H1N1 Influenza and Swine Flu Prevention Tips : ताप आला, औषधं घेतली आणि काही दिवसांनी ताप उतरला म्हणून तुम्ही पुन्हा कामाला लागता. पण काहीतरी वेगळं जाणवतंय? एखाद्या दिवशी तुम्हाला जवळपास पूर्णपणे बरं वाटतं, तर दुसऱ्या दिवशी साधी दैनंदिन कामं केली तरी अंग जड वाटतं, त्यासोबत हलका तापही येतो. ‘आपल्याला आधीचाच संसर्ग पुन्हा झाला का?’ असा प्रश्न मनात येतो.
पावसाळ्यात अशी परिस्थिती अनेकांसाठी गोंधळात टाकणारी ठरू शकते. कारण या काळात डेंग्यू, चिकनगुनिया, इन्फ्लूएंझा, एच१ एन१ यांसारखे अनेक संसर्ग एकाच वेळी पसरू शकतात. त्यामुळे ताप उतरला म्हणजे शरीर पूर्णपणे पूर्ववत झालेच असे नाही. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरनजीत चॅटर्जी यांच्या मते, या संसर्गांची लक्षणं एकमेकांत मिसळू शकतात. संसर्गातून बरे होण्याची प्रक्रिया नेहमीच सरळ नसते, काही प्रकरणांत ती गुंतागुंतीची ठरते.
ताप उतरल्यानंतरही अशक्तपणा का राहतो?
डॉ. सुरनजीत चॅटर्जी म्हणाले, ताप उतरला की “आता आपण पूर्ण बरे झालो” असे वाटणे साहजिक आहे. शरीराचे तापमान सामान्य झाले की, आपली ऊर्जा पण परत येईल, असा अनेकांचा समज असतो. पण शरीराला संसर्गातून सावरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे ताप नसला तरी काही दिवस अशक्तपणा, भूक कमी होणे, अंगदुखी आणि नेहमीपेक्षा कमी ऊर्जा जाणवू शकते.
संसर्गाच्या काळात कमी प्रमाणात खाणे, शरीरातील पाणी कमी होणे, झोप नीट न होणे आणि काही दिवस शारीरिक हालचाल कमी होणे याचा शरीरावर परिणाम होतो. त्याचवेळी संसर्गाशी लढण्यासाठी सक्रीय झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीलाही पूर्वस्थितीत येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह आला किंवा ताप गेला, तरी शरीराची ताकद लगेच पूर्ववत होईलच असे नाही, असेही डॉ. चॅटर्जी नमूद करतात.
याचा अर्थ असा की, ताप उतरला किंवा तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे संसर्ग अजूनही शिल्लक आहे, असे नाही. निगेटिव्ह रिपोर्ट येणे ही दिलासादायक बाब आहे. मात्र, त्यावरून शरीराने आपली पूर्वीची ताकद किती लवकर परत मिळवली आहे, हे ठरवता येत नाही, असेही चॅटर्जी सांगतात.
काही दिवस बरे वाटते, मग पुन्हा थकवा का जाणवतो?
डॉ. चॅटर्जी पुढे म्हणाले, ताप उतरल्यानंतर काही दिवसांनी रुग्णाला “आता आपण पूर्णपणे बरे झालो” असे वाटू शकते. त्यामुळे तो लगेच कामावर जातो, प्रवास करतो किंवा व्यायाम सुरु करु शकतो. मात्र, शरीर अजूनही आजारातून पूर्णपणे सावरलेले नसते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अचानक जास्त थकवा जाणवू शकतो.
अशावेळी आजार पुन्हा झाला आहे, असे वाटू शकते. पण प्रत्येक वेळी तसे असेलच असे नाही. शरीर पूर्ववत होण्यापूर्वीच नेहमीची किंवा जास्त मेहनतीची कामे सुरू केल्यामुळेही थकवा वाढू शकतो. त्यामुळे ताप उतरला म्हणून लगेच व्यायाम किंवा जड काम सुरू करण्याऐवजी दैनंदिन कामांना हळूहळू सुरुवात करणे गरजेचे ठरते.
दुसरा संसर्ग होण्याचाही धोका
इथे एक गोष्ट चिंतेची ठरू शकते. एका संसर्गातून शरीर सावरत असतानाच दुसरा संसर्ग होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्ग एकाच वेळी पसरत असतात आणि त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते.
डेंग्यू, चिकनगुनिया, फ्लू यांसारख्या संसर्गांमध्ये सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा अशी सारखीच लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे व्यक्तीला पहिल्या आजारातून सावरण्यास वेळ लागतोय की तिला नवीन संसर्ग झाला आहे, हे नेहमीच केवळ लक्षणांवरून ठरवता येत नाही. सरकारी मार्गदर्शक तत्वांनुसार, एक संसर्ग झाला आहे, म्हणून दुसरा संसर्ग होणार नाही असे नाही. काही वेळा दोन संसर्ग एकाच वेळीही होऊ शकतात, असेही डॉ. चॅटर्जी यांनी नमूद केले आहे.
उदाहरणार्थ, एखादा रुग्ण फ्लूच्या संसर्गातून बरा होऊन कामावर परततो. त्यानंतर नव्या संसर्गाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला पुन्हा ताप येऊ शकतो. दुसऱ्या व्यक्तीला सुरुवातीला व्हायरल ताप असल्याचे निदान होऊ शकते आणि काही दिवसांनी त्याची डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते.
त्यामुळे प्रत्येक वेळी अशक्तपणा किंवा ताप पुन्हा जाणवला, म्हणजे हा केवळ ‘पोस्ट-व्हायरल थकवा’ आहे असे मानणे योग्य नाही. अशा परिस्थितीत नेमके कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.
ताप उतरला म्हणजे डेंग्यूचा धोका संपतो का?
डॉ. चॅटर्जी यांच्या मते, डेंग्यूमध्ये ताप किती काळ राहतो आणि तो कसा कमी होतो ते महत्त्वाचं असतं. ताप उतरला म्हणजे रुग्ण पूर्णपणे धोक्याबाहेर आहे, असे नेहमीच मानता येत नाही. काही रुग्णांमध्ये ताप कमी होत असतानाच आजाराची गंभीर अवस्था सुरू होऊ शकते.
या काळात सतत उलट्या होणे, पोटात तीव्र दुखणे, रक्तस्राव, जास्त झोप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थपणा किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डेंग्यूमध्ये केवळ प्लेटलेट्सची संख्या पाहून रुग्णाची प्रकृती सुधारतेय की बिघडतेय, हे ठरवता येत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण, रक्तदाब, हेमॅटोक्रिट (रक्तातील लाल रक्तपेशींची टक्केवारी, जी प्लाझ्मा गळती दर्शवते) आणि रुग्णाची एकूण प्रकृती यांचाही डॉक्टर विचार करतात. त्यामुळे ताप कमी झाल्यानंतरही रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
दीर्घकाळ थकवा जाणवत असेल तर काय करावे?
डॉ.चॅटर्जी पुढे सांगतात, संसर्ग सुरू असल्याचा किंवा नवीन संसर्ग झाल्याची कोणतीही खात्री नसेल, तर रुग्ण बरा व्हावा या दृष्टीने लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुरेशी झोप घेणे, नियमित व संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि शारीरिक हालचाली हळूहळू वाढवणे यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत होते.
थकवा जाणवत आहे म्हणून स्वतःहून अँटिबायोटिक्स घेऊ नयेत. संसर्गजन्य आजारावर अँटिबायोटिक्सचा उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे स्टेरॉइड्स किंवा इतर औषधेही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असेही डॉ. चॅटर्जी नमूद करतात.
हा सामान्य रिकव्हरीचा भाग नाही, हे कधी समजावे?
डॉ. चॅटर्जी यांनी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, बहुतेक रुग्णांची प्रकृती हळूहळू सुधारते. मात्र, लक्षणे कमी होण्याऐवजी वाढत असतील तर पुन्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ताप पुन्हा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत अस्वस्थता किंवा दुखणे, वारंवार उलट्या होणे, चक्कर येऊन बेशुद्ध पडणे, गोंधळाची अवस्था, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा प्रकृतीमध्ये अचानक मोठी बिघाड होणे, ही लक्षणे केवळ संसर्गानंतरचा अशक्तपणा म्हणून दुर्लक्षित करू नयेत.
लक्षणे अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकत असतील आणि त्यात कोणतीही सुधारणा होत नसेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. कारण संसर्गातून बरे होण्याची प्रक्रिया नेहमी सरळ रेषेत होत नाही. काही दिवस बरे वाटणे आणि त्यानंतर पुन्हा थकवा जाणवणे शक्य आहे, असे डॉ. चॅटर्जी स्पष्ट करतात.
