गेल्या अनेक दिवसांपासून पॅलेस्टाईनमधील हमास ही दहशतवादी संघटना तसेच इस्रायल यांच्यात युद्ध पेटलेले आहे. हमास या संघनेला समूळ नष्ट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका इस्रायलने घेतली आहे. परिणामी गाझा पट्टीत आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हे युद्ध सुरू असताना २४ नोव्हेंबर २०३ रोजी चार दिवसांचा मानवतावादी विराम (ह्युमनिटेरियन पॉज) घोषित करण्यात आला आहे. या मानवतावादी विरामादरम्यान गाझा पट्टीतील युद्धग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गाझा पट्टीतील सध्याची स्थिती काय आहे? या भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे का? रुग्णालयांची स्थिती काय आहे? हे जाणून घेऊ या…

“पृथ्वीवर नकर निर्माण झाल्यासारखी स्थिती”

सध्या मानवतावादी विरामामुळे गाझा पट्टीतील मदतकार्याला वेग येईल, अशी स्वयंसेवी संस्थांना अपेक्षा आहे. गाझा पट्टीत सध्या अन्न, इंधन, पिण्याचे पाणी, औषधी अशा सर्वच बाबींचा तुटवडा निर्माण झालेला आहे. या भीषण परिस्थितीमुळे आगामी काळात गाझा पट्टीत वेगवेगळ्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून गाझा पट्टीतील उत्तरेकडच्या अर्ध्या भागाला मदत मिळत नाहीये. सध्या या भागाची स्थिती म्हणजे पृथ्वीवर नकर निर्माण झाल्यासारखे आहे, अशी भावना संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.

आतापर्यंत किती लोक विस्थापित झाले?

हे युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत गाझातील साधारण २.३ दशलक्ष लोक अंतर्गत विस्थापित झाले आहेत. यातील साधारण १ दशलक्ष लोक हे ‘युनायटेड नेशन्स पॅलेस्टिनी रिफ्युजी एजन्सी’द्वारे (UNRWA) चालवल्या जाणाऱ्या निर्वासितांसाठी उभारलेल्या १५६ निवारागृहात राहात आहेत. तशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेअर्सच्या (OCHA) कार्यालयाने दिली आहे.

ही सर्व निवारागृहे पूर्णपणे भरलेली आहेत. या निवारागृहांत क्षमतेच्या चार पट लोक राहात आहेत. तर इस्रायली बॉम्बगोळ्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी हजारो लोकांनी दक्षिणेकडे पळ काढलेला आहे. दक्षिणेकडेदेखील इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. परिणामी या हल्ल्यांत रोज अनेकांचा मृत्यू होत आहे.

जे लोक विस्थापित झालेले आहेत, त्यांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. पुरूष आणि छोटी मुळे हे खुल्या जागेवर झोपत आहेत. त्यांना झोपण्यासाठी चार भिंतीदेखील उपलब्ध नाहीत. काही लोकांनी खान युनिस या भागात निर्वासित शिबिरांच्या बाहेर तंबू ठोकले आहेत.

रुग्णालयांची काय स्थिती?

इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझातील अनेक रुग्णांची दुरवस्था झालेली आहे. बहुतांश रुग्णालये आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीयेत. अनेक रुग्णालयांत पुरेसे इंधन नाही. त्यामुळे ऑक्सिजन,विजेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. OCHA च्या म्हणण्यानुसार गाझाच्या दक्षिणेत एकूण ११ रुग्णालये आहेत. यातील फक्त ८ रुग्णालये सध्या कार्यरत आहेत. यातील फक्त एकच रुग्णालय असे आहे, ज्यात किचकट शस्त्रक्रिया करता येतात. जागतिक आरोग्य संघटनेचा आधार घेत OCHA ने ही माहिती दिलेली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार इस्रायल सैन्याचा वेढा असलेल्या गाझात अकाली प्रसूतींची संख्या लक्षणीय आहे. अशा स्थितीत प्रसूत महिलांची काळजी घेणे कठीण झाले आहे. महिला तणावात आहेत.

युद्धग्रस्तांना मदत मिळत आहे का?

गाझा पट्टीतील युद्धग्रस्तांना रफाह क्रॉसिंगच्या माध्यमातून मदत पुरविली जात आहे. मात्र हे प्रवेशद्वार निश्चित कालावधीसाठीच खुले करण्यात येते. याआधी २१ ऑक्टोबरला या प्रवेशद्वारातून गाझा पट्टीतील लोकांना मदतीचा पुरवठा करण्यात आला होता. २३ नोव्हेंबर रोजी मानवतावादी नियम म्हणून इजिप्तमधून मदतीचे एकूण ८० ट्रक गाझामध्ये पाठवण्यात आले होते. इजिप्तने दिलेल्या माहितीनुसार युद्धविराम सुरू झाल्यानंतर १ लाख ३० हजार लीटर डिझेल आणि गॅसचे चार ट्रक तसेच मदतीचे २०० ट्रक रोज पाठवले जातील.

पाण्याची काय स्थिती?

काही दिवसांपूर्वी इंधनपुरवठा झाल्यामुळे दक्षिण गाझातील काही ठिकाणी विहिरी आणि जलकुंभांतून पाणी काढले जात आहे. उत्तर गाझामध्ये मात्र पाण्याची टंचाई मोठी समस्या बनली आहे. उत्तरेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन कार्यरत नाहीयेत. तशी माहिती OCHAने दिली आहे. इंधनाची कमतरता असल्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बंद पडलेले आहेत. रफाह सीमाभागात सांडपाणी रस्त्यांवर आलेले आहे.

इंधनाची काय स्थिती?

गाझा पट्टीत सध्या इंधनाचा तुटवडा आहे. मात्र रोज मर्यादित प्रमाणात इंधन पुरवठा करण्यास इस्रायलने परवानगी दिलेली आहे. हा इंधनपुरवठा इजिप्तमधून केला जात आहे. २३ नोव्हेंबरला नुकतेच ७५ हजार लीटर इंधन गाझामध्ये पाठवण्यात आले आहे. गाझामध्ये हे इंधन UNRWA च्या माध्यमातून वितरित केले जात आहे. हे इंधन रुग्णालये, पाणीपुरवाठा करणाऱ्या तसेच सांडपाण्याची विल्हेवाट लावणाऱ्या ठिकाणांना केला जात आहे. यासह अत्यावश्यक सेवा, निर्वासित शिबिरांनाही हा इंधनपुरवठा केला जात आहे.