Hair Growth Cycle: समजा, तुम्ही आजपासून केस कापणं पूर्णपणे बंद केलं, तर ते वाढत वाढत जमिनीपर्यंत पोहोचतील का? प्रत्यक्षात असं होत नाही. मानवी केसांची वाढ एका विशिष्ट जैविक चक्रानुसार होते. प्रत्येक केसाच्या वाढीचा एक ठरावीक कालावधी असतो. त्यानंतर केसांची वाढ थांबते आणि ते नैसर्गिकरीत्या गळतात. मग केसांची कमाल लांबी किती असू शकते? नियमित ट्रिमिंग केल्याने केसांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घेऊया.

केसांची वाढ कशी होते?

मानवी केसांचे मुख्यतः दोन भाग असतात. पहिला म्हणजे केसांचा बाहेर दिसणारा भाग, ज्याला ‘हेअर शाफ्ट’ म्हणतात. दुसरा भाग म्हणजे त्वचेच्या आत असलेली केसांची मूळं. ही मूळं त्वचेखाली असलेल्या केसांच्या पुटिकेमध्ये म्हणजेच ‘हेअर फॉलिकल’मध्ये असतात. केसांचा बाहेर दिसणारा भाग प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेला असतो. केसांचा हा भाग निर्जीव पेशींनी तयार झालेला असतो. मात्र, केसांच्या मुळाशी असलेल्या पुटिकेच्या तळाशी जिवंत पेशी असतात. याच पेशींचं वेगाने विभाजन होऊन नवीन केस तयार होतात.

केसांची पुटिका ही त्वचेच्या आतील बाजूस असलेली नळीसारखी रचना असते. तिच्या तळाशी असलेल्या पेशींचं सतत विभाजन होतं. या नवीन पेशी वरच्या दिशेने सरकत असताना हळूहळू कठीण होतात आणि त्यामध्ये रंगद्रव्य तयार होतं. याच प्रक्रियेतून केसांचा धागा तयार होतो आणि तो त्वचेच्या बाहेर दिसू लागतो. ही प्रक्रिया सतत सुरू असल्यामुळे केस वाढणं कधीच थांबत नाही, असा अनेकांचा समज होतो. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक केसाच्या धाग्याचा एक निश्चित कालावधी असतो. केसांच्या वाढीचे एक चक्र असतं आणि त्या चक्रातील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार केसांची वाढ, विश्रांती आणि गळणं सुरू असतं.

साधारणपणे कोणत्याही एका वेळी डोक्यावरील सुमारे १५ टक्के केस विश्रांतीच्या अवस्थेत असतात. या अवस्थेला ‘टेलोजन फेज’ (Telogen Phase) म्हणतात. हा टप्पा साधारण तीन महिने टिकू शकतो. या काळात संबंधित केसांच्या पुटिकेतून नवीन केसांची वाढ होत नसते. त्यानंतर जुना केस गळतो आणि नवीन केस वाढण्याची प्रक्रिया सुरू होते. दररोज काही प्रमाणात केस गळणं हीदेखील नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामान्यतः एका व्यक्तीचे दिवसाला ५० ते १०० केस गळू शकतात, त्यामुळे केसांची वाढ होत असतानाच जुने केस गळतही असतात. 

डोक्यावरील केसांची वाढ साधारणपणे दर महिन्याला अर्धा इंच होते. एका केसाचं वाढीचं चक्र साधारण दोन ते सहा वर्ष टिकू शकतं. या कालावधीनुसार एखाद्या व्यक्तीचे केस साधारण तीन फूट लांबीपर्यंत वाढू शकतात. उदाहरणार्थ, दर महिन्याला अर्धा इंच या गतीने सहा वर्ष केस वाढत राहिले, तर त्यांची लांबी सुमारे ३६ इंच म्हणजेच तीन फूट होऊ शकते.

काही व्यक्तींमध्ये केसांची वाढ तुलनेने वेगाने होते किंवा केसांचा वाढीचा टप्पा अधिक काळ टिकतो. अशा व्यक्तींचे केस पाच फुटांपर्यंतही वाढू शकतात. मात्र, इतकी लांबी गाठणं तुलनेने दुर्मीळ आहे. केसांची कमाल लांबी ही प्रामुख्याने आनुवंशिकता, केसांच्या वाढीचा कालावधी आणि त्यांची एकूण स्थिती यावर अवलंबून असतं.

केस किती दिवसांनी कापावे?

केस किती दिवसांनी कापावेत यासाठी कोणताही एक ठराविक नियम नाही. केसांचा प्रकार, त्यांची लांबी, तुम्हाला हवी असलेली केशरचना आणि केसांची स्थिती यांनुसार केस कधी कापावेत हे ठरतं. अनेक हेअर स्टायलिस्ट साधारण सहा ते आठ आठवड्यांनी केस ट्रिम करण्याचा सल्ला देतात. 

काही जण केसांची लांबी वाढवण्यासाठी प्रत्येक वेळी अगदी पाव इंचापेक्षा कमी केस कापतात आणि दोन ट्रिमिंगमधील अंतर वाढवतात, तर काही जण ठराविक केशरचना कायम ठेवण्यासाठी दर महिन्याला अर्धा इंच केस कापतात. 

  • लहान केस असणाऱ्यांसाठी : लहान केसांची ठराविक रचना आणि आकार टिकवून ठेवण्यासाठी साधारण चार ते सहा आठवड्यांनी केस ट्रिम करणं फायदेशीर ठरतं. केस थोडे जरी वाढले तरी लहान केशरचनेचा आकार बदलू शकतो.
  • मध्यम किंवा लांब केस असणाऱ्यांसाठी : केसांची लांबी आणि त्यांचा आकार व्यवस्थित राखण्यासाठी साधारण सहा ते आठ आठवड्यांनी ट्रिमिंग करता येतं. मात्र, केसांची लांबी अधिक वाढवायची असेल तर साधारण तीन महिन्यांनी ट्रिमिंग करणं पुरेसं ठरू शकतं.
  • लेयर्स असलेल्या केसांसाठी : केसांना विशिष्ट आकार देण्यासाठी लेयर्स केले असतील, तर साधारण सहा आठवड्यांनी ट्रिमिंग करणं उपयोगी ठरतं, त्यामुळे केसांचा आकार टिकून राहतो आणि केशरचना विस्कटलेली दिसत नाही.
  • कुरळ्या केसांसाठी : कुरळे किंवा अधिक गुंतागुंतीची रचना असलेल्या केसांना वारंवार कापण्याची आवश्यकता नसते. साधारण दोन ते चार महिन्यांनी ट्रिमिंग केल्यास केसांचा नैसर्गिक आकार आणि पोत टिकवून ठेवण्यास मदत होते.
  • रंग किंवा रासायनिक प्रक्रिया केलेल्या केसांसाठी : केसांना रंग दिला असेल किंवा स्ट्रेटनिंगसारखी रासायनिक प्रक्रिया केली असेल, तर त्यांची अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. अशा केसांसाठी साधारण चार ते सहा आठवड्यांनी ट्रिमिंग करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, केसांची लांबी वाढवायची असल्यास हे अंतर आठ आठवड्यांपर्यंत ठेवता येतं.

केस ट्रिम का करावेत?

केस कापणं म्हणजे केवळ त्यांची लांबी कमी करणं नव्हे. केसांचं आरोग्य आणि त्यांचा व्यवस्थित आकार टिकवून ठेवण्यासाठीही ट्रिमिंग महत्त्वाचं असतं. केसांच्या टोकांना ‘स्प्लिट एंड्स’ (Split Ends) सारखी समस्या अनेकांना जाणवते. केसांची बाह्य संरचना कमकुवत झाल्यामुळे केसांची टोकं दोन किंवा अधिक भागांत विभागली जातात.

नियमित ट्रिमिंग केल्यामुळे अशी फुटलेली टोकं काढून टाकता येतात, त्यामुळे केसांचं अधिक नुकसान होण्याची शक्यता कमी करता येते. तसेच केसांच्या टोकांवरील कोरडे, खराब झालेले आणि लवचिकता गमावलेले भाग काढल्यामुळे केसांचा एकूण आकार आणि देखावा सुधारतो.

वाढत्या वयानुसार आणि दैनंदिन वापरामुळे केसांच्या टोकांवर झीज होत जाते, त्यामुळे केस जितके लांब असतील तितकी त्यांच्या टोकांची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

केस कापणं बंद केलं तर काय होईल?

केस कापणं पूर्णपणे बंद केल्यास सुरुवातीला ते नेहमीप्रमाणे वाढतील. मात्र, कालांतराने केसांची टोकं कोरडी होऊन फुटू लागतात; त्यामुळे केस विस्कटलेले, गुंतागुंतीचे आणि हाताळण्यास कठीण होतात.

अनेकदा केसांची वाढ थांबल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात मुळाशी केस वाढत असतात; मात्र टोकांकडील केस तुटत असल्याने लांबी वाढताना दिसत नाही. यामागे मुख्य कारण म्हणजे ‘स्प्लिट एंड्स.’ केसांची टोकं फुटल्यानंतर ही फूट वरच्या दिशेने पसरू शकते, त्यामुळे केस अधिक कमकुवत होऊन तुटण्याचं प्रमाण वाढतं.

लांब केसांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. कारण त्यांच्या टोकांची अनेक वर्षांपासून झीज होत असते. हेअर स्टायलिंग, उष्णता देणारी उपकरणे, सतत होणारं घर्षण आणि झोपताना उशीशी होणारा संपर्क यामुळेही केसांचं नुकसान होतं.

अशा वेळी नियमित ट्रिमिंग केल्यास ‘स्प्लिट एंड्स’ काढता येतात, त्यामुळे नुकसान वरच्या भागापर्यंत पसरण्याचा धोका कमी होतो आणि केसांचा देखावाही सुधारतो.

केसांच्या आरोग्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर होतो?

केस किती लांब वाढू शकतात हे केवळ तुम्ही ते किती वेळा कापता यावर अवलंबून नसतं. केसांचं एकूण आरोग्य आणि त्यांना मिळणारं पोषण यांचाही त्यावर परिणाम होतो. आनुवंशिकता, वय, हार्मोन्स, आहार आणि आरोग्याशी संबंधित काही घटक केसांच्या वाढीवर परिणाम करू शकतात. केसांची रचना मजबूत आणि निरोगी असेल तर दैनंदिन घर्षण, विंचरणं आणि स्टायलिंगमुळे होणारी झीज सहन करण्याची त्यांची क्षमता अधिक असते. याउलट, कमकुवत आणि कोरडे केस लवकर तुटू शकतात, त्यामुळे केसांची लांबी वाढवायची असेल तर केवळ ट्रिमिंगवर अवलंबून राहून चालत नाही. केसांना आवश्यक पोषण देणं, त्यांची स्वच्छता राखणं आणि नुकसान होण्यापासून त्यांचं रक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

केसांचं आरोग्य कसं टिकवावं?

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. त्यासाठी महागड्या उत्पादनांचीच गरज असते असं बंधनकारक नाही. दैनंदिन केसांची निगा राखताना पुढील गोष्टी लक्षात ठेवता येतील.

  • नियमित ट्रिमिंग करा : केसांची टोकं फुटली असतील किंवा अधिक खराब झाली असतील तर पुढील नियोजित हेअरकटपर्यंत वाट पाहू नका. आवश्यकतेनुसार केस ट्रिम करून घ्या.
  • स्प्लिट एंड्स ओढू नका : केसांची टोकं फुटली असतील तर ते हाताने ओढून किंवा खेचून काढण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे केसांचं नुकसान अधिक वाढू शकतं.
  • उष्णतेचा वापर कमी करा : हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग आयर्न यांसारख्या उपकरणांमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात, त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित ठेवा. अगदीच वापरण्याची गरज असेल तर हीट प्रोटेक्टंटचा वापर करा.
  • योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा : केसांच्या प्रकारानुसार सौम्य शॅम्पू आणि पोषण देणारं कंडिशनर वापरा. यामुळे केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
  • केस विंचरताना काळजी घ्या : केसांच्या फांद्या किंवा ब्रशचे दात तुटलेले असतील तर त्यांचा वापर टाळा. केस जोरात ओढण्याऐवजी हलक्या हाताने विंचरा. विशेषतः ओले केस अधिक नाजूक असतात, त्यामुळे ते विंचरताना विशेष काळजी घ्या.
  • सॅटिनच्या उशीचा वापर करा : विशेषतः कुरळे केस असलेल्या व्यक्तींना सॅटिनच्या उशीच्या अभ्रकाचा फायदा होऊ शकतो. यामुळे झोपताना केस आणि उशी यांच्यात होणारे घर्षण कमी होण्यास मदत होते.
  • संतुलित आहार घ्या : केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात, त्यामुळे आहारात संतुलित पोषणाचा समावेश करा. आवश्यक पोषक घटकांची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक गोळ्या किंवा सप्लिमेंट्स घेता येतात.
  • कोरड्या केसांसाठी मास्क वापरा : केस अधिक कोरडे वाटत असतील तर त्यांच्या प्रकारानुसार हेअर मास्क किंवा डीप कंडिशनिंग ट्रीटमेंटचा वापर करता येतो. यामुळे केसांना ओलावा मिळण्यास मदत होते.
  • टाळूची स्वच्छता राखा : केसांच्या वाढीसाठी टाळू निरोगी ठेवणंही महत्त्वाचं आहे. टाळूवरील अतिरिक्त तेल, धूळ आणि उत्पादनांचे अवशेष काढण्यासाठी योग्य शॅम्पू वापरा. टाळूच्या विशिष्ट समस्यांसाठी सीरम किंवा इतर उपचार वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्यामुळे केस लांब वाढवायचे असतील तर केवळ केस वाढू देणं पुरेसं नाही; त्यांची योग्य काळजी घेणं, नुकसान टाळणं आणि गरजेनुसार ट्रिमिंग करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.