Understand Why hand numbness occurs and how nerve compression affects:
हातात मुंग्या येणे, हात सुन्न पडणे किंवा बोटांमध्ये झिणझिण्या येणे या तक्रारी सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच वाढताना दिसत आहेत. वैद्यकीय भाषेत याला ‘पैरेस्थेशिया’ (Paresthesia) म्हणतात. तुम्हालाही वारंवार असा त्रास होत असेल, तर हा नसांवर (Nerves) येणाऱ्या दाबाचा परिणाम असू शकतो.
“हातात मुंग्या येतात… कधी बधिरपणा जाणवतो… कधी बोटं सुन्न पडतात.”
हा अनुभव अनेकांना येतो. काही वेळा तो काही सेकंदापुरताच असतो, क्वचित होतो किंवा काही वेळा वारंवार होतो. म्हणूनच प्रश्न पडतो.
‘मुंग्या येणं’ म्हणजे काय?
हातात मुंग्या येणं, झिणझिण्या किंवा बधिरपणा याला पैरेस्थेशिया (paresthesia) म्हणतात. ही संवेदना प्रामुख्याने मज्जातंतूंशी म्हणजे नर्व्ह (नस) शी संबंधित असते. आपल्या हातापर्यंत जाणाऱ्या नसा मानेतून सुरू होतात आणि खांदा, हात, मनगटातून जात बोटांपर्यंत पोहोचतात. या मार्गात कुठेही दाब किंवा ताण आला, तर मुंग्या येणं, झिणझिण्या किंवा बधिरपणा अशा संवेदना जाणवतात.
साधं कारण की, काहीतरी जास्त?
बऱ्याचदा हा त्रास तात्पुरता असतो किंवा खूप वेळ एका विशिष्ट स्थितीत हात ठेवल्यामुळे किंवा एकाच स्थितीत बसल्यामुळे होतो, जसं की हातावर खूप वेळ दाब देऊन बसणे, एका अंगावर हात डोक्याशी घेऊन झोपणे, हा त्रास हालचालीं सोबत किंवा त्या स्थितीतून बाहेर आल्यावर कमी होऊन जातो. पण मुंग्या वारंवार येत असतील, जास्त वेळ राहत असतील , वेदना, जळजळ किंवा कमजोरी जाणवत असेल तर काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.

नेमकं कुठे प्रॉब्लेम असू शकतो?
१. मानेत (नेक-सर्वाइकल स्पाइन) (Neck – Cervical spine)
हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मानेतूनच हाताकडे नसा जातात. मानेतील दोन मणक्यांच्या मध्ये गादी (इंटरवरटीब्रल डिस्क) असते. ही डिस्क कुशन सारखं काम करते. पण काही वेळा, चुकीचं पोश्चर, दीर्घकाळ स्क्रीनसमोर बसणं , वयामुळे होणारे बदल यामुळे ही डिस्क बाहेर सरकू शकते (disc bulge / herniation) आणि तिथून निघणाऱ्या नसांवर दाब देऊ शकते. यामुळे हातात मुंग्या येणे, बोटांमध्ये झिणझिण्या येणे, खांद्यापासून हातापर्यंत वेदना होणे आणि कधी कधी हातात अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणं दिसतात. म्हणजेच, प्रॉब्लेम मानेत असतो, पण लक्षणं हातात दिसतात.
२. खांदा आणि हात
खांद्याच्या भागात नसांवर वर ताण आल्यास, हात जड वाटतो, हालचालींमध्ये त्रास वाढतो आणि
मुंग्या आणि वेदना यांचं प्रमाण वाढत.
३. मनगट (कार्पल टनल सिंड्रोम) (Carpal Tunnel Syndrome)
सतत टायपिंग, मोबाईल वापरामुळे मनगटातून जाणाऱ्या नसांवर वर दाब येतो. याला कार्पल टनल सिंड्रोम म्हणतात. याची लक्षणं म्हणजे, अंगठा, तर्जनी, मधलं बोट यात मुंग्या येणं, रात्री हा त्रास जास्त वाटणं आणि हाताची पकड कमी होणं
४. कोपराजवळ होणारं नर्व कम्प्रेशन
- कोपरा जवळून अल्नार नर्व नावाची नस जाते, खूप वेळ कोपरावर दाब देऊन बसलं की लहान आणि अनामिका बोटात मुंग्या येतात किंवा ही बोटे सुन्न पडतात. “फक्त मुंग्या आहेत” म्हणून दुर्लक्ष करू नका
- सुरुवातीला हा त्रास साधा वाटतो. पण खालील लक्षणं दिसल्यास लक्ष द्या:
- • वारंवार मुंग्या येणं
- • हातात कमजोरी
- • वस्तू हातातून पडणं
- • मान हलवल्यावर लक्षणं वाढणं
दैनंदिन सवयींचा परिणाम
- आजच्या जीवनशैलीत:
- • मोबाईलचा जास्त वापर
- • लॅपटॉपसमोर बसणं
- • मान पुढे झुकवणं
- • ब्रेक न घेणं
यामुळे मानेवर ताण वाढतो आणि नर्व्ह कम्प्रेशनची शक्यता वाढते.
उपाय काय?
१. पोश्चर सुधारणा
• स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर ठेवा
• मान सरळ ठेवा
• खांदे रिलॅक्स ठेवा
२. नियमित ब्रेक
दर ३०–४५ मिनिटांनी उठून हलचाल करा.
३. मोबाईल वापर मर्यादित करा
मान खाली वाकवून दीर्घकाळ वापर टाळा.
४. झोपेची काळजी
योग्य उशी वापरा, हाताखाली दाब येऊ देऊ नका.
फिजिओथेरपीची भूमिका
फिजिओथेरपीमध्ये या समस्येकडे नर्व्ह कम्प्रेशन आणि हालचाल दोन्हीच्या दृष्टीने पाहिलं जातं.
फिजिओथेरेपिस्ट मानेची हालचाल आणि नर्व्ह टेन्शन तपासतात, पोश्चर आणि स्नायूंची कार्यक्षमता किंवा असमतोल तपासतात आणि नर्व्ह मोबिलिटी सुधारण्यासाठी वेगवेगळे व्यायाम सांगतात.
Traction (ट्रॅक्शन) म्हणजे काय?
काही केसेसमध्ये, विशेषतः डिस्कमुळे नर्व्ह कम्प्रेशन असल्यास, सर्वाइकल ट्रॅक्शन उपयोगी ठरू शकते.
यात: मानेवर सौम्य ओढ किंवा ताण (gentle pull) दिला जातो, मणक्यांमधील जागा थोडी वाढते आणि नर्व्ह वरचा दाब कमी होतो
यामुळे:
• मुंग्या कमी होऊ शकतात
• वेदना कमी होतात
• हालचाल सुधारते
हे नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केलं जातं.
शरीराने दिलेले संकेत ओळखा
हातात मुंग्या येणं ही नेहमीच साधी गोष्ट नसते. कधी कधी ती मानेतल्या बदलांचा पहिला संकेत असू शकते.
हातात मुंग्या येणं हे साधंही असू शकतं आणि नर्व्ह कम्प्रेशनचं लक्षणही असू शकतं. विशेषतः मानेतील डिस्क नर्व्हवर दाब देत असेल, तर लक्षणं हातात दिसू शकतात.
