि अपक्ष खासदार कपिल सिब्बल उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, विरोधक एकत्रितपणे या मोहिमेत सहभागी होणार आहेत आणि निवडणूक आयोगाला जाब विचारणार आहेत. या आंदोलनात तरुण आणि नागरी संस्थांनाही सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
खरगे यांच्या माहितीनुसार, २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान ‘लोकशाही वाचवा’ मोर्चे काढले जातील. त्यानंतर देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर निदर्शने केली जाणार आहेत. ६ ऑक्टोबरला लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांचे खासदार नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील. तसेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते राष्ट्रपतींची भेट घेऊन ‘मतचोरी’ विरोधात निवेदन देणार असल्याचे खरगे यांनी नमूद केले.
