Hantavirus symptoms and transmission guide in Marathi for public awareness: हंताव्हायरसचे नाव ऐकताच मनात धडकी भरणे स्वाभाविक असले, तरी हा विषाणू कोविडसारखा हवेतून वेगाने पसरणारा नाही. सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांच्या मते, ही भीतीची नव्हे तर स्वच्छतेची वेळ आहे. “हंता? आता हे काय नवीन? आणि तेही विषाणू!” असे ऐकताच मनात हलकीशी धडधड होणे स्वाभाविक आहे. कोविड-१९च्या स्मृती अजून ताज्याच आहेत; त्यामुळे ‘नवा श्वसनविषाणू’ हा शब्द कानावर पडला की, मनात काळजीची रेष उमटते. पण एक गोष्ट नक्की समजून घ्यायला हवी ती म्हणजे हंताव्हायरस हा गर्दीतून वाऱ्यासारखा पसरणारा विषाणू नाही. तो प्रामुख्याने उंदीरकुळातील प्राण्यांच्या मूत्र, विष्ठा आणि लाळ यांच्या सुकलेल्या, दूषित धुळीतून माणसात प्रवेश करतो. म्हणून हा विषय घबराटीचा नाही; तर स्वच्छता, उंदीर-नियंत्रण आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला यांचा आहे.
हंताव्हायरस अचानक बातम्यांच्या केंद्रस्थानी कसा ?
खरे म्हणजे, मे २०२६ मध्ये एमव्ही हॉन्डियस (MV Hondius) या डच-ध्वजांकित क्रूझ जहाजावरील अँडीज विषाणूच्या नव्या विभेदाशी (Andes strain) संबंधित समूह-संसर्गामुळे हंताव्हायरस पुन्हा जागतिक बातम्यांत झळकला. हे जहाज १ एप्रिल २०२६ रोजी उशुआया, अर्जेंटिना येथून निघाले. पहिला मृत्यू ११ एप्रिलला झाला; त्यांचे पार्थिव २४ एप्रिलला सेंट हेलेना बेटावर उतरवण्यात आले. त्याच दिवशी त्यांची पत्नीही जहाज सोडून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आणि जोहान्सबर्गमधील रुग्णालयात २६ एप्रिलला तिचा मृत्यू झाला.
तिसरा मृत्यू जहाजावरच
तिसरा मृत्यू २ मे रोजी जहाजावरच नोंदला गेला. १२ मे २०२६ पर्यंत युरोपियन रोग प्रतिबंध व नियंत्रण केंद्राच्या (European Centre for Disease Prevention and Control: ECDC) माहितीनुसार एकूण ११ प्रकरणे नोंदली गेली. त्यापैकी ९ प्रकरणांना दुजोरा मिळाला आणि २ संभाव्य बाधितांची प्रकरणे होती. तीन मृत्यूंपैकी दोन हंताव्हायरसमुळे निश्चितपणे झाल्याचे सिद्ध झाले असून तिसऱ्या मृत्यूचे कारण तपासाधीन होते. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनीही स्पष्ट केले की, मोठ्या उद्रेकाची सुरुवात होत आहे, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सर्वसामान्य लोकसंख्येसाठी धोका अत्यंत कमी मानला गेला.

हंताव्हायरसचे स्वरूप
हंताव्हायरस म्हणजे केवळ एकच विषाणू नाही, तर विषाणूंचा एक संपूर्ण समूह आहे. तो हंताव्हिरिडी (Hantaviridae) परिवारात आणि बुन्याव्हिरालेस गणात मोडतो; माणसात रोग निर्माण करणारे प्रमुख सदस्य ऑर्थोहंताव्हायरस गटातील आहेत. हा ग्लायकोप्रोटीन-आवरणयुक्त, बहुधा गोलाकार पण अनेकाकार कण असतो. त्याचा व्यास साधारण ८०–१६० नॅनोमीटर असतो. मानवी केसाची रुंदी साधारण ८०,००० नॅनोमीटर असते; यावरून या विषाणूच्या सूक्ष्मतेची कल्पना येते. हंताव्हायरस हा ऋण-अर्थी एकसूत्री आरएनएयुक्त (negative-sense single-stranded RNA) विषाणू असून त्याची जनुकसामग्री S म्हणजे लहान, M म्हणजे मध्यम आणि L म्हणजे मोठा अशा तीन तुकड्यांमध्ये विभागलेली असते. या विषाणूच्या पृष्ठभागावरील स्पाइक प्रथिनांची मांडणी अनेकदा जाळीसदृश, सुव्यवस्थित रचनेत दिसून येते.
हंताव्हायरसचा थोडक्यात इतिहास
या नावामागे कोरियन युद्धाचा इतिहास दडलेला आहे. कोरियन युद्धकाळात, विशेषतः १९५१ पासून, सैनिकांमध्ये मूत्रपिंडावर परिणाम करणारा रक्तस्रावी ताप दिसू लागला. १९७६ मध्ये प्रा. हो-वांग ली यांनी पट्टेरी शेतउंदरात त्याचे संशयित प्रतिजन शोधले; १९७८ मध्ये संबंधित विषाणू अलग करण्यात त्यांना यश मिळाले. पुढे कोरियातील हंतान नदीवरून त्याला हंतान विषाणू (Hantaan virus) असे नाव मिळाले. १९९३ मध्ये अमेरिकेच्या नैऋत्य भागात झालेल्या उद्रेकामुळे फुफ्फुसांवर झडप घालणाऱ्या हंताव्हायरस प्रकाराकडे जगाचे लक्ष वेधले गेले.
संसर्गाचा मार्ग : उंदरांच्या दूषित धुळीतून माणसापर्यंत
संसर्गाचा मुख्य मार्ग साधा, पण अप्रत्यक्ष आहे. उंदीर वावरलेल्या कोठारात, शेडमध्ये, अडगळीत, बंद गाडीत किंवा धान्यसाठ्यात झाडू मारताना कोरडी विष्ठा-मूत्र धुळीत मिसळते; हे सूक्ष्म वायुकण (aerosol) श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात. दूषित पृष्ठभागाला हात लावून नाक-तोंडाला स्पर्श करणे, उंदराचा चावा किंवा दूषित अन्न हे मार्गही कमी प्रमाणात संभवतात. बहुतेक हंताव्हायरस माणसामाणसांत पसरत नाहीत. अँडीज विषाणू हा असा एक महत्त्वाचा हंताव्हायरस विभेद आहे ज्यामध्ये मानव-ते-मानव प्रसार नोंदला गेला आहे; तोही सामान्यतः निकट आणि दीर्घ संपर्कातच. एमव्ही हॉन्डियसवरील प्रसाराचे अंशतः कारण याच मार्गाला दिले जाते, आणि हे या विषाणूचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन अधोरेखित करते.
हंताव्हायरसची लक्षणे : सुरुवात साधी, वळण गंभीर
लक्षणे बहुधा संपर्कानंतर १–८ आठवड्यांत दिसू शकतात. सुरुवात साध्या तापासारखी होते. ताप, थकवा, डोकेदुखी, कंबर-पाठ-मांड्यांची वेदना, थंडी, मळमळ, उलटी, पोटदुखी किंवा जुलाब. वर नोंदविलेल्या उद्रेकातील काही रुग्णांना सुरुवातीला ताप आणि पोटाच्या तक्रारी, म्हणजे मळमळ, उलटी किंवा जुलाब जाणवले. त्यानंतर काही दिवसांत फुफ्फुसांना सूज येऊन न्यूमोनिया झाला आणि श्वास घेणे कठीण होत गेले.
हंताव्हायरस फुफ्फुसीय लक्षणे
काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांत द्रव साठू लागतो, श्वास अधिकाधिक जड होतो आणि शरीर अचानक गंभीर अवस्थेत जाऊ शकते. या संपूर्ण स्थितीला हंताव्हायरस फुफ्फुसीय लक्षणे (Hantavirus Pulmonary Syndrome: HPS) म्हणतात. आशिया व युरोपातील काही प्रकारांत मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर आघात होतो; त्याला रक्तस्रावी ताप-मूत्रपिंड लक्षण (Hemorrhagic Fever with Renal Syndrome: HFRS) म्हणतात. मृत्यूदर प्रदेश, विषाणूचा प्रकार आणि उपचार किती लवकर मिळतात यावर अवलंबून बदलतो.
उपचार आणि नियंत्रण : प्रतिबंध हाच सर्वोत्तम बचाव
जागतिक आरोग्य संघटनेनुसार यावर घरगुती उपाय नाहीत. जगात कुठेही या विषाणूविरुद्ध सर्वमान्य, व्यापक वापरातील लस सध्या उपलब्ध नाही; शास्त्रज्ञ मात्र संशोधन करत आहेत. उपचार म्हणजे आधारात्मक उपचार (supportive care): ऑक्सिजन, द्रव-संतुलन, रक्तदाब नियंत्रण, मूत्रपिंड व फुफ्फुसांची देखरेख, गरज पडल्यास अतिदक्षता, श्वसनयंत्रणा (ventilation) किंवा अपोहन (dialysis). उंदरांचा संपर्क झाल्यानंतर तापाबरोबर श्वास लागणे सुरू झाले, तर विलंब करणे धोकादायक ठरू शकते.
प्रतिबंध हीच खरी ढाल
घर, गोडाऊन, धान्यसाठे, शेतातील घरे आणि गोठे उंदीरमुक्त ठेवणे, भेगा बुजवणे आणि अन्न हवाबंद ठेवणे आवश्यक आहे. प्रतिबंध हीच खरी ढाल आहे. उंदरांची विष्ठा दिसली तर कोरडा झाडू किंवा व्हॅक्यूम वापरू नये. आधी जागा हवेशीर करावी, हातमोजे घालावेत, निर्जंतुक द्रावणाने किंवा ब्लीचने भाग पूर्ण भिजवावा, किमान ५ मिनिटांनी कागदी टॉवेलने उचलावा आणि नंतर हात स्वच्छ धुवावेत. उंदरांचा मोठा संसर्ग असलेल्या जागेत योग्य श्वसनरक्षक (respirator), डोळ्यांचे संरक्षण आणि वैयक्तिक संरक्षण साधने (PPE) आवश्यक ठरू शकतात.
घाबरण्याचे कारण नाही
भारतात सामान्य माणसाने घाबरण्याचे कारण नाही. ICMR-NIV ने मे २०२६ मध्ये देशासाठी तातडीचा सार्वजनिक आरोग्यधोका नसल्याचे आणि समुदाय प्रसाराचा पुरावा नसल्याचे सांगितले. स्पेनमधील भारतीय दूतावासानुसार जहाजावरील दोन भारतीय नागरिक निरोगी आणि लक्षणरहित होते. भारताच्या वैज्ञानिक नोंदींनुसार १९६४ मध्ये दक्षिण भारतात आशियाई चिचुंद्रीच्या मार्फत (Asian house shrew) पसरलेला थोट्टापालयम विषाणू (Thottapalayam virus) आढळला होता; परंतु त्यातून मानवांत निश्चितपणे रोग होतो, असा ठोस पुरावा उपलब्ध नाही.
आपल्यासाठी संदेश : भीती नव्हे, स्वच्छतेची शिस्त राखा
भारतासाठी धडा स्पष्ट आहे: साठवणीच्या बंद जागा, बंदर-गोदामे, धान्यबाजार, शेतघर, गोठा आणि शहरी कचरा व्यवस्थापन केंद्रे येथे उंदीर-नियंत्रण ही केवळ स्वच्छतेची बाब नाही; ती आरोग्य-सुरक्षेची पहिली पायरी आहे. हंताव्हायरस “दुसरा कोविड” नाही; पण अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास निसर्ग किती कठोर इशारा देऊ शकतो, याचे हे एक ठळक उदाहरण आहे.
