Gut Bacteria Impact on Health : वय अवघे ३० वर्षे…; पण अंशिकाच्या डोक्यावरचे केस गळत होते, पोटात सतत गॅस आणि जेवणानंतर प्रचंड जडपणा जाणवत होता. औषधे बदलून आणि आहार नियंत्रित करूनही अंशिकाचा त्रास कमी होत नव्हता. काही महिन्यांपासून ती या आरोग्य समस्यांवर वेगवेगळ्या पातळीवर उपाय शोधत होती. तिचे केस वेगाने गळत होते म्हणून तिने केस वाढवण्यासाठी न्यूट्रिशनच्या गोळ्या सुरू केल्या. पोटात होणारा गॅस असह्य झाला म्हणून तिने अँटॅसिडच्या गोळ्या खाणे सुरू केले. त्यानंतर तिला जेवणानंतर पोटात जडपणा जाणवू लागला. नेहमीसारखे साधे-सोपे जेवण जेवल्यानंतरही तिचे पोट फुगायचे. त्यातच कोणीतरी तिला ग्लुटेनचे (गहू आणि जवसामधून मिळणारं प्रथिन) सेवन न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिने स्वतःच्या आहारातून ग्लुटेनचं प्रमाण कमी केलं. पण, नेमक्या कोणत्या पदार्थामुळे त्रास होतोय, हे तिला समजत नव्हते.

अंशिकाने रक्त तपासणी केली तेव्हा फेरिटिनचे (Ferritin) प्रमाण कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे तिने लोहाच्या गोळ्या खाणे सुरू केले. मात्र, त्यातून समस्या सुटण्याऐवजी तिचा पचनाशी संबंधित त्रास वाढला. परिणामी तिला अस्वस्थ वाटू लागले.

अंशिका प्रत्येक लक्षणावर स्वतंत्र उपाय करत होती. मात्र, या सगळ्या लक्षणांचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा विचार तिने केलाच नाही. गॅस, पोटफुगी (Abdominal bloating), जेवल्यानंतर जाणवणारा जडपणा आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना पोषणद्रव्यांची कमतरता -अशी लक्षणे एकत्रितपणे दिसत असतील, तर ते लहान आतड्यात जीवाणूंची वाढ झाल्याचे म्हणजेच ‘सिबो’चे (SIBO) संकेत असू शकतात.

नोएडातील मेट्रो हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. हर्ष कपूर यांच्या मते, “अशा प्रकारची लक्षणे एकत्र दिसणे हे ‘सिबो’चे संकेत असू शकतात. अशा रुग्णांमध्ये गॅस, पोट फुगणे, जेवल्यानंतर पोट जड होणे आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना पोषणद्रव्यांची कमतरता, अशी मिश्र लक्षणे दिसू शकतात.

सिबो म्हणजे नेमकं काय?

सिबो म्हणजे लहान आतड्यात जीवाणूंची असामान्य वाढ होणे. सामान्यतः मोठ्या आतड्याच्या तुलनेत लहान आतड्यात जीवाणूंचे प्रमाण कमी असते. “मात्र, या जीवाणूंची संख्या वाढली की, ते कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक घटकांचे लवकर विघटन (Fermentation) करतात. या प्रक्रियेत हायड्रोजन आणि मिथेनसारखे वायू तयार होतात,” असेही डॉ. हर्ष नमूद करतात.

या प्रक्रियेमुळे पोट फुगणे, पोटदुखी, गॅस होणे, ढेकर येणे आणि जेवणानंतर जड वाटणे, असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे काही रुग्ण खाण्याचे प्रमाण कमी करतात किंवा आहारातून स्वतःहून काही पदार्थ काढून टाकतात. त्रास कायम राहिल्यास ते पुन्हा वेगवेगळे उपाय करून पाहतात. अशा प्रकारे जेवणानंतर जाणवणाऱ्या अस्वस्थतेमुळे आहारात कपात केली, तर एक त्रासदायक चक्र तयार होऊ शकते.

लहान आतड्यात जीवाणू वाढतात तरी कसे?

डॉ. हर्ष यांच्या मते, आतड्यात जीवाणूंची वाढ होणे ही केवळ एक बाजू आहे. लहान आतड्यात हे जीवाणू जमा होण्याची परिस्थिती का निर्माण झाली, हे शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. “आतड्यांमध्ये होणारी अन्नाची हालचाल मंदावणे, पचनमार्गाच्या रचनेत बदल होणे, यापूर्वी झालेली पचनसंस्थेची शस्त्रक्रिया किंवा पचनसंस्थेशी संबंधित इतर समस्यांमुळे लहान आतड्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते,” असे डॉ. हर्ष नमूद करतात.
जीवाणूंच्या वाढीमुळे शरीरात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ लक्षणांवर तात्पुरते उपचार करण्याऐवजी त्यामागचे मूळ कारण शोधणे महत्त्वाचे ठरते.

फेरिटिन कमी असल्यास काय होते?

‘सिबो’मुळे काही रुग्णांमध्ये पोषकद्रव्यांचे पचन आणि शरीरात त्यांचे शोषण होण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. शरीर पोषकद्रव्ये शोषून घेण्यापूर्वीच लहान आतड्यातील जीवाणू त्या पोषकद्रव्यांचा वापर करू शकतात. मात्र, रक्तात फेरिटिन किंवा लोहाची कमतरता दिसली म्हणून त्याला थेट ‘सिबो’ कारणीभूत आहे, असे मानता येत नाही. आहारातून पुरेसे लोह न मिळणे, मासिक पाळीत होणारा रक्तस्राव, पचनसंस्थेतील काही आजार यांसारख्या अनेक कारणांमुळे लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. काही रुग्णांमध्ये पचनसंस्थेतून होणारा रक्तस्रावही कारणीभूत ठरू शकतो. “फेरिटिन किंवा लोहाची पातळी कमी आहे म्हणून प्रत्येक वेळी त्याचा संबंध सिबोशी जोडता येत नाही,” असे डॉ. हर्ष कपूर स्पष्ट करतात.

त्याशिवाय तोंडावाटे लोह पुरके घेतल्याने पचनसंस्थेशी संबंधित त्रास सुरू होऊ शकतात. त्यामुळे लोहसेवनानंतर गॅस किंवा पोटातील अस्वस्थता वाढली, तर त्यामागे सिबोच कारणीभूत आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही.

केसगळतीमागेही सिबोचा संबंध?

अंशिकाला सुरुवातीला जाणवलेली समस्या होती ती म्हणजे केसगळतीची. केस मोठ्या प्रमाणात गळू लागल्यानंतर तिने आहार पुरके घेण्यास सुरुवात केली; पण पुढे तिच्या पचनाशी संबंधित तक्रारीही वाढत गेल्या. म्हणजेच शरीरातील पोषकद्रव्यांच्या कमतरतेमुळे केसगळतीचे प्रमाण वाढू शकते. काही रुग्णांमध्ये फेरिटिनची कमी पातळी केसगळतीशी संबंधित असू शकते. मात्र, केस गळत आहेत म्हणून त्याचे कारण थेट सिबो आहे, असे मानणे योग्य नाही. “केसगळती थांबण्यासाठी महिलांमध्ये फेरिटिनची पातळी ४० ते ७० ng/mL इतकी असणे आवश्यक आहे; पण ही सर्वमान्य पातळी नाही. फेरिटिनची पातळी कमी असल्यास तपासणी करणे आवश्यक असू शकते. एका आकड्यावर अवलंबून राहण्यापेक्षा एकूण वैद्यकीय स्थिती अधिक महत्त्वाची आहे,” असे डॉ. हर्ष सांगतात.

‘सिबो’चे निदान कसे केले जाते?

‘सिबो’ आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर हायड्रोजन आणि मिथेन ब्रीद टेस्ट (Methane Breath Test) करतात. या तपासणीत रुग्णाला ठरावीक कार्बोहायड्रेटचे पेय प्यायला दिले जाते. त्यानंतर ठरावीक वेळाने रुग्णाच्या श्वासाचे नमुने घेतले जातात. या नमुन्यांमधून हायड्रोजन आणि मिथेन वायूचे प्रमाण तपासले जाते. अर्थात, केवळ या टेस्टचा रिपोर्ट पाहून सिबोचे निदान केले जात नाही.

डॉ. हर्ष कपूर सांगतात की, टेस्टचा रिपोर्ट, रुग्णाची लक्षणे, त्याचा वैद्यकीय इतिहास आणि सध्याची तब्येत या सर्व गोष्टी एकत्र पाहूनच सिबोचे निदान करणे गरजेचे आहे.

‘सिबो’वर उपचार कोणता?

‘सिबो’चे उपचार प्रत्येक रुग्णाच्या समस्येनुसार ठरवले जातात. आतड्यातील जीवाणूंची वाढ कमी करण्यासाठी डॉक्टर अँटिबायोटिक्स देऊ शकतात. त्यासोबत योग्य आहार आणि पोषणाकडेही लक्ष दिले जाते. मात्र, केवळ ???जीवाणू (की- जीवाणूंची संख्या)??? कमी करणे पुरेसे नसते. सिबो का झाला? हे शोधून त्यामागील मूळ कारणावर उपचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

डॉ. हर्ष कपूर यांच्या मते, सिबोची लक्षणे वारंवार दिसत असतील, तर केवळ अँटॅसिड्स घेऊन, त्यावर उपचार करणे योग्य नाही. कारण- मूळ समस्या दूर झाली नाही, तर त्रास पुन्हा होऊ शकतो.

उपचार घेताना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात :

  • पचनसंस्थेशी निगडित समस्यांचे कारण शोधणे
  • शरीरात लोहाची कमतरता का झाली, हे तपासणे
  • केसगळतीमागचे कारण योग्य पद्धतीने तपासणे
  • गरज असल्यास मिथेन ब्रीद टेस्ट करून घेणे
  • ‘सिबो’चे निदान झाल्यास तो नेमका कशामुळे झाला, हे शोधणे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही पदार्थ आहारातून पूर्णपणे वगळू नये. असे केल्याने आहारावर अनावश्यक बंधने येऊ शकतात आणि शरीरातील पोषणाची कमतरता वाढू शकते