अंतराळात जाणारा पहिला प्राणी म्हणजे ‘लायका’ नावाची रशियन कुत्री होती. त्यानंतर काही वर्षांनी ‘हॅम’ नावाच्या चिंपान्झीला अंतराळात पाठवण्यात आले. मात्र हे वानर ‘लायका’पेक्षा अधिक नशीबवान ठरले. पृथ्वीबाहेरील वातावरण सहन न झाल्याने ‘लायका’चा मृत्यू झाला. मात्र ‘हॅम’ हे मर्कट अंतराळ प्रवास करून पृथ्वीवर परतले. ‘अवकाश’भरारी घेणाऱ्या या चिंपान्झीचे अमेरिकेतील ॲशेबोरो प्राणीसंग्रहालयात स्मारक तयार करण्यात येणार आहे. या वानराच्या शौर्याचे हे प्रतीक असेल.
चिंपान्झीला अंतराळात पाठवण्याची मोहीम
हॅम (Ham) हा अंतराळात प्रवास करणारा जगातील पहिला चिंपान्झी होता. नासाच्या ‘मर्क्युरी- रेडस्टोन २’ या मोहिमेअंतर्गत ३१ जानेवारी १९६१ रोजी त्याला अंतराळात पाठवण्यात आले. अंतराळात जाण्यापूर्वी त्याला अमेरिकी हवाई दलातर्फे १८ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.‘मर्क्युरी- रेडस्टोन’ यानाद्वारे त्याने अंतराळात प्रवेश केला. हे यान पृथ्वीपासून १५७ मैल उंचीवर अवकाशात झेपावले. ‘ॲस्ट्रोचिम्प’ (अंतराळवीर चिम्पांझी) असलेल्या हॅमने १६ मिनिटांच्या कालावधीत ताशी ५,८०० मैल वेगाने अवकाशातून प्रवास केला आणि अटलांटिक महासागरात सुरक्षितपणे उतरला. मानवाच्या पहिल्या अंतराळ प्रवासाच्या अवघ्या काही महिने आधीच, अंतराळात जाणारा तो पहिला ‘होमिनिड’ (कपी) ठरला. अंतराळात सुरक्षित प्रवास करणाऱ्या या चिंपान्झीने पुढे मानवाला अंतराळात पाठवण्याचा मार्ग मोकळा केला.
चिंपान्झीला पाठवण्याचे कारण काय?
अंतराळात मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याची नासाची इच्छा होती. अंतराळात माणूस पाठवण्यापूर्वी याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी चिंपान्झीची निवड केली. चिंपान्झी हा मानवाच्या सर्वात जवळचा आणि अतिशय बुद्धिमान प्राणी मानला जातो. तो माणसाप्रमाणेत अनेक भाव-भावना व्यक्त करून शकतो. त्यामुळे अंतराळात जाण्यासाठी चिंपान्झीची निवड करण्यात आली. अंतराळ मोहिमेसाठी त्याला १९५९ मध्ये अमेरिकी हवाई दलाच्या तळावर पाठवण्यात आले. अंतराळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तिथे त्याला खास प्रशिक्षण देणत आले. त्यानंतर साडेतीन वर्षांनी म्हणजे १९६१ मध्ये त्याला अंतराळात पाठवण्यात आले. या काळातील त्याच्या शरीरातील बदलांच्या नोंदी घेण्यात आल्या. हॅमच्या उड्डाणादरम्यान गोळा करण्यात आलेल्या शारीरिक माहितीने, जसे की हृदयाचे ठोके, श्वसन आणि तणावाच्या प्रतिक्रिया, नासाला अंतराळ प्रवासाच्या जैविक परिणामांबद्दल महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
‘लायका’ श्वानापेक्षा नशीबवान?
मॉस्कोच्या रस्त्यावर भटकणाऱ्या एका मादी श्वानाला तत्कालीन सोव्हिएत महासंघाने अंतराळात पाठवले. लायका नावाचे हे श्वान ३ नोव्हेंबर १९५७ रोजी ‘स्पुतनिक-२’ या यानातून अंतराळात पाठवण्यात आले. त्यामुळे अंतराळात जाणारा तो पृथ्वीवरील पहिला प्राणी ठरला. मात्र या मोहिमेचे नियोजन घाईघाईत करण्यात आले होते. लायकाला अंतराळातून जिवंत परत आणण्याचे कोणतेही तंत्रज्ञान विकसित नव्हते. त्यामुळे उड्डाणाच्या काही तासानंतरच जास्त उष्णता आणि भीतीमुळे तिचा अंतराळातील कक्षेत मृत्यू झाला. मात्र त्यामानाने हॅम हा चिंपान्झी नशीबवान ठरला. अंतराळात प्रवास करून तो पृथ्वीवर परतला. परतीच्या प्रवासात त्याचे यान मार्गावरून भरकटले. अटलांटिक महासागरात आपल्या लक्ष्यापासून २०९ किलोमीटर अंतरावर दूर ते पडले. या चिंपान्झीला परत आणणे आव्हानात्मक होते. त्याला आणण्यासाठी गेलेले जहाज दोन तासानंतर त्याच्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी तो जिवंत हाेता आणि शांत बसला होता.
‘हॅम’चे आता स्मारक
पृथ्वीवर परतल्यावर, हॅम छायाचित्रकारांवर ओरडायचा आणि आपल्या सांभाळकर्त्याचे बोट चावायचा, पण नंतर तो शांत झाला. त्याने हे निर्णायकपणे सिद्ध केले की माणसे अंतराळ प्रवासातील खडतर परिस्थिती सहन करू शकतात आणि अशा प्रकारे त्याने संशोधनाच्या एका नवीन युगाची सुरुवात केली. ही अंतराळ मोहीम पूर्ण झाल्यानंतर हॅम या चिंपान्झीने अमेरिकी हवाई दलासाठीच्या अनेक प्रयोग मोहिमांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्याला आधी वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात आणि नंतर नॉर्थ कॅरोलिना प्रांतातील ॲशेबोरो येथील एनसी प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले. एनसी प्राणीसंग्रहालयात तो इतर चिंपान्झींमध्ये चांगलाच रुळला. मॅगी नावाच्या एका मादीशी त्याची मैत्री जुळली होती. पण १९८३ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी त्याचा या प्राणीसंग्रहालयात मृत्यू झाला. हॅमची जिज्ञासा आणि बुद्धिमत्ता यामुळेच त्याला प्रसिद्धी मिळाली, त्यामुळेच या प्राणीसंग्रहालयाबाहेर त्याचे स्मारक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
