अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशाबाहेर हाकलून लावले. त्यानंतर एच १ बी व्हिसा धोरणात बदल करून अनेकांना अडचणीत आणले. ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणाचा सर्वाधिक फटका अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीयांना बसला. एच १ बी व्हिसाचे शुल्क भरणे कठीण झाल्याने अनेकांवर नोकरी सोडून मायदेशी परतण्याची वेळ आली. याच तणावामुळे अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शशिकांत दोंथिरेड्डी असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. यादरम्यान अमेरिकेत राहणाऱ्या तरुण भारतीयांच्या वाढत्या मानसिक तणावाबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्याविषयीचा हा आढावा…
कोण होता शशिकांत दोंथिरेड्डी
३० वर्षीय शशिकांत दोंथिरेड्डी हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा या शहरात वास्तव्यास होता. तो मूळ आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील रहिवासी होता. २०१८ मध्ये शशिकांत शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. व्हिसाच्या पेचामुळे आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे त्याला आठ वर्षात एकदाही भारतात येता आले नाही. यादरम्यान शशिकांतने एका आयटी कंपनीत कामाला सुरुवात केली होती. व्हिसा मिळत नसतानाही त्याने हार न मानता दीर्घकाळ काम करणे सुरूच ठेवल्याचे मित्रांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. अमेरिकेतील आयटी आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांसाठी एच-१ बी व्हिसा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणात बदल केल्यानंतर तिथे काम करणाऱ्या भारतीयांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
१६ फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका
ट्रम्प प्रशासनाने व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया आणखीनच कठीण केल्यामुळे अनेक भारतीयांवर मायदेशी परतण्याचे संकट ओढावले. शशिकांत यालाही याच अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा केला जात आहे. वारंवार प्रयत्न करूनही एच-१ बी व्हिसा पदरात पडत नसल्याने तो प्रचंड मानसिक तणावात गेला होता. याच तणावातून त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगितले जात आहे. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी शशिकांत कामावर निघाला असताना त्याच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शशिकांतचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे सविस्तर वैद्यकीय तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
आणखी वाचा : गोळी लागूनही थांबला नाही टायसन; भारतीय लष्कराच्या श्वानाने दहशतवाद्यांना कसे शोधून काढले?
शशिकांतचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी धडपड
शशिकांतच्या निधनानंतर त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी ‘After 8 Years Apart – Help His Family See Him One Last Time’ या शीर्षकाखाली निधी संकलन मोहीम सुरू केली. शशिकांतचे पार्थिव भारतात आणणे आणि अंत्यसंस्काराचा खर्च भागवण्यासाठी निधी उभारणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मुलाच्या निधनाबरोबरच रेड्डी कुटुंबीयांना आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागत असल्याचे या मोहिमेच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत या मोहिमेने ५०,००० डॉलर्सचे उद्दिष्ट पूर्ण केले असून त्यानंतरच्या देणग्या स्वीकारणे थांबवले आहे. शशिकांतच्या कुटुंबीयांना देशाच्या कानाकोपऱ्यातून मदत मिळाली आहे.
एच-१ बी व्हिसा मिळवणे कठीण
कुशल कामगारांना अमेरिकेत तात्पुरत्या स्वरूपात काम करण्याची संधी देणारा एच-१बी व्हिसा कार्यक्रम सध्या मोठ्या बदलांच्या टप्प्यातून जात आहे. अमेरिकेत कामासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांचा ओघ कमी व्हावा यासाठी ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसाचे नियम कठोर करून त्यावरील शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीयांवर झाल्याचे दिसून येत आहे. व्हिसा अर्जासाठी आता तब्बल १ लाख डॉलर्स इतके भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. त्याशिवाय जुनी लॉटरी पद्धत बंद करून आता पगारावर आधारित पद्धत लागू करण्यात आली आहे, त्यामुळे नवीन एच-१ बी व्हिसा मिळवणे आणखीनच कठीण झाले आहे. त्यातच व्हिसा मंजुरीवर बंदी घालण्यात आल्यामुळे हजारो भारतीय आपल्या कुटुंबापासून दुरावले गेले आहेत. शशिकांतलाही याच अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : पुरुषांच्या ‘या’ सवयींमुळे महिलांमध्ये वाढतोय मूत्राशयाच्या संसर्गाचा धोका? काय म्हणतात तज्ज्ञ?
अमेरिकेतील भारतीय तरुण तणावाखाली?
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय तरुणांमध्ये वाढत्या मानसिक तणावाबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. व्हिसाची अनिश्चितता, कुटुंबापासूनचा दीर्घकाळ विरह आणि लोक काय म्हणतील या भीतीपोटीच अनेक भारतीय तरुण मानसिक तणावात गेल्याचे निरीक्षण डॉ. सुनीता सायमगारू यांनी नोंदवले आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी दोन दोन पदव्या मिळवतात. तरीही त्यातील बहुतांशा विद्यार्थ्यांना एच-१ बी व्हिसा मिळवण्यात अपयश येते. एकदा अमेरिका सोडली तर आपल्याला पुन्हा व्हिसा मिळणार की नाही या भीतीपोटीच ते मायदेशात परतत नाहीत, परिणामी त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध ताणले जातात आणि भावनिक दुरावा वाढतो. तरीही या तरुणांचे मन भारतासाठी धडधडते. किमान एकदा तरी भारतात येऊन भेट द्यावी, अशी त्यांची इच्छा असते; पण ते शक्य होत नाही. कदाचित परदेशात राहण्यासाठी त्यांना ही किंमत मोजावी लागते, असे डॉ. सुनीता यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
लोक काय म्हणतील ही सर्वात मोठी भीती?
अमेरिका सोडून कायमस्वरूपी मायदेशी परतल्यास लोक काय म्हणतील अशी भीतीही काही विद्यार्थ्यांना वाटते. काही जण केवळ समाजात आपली इज्जत जाईल या भीतीने मायदेशी परतत नाहीत. आजही जर कोणी परदेशातून कायमचे मायदेशी परतल्यास नोकरी गेली की व्हिसाचा प्रॉब्लेम झाला असे काहीजण त्यांना विचारतात. याच कारणांमुळे अमेरिकेतून भारतात परतण्यास अनेकजण कचरतात, असे डॉ. सुनीता यांनी म्हटले आहे. मी दहा वर्षांपूर्वी ब्रिटनमधून भारतात परत आले होते, तेव्हा मलाही वारंवार विचारण्यात आले की व्हिसाची अडचण होती का? काही समस्या होती का? लोकांना हे समजत नव्हते की मला ब्रिटनमध्ये राहून कंटाळा आला होता आणि मला कुटुंबाबरोबर भारतात स्थायिक व्हायचे होते. परदेश असो अथवा भारत, कोणत्याही देशात समस्या असतात; पण कठीण काळात माणसाला कुटुंबाचा आधार सर्वांत महत्त्वाचा असतो. परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेताना या गोष्टीचा गंभीरपणे विचार व्हायला हवा, असेही डॉ. सुनीता यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
