Hanuman Ansh movie: Who is Neem Karoli Baba? चित्रपटाचा पडदा उघडतो आणि प्रेक्षागृहात शिट्ट्या किंवा जल्लोषाऐवजी एक आदरयुक्त, निशब्द शांतता पसरते… अलीकडे नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पडद्यावर बाबांची भूमिका साकारणारे अभिनेते शोभिनव सत्य दिसताच चित्रपटगृह एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात हरवून जाते. बाबांनी तलावाच्या पाण्यातून अचानक लाडू काढून मुलांच्या हाती टेकवणे असो, वा जंगलात वाट चुकलेल्या पांथस्थाने हनुमान चालिसा सुरू करताच संपूर्ण प्रेक्षागृहाने त्याच्या सुरात सूर मिसळणे असो…
हा चरित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. अवघ्या दोन कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ३०० कोटी रुपयांची कमाई केली असून, बॉलिवूडलाही त्याची दखल घ्यावी लागली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर नैनितालपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्रमाकडे जाणाऱ्या डोंगरातील नागमोडी रस्त्यांवरील रहदारी आणखी वाढली आहे.
नीम करोली बाबा कोण?
भारतातील जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आध्यात्मिक गुरूंपैकी एक म्हणजे नीम करोली बाबा. त्यांच्या काही नामवंत अमेरिकी शिष्यांमुळे त्यांचा प्रभाव जगभर पसरला. या शिष्यांमध्ये हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ रिचर्ड अल्पर्ट यांचा समावेश होता. पुढे ते राम दास या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचा ‘बी हिअर नाऊ’ (Be Here Now) हा आध्यात्मिक साधकांसाठी महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. याशिवाय, अमेरिकी रॉक गायक ते कीर्तन गायक असा प्रवास केलेले कृष्ण दास (मूळ नाव जेफ्री कागेल) आणि देवीरोगाच्या निर्मूलनातील योगदानामुळे जगभर प्रसिद्ध असलेले अमेरिकी साथरोगतज्ज्ञ डॉ. लॅरी ब्रिलियंट हेही बाबांच्या प्रमुख शिष्यांपैकी होते.
जॉब्ज आणि झुकरबर्ग
२०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅलिफोर्नियातील फेसबुकच्या मुख्यालयाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या आयुष्यातील एका ‘कठीण काळा’विषयी सांगितले होते. त्या काळात अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांना भारतातील कैंची धामला भेट देण्याचा सल्ला दिला होता. जॉब्स यांनी स्वतःही यापूर्वी या तीर्थक्षेत्राला भेट दिली होती.

विराट कोहलही भक्तगणांमध्ये…
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत २४.३४ लाख लोकांनी कैंची धामला भेट दिली. यापूर्वीच्या वर्षांमध्ये येथे दरवर्षी सुमारे आठ लाख भाविक येत असत. २०२२ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या प्रसिद्ध दाम्पत्याने आपल्या मुलीसह कैंची धाम आणि वृंदावन येथील बाबांच्या आश्रमांना भेट दिली होती.
सब बाबाजी की कृपा
कैंची धाममध्ये एकेकाळी खूप शांतता होती; विराट आणि अनुष्का यांच्या भेटीनंतर येथील भाविकांची गर्दी प्रचंड वाढल्याचे स्थानिक सांगतात. येथील स्थानिक रहिवासी धीरज तिवारी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, पूर्वी १५ जूनला होणारा आश्रमाचा स्थापना दिवसवजा उत्सव आता इथे दररोजच अनुभवायला मिळतो. त्यांचे आश्रमाशेजारीच नीम करोली बाबांच्या प्रसिद्ध चौकडी नक्षीच्या ‘बाबा कंबल’चे (घोंगड्या) दुकान आहे. बाबांच्या या विशिष्ट ‘कंबल मुद्रेची’ तुलना हनुमानाच्या रूपाशी केली जाते. काही अनुयायी त्यांना हनुमानाचा अंशही मानतात.
रेमंडच्या घोंगड्या
बाबांना केवळ रेमंडच्या घोंगड्या अर्पण केल्या जातात. तिवारी सांगतात की, त्यांनी ज्यावेळी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना रेमंडचा वितरक मिळणे कठीण झाले होते. परंतु, अचानक रेमंड कंपनीचा एक एजंट कैंचीमध्ये आला आणि त्यांचा प्रश्न सुटला. हा एक चमत्कारच होता. आपले संपूर्ण आयुष्य ही बाबाजींचीच कृपा असल्याचे मानून ते अत्यंत भक्तिभावाने सांगतात की, “सब बाबाजी की कृपा!”
नीम करोली बाबांचा गृहत्याग
नीम करोली बाबा (मूळ नाव: लक्ष्मण नारायण शर्मा) यांचा जन्म १९०० च्या सुमारास अकबरपूर (उत्तर प्रदेश) येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला. लहानपणीच विवाह झालेल्या बाबांनी वयाच्या १२ व्या वर्षी गृहत्याग करून राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशात दीर्घ भ्रमंती केली. त्यांनी उत्तर प्रदेशातील ‘नीब करोरी’ या गावात केलेल्या तपश्चर्येमुळे पुढे त्यांना ‘नीम करोली बाबा’ हे नाव मिळाले. १९५० च्या दशकात त्यांनी नैनितालच्या मनोरा टेकडीवर ‘हनुमान गढी’ हे पहिले मंदिर उभारले. त्यानंतरच्या दोन दशकांत त्यांनी कैंची धाम, वृंदावन, कानपूर, दिल्ली आणि शिमला यांसारख्या अनेक ठिकाणी मंदिरे व आश्रमांची स्थापना केली. त्यांची सर्व माहिती मुख्यत्वे भक्तांनी लिहिलेली चरित्रे, समकालीनांच्या आठवणी आणि चित्रपटांतून समोर येते. १५ जून १९६४ रोजी हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेल्या कैंची धामचे पुढे नीम करोली बाबा यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील प्रमुख आश्रमात रूपांतर झाले. आश्रमाच्या बाजूने क्षिप्रा नदी वाहते.
सांसारिक जबाबदाऱ्या
वयाच्या १२ व्या वर्षी बाबांनी गृहत्याग केला तरी काही वर्षांच्या भ्रमंतीनंतर त्यांच्या वडिलांनी (दुर्गा प्रसाद शर्मा यांनी) त्यांना शोधून काढले आणि मूळ गावी परत आणले होते. तेथे काही काळ त्यांनी एक सामान्य गृहस्थ म्हणून जीवन घालवले. याच काळात त्यांना दोन मुलगे (अनेग सिंह आणि धरम नारायण) आणि एक मुलगी झाली. मुलांचा जन्म झाल्यानंतर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांची एक पायरी पूर्ण झाल्यावर, त्यांनी वयाच्या सुमारे २४-२५ व्या वर्षी कायमचा गृहत्याग केला आणि ते पूर्णपणे साधू/ संन्यासी जीवन जगू लागले.

चित्रपटामागची प्रेरणा
‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या २१ वर्षीय सह-निर्मात्या अनुप्रिया नागर ब्रिटनमधील बाथ विद्यापीठात शिकत असताना स्टीव्ह जॉब्स आणि नीम करोली बाबांच्या भेटीच्या कथेकडे आकर्षित झाल्या. स्वित्झर्लंडमधील नोकरीचा विचार सोडून भारतात परतल्यावर, कौटुंबिक मैत्रीण रागिणी सोना यांच्यामार्फत त्या या चित्रपटाच्या टीमशी जोडल्या गेल्या. चित्रपटाची १२० पानांची पटकथा वाचून त्या अत्यंत प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी रागिणी सोना आणि नम्रता सिंह यांच्यासोबत निर्मितीची धुरा सांभाळली. “आध्यात्मिकता आपल्या प्रत्येकात असते, फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधायला हवा,” असा विश्वास नागर यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केला.
जन्मगाव अकबरपूर: श्रद्धेपेक्षा वास्तवाचा शोध
कैंची आश्रमापासून ४०० किमी अंतरावर असलेल्या अकबरपूर या बाबांच्या जन्मगावी २००१ मध्ये उभारलेले एक मंदिर आहे. मात्र, कैंची धामच्या तुलनेत येथे भाविकांची गर्दी दिसत नाही. स्थानिक लोक त्यांना ‘लक्ष्मण दासजी’ या नावानेच ओळखतात आणि कुटुंबाला सोडून प्रसिद्धी मिळालेले एक सामान्य गृहस्थ म्हणूनच त्यांच्याकडे पाहतात. गावात बाबांच्या मुलांच्या (अनेग सिंह व धरम नारायण) स्मरणार्थ ठेवलेल्या चरणपादुकांवर लोक आजही नतमस्तक होतात.
अकबरपूरला विकासाची अपेक्षा
सध्या अकबरपूरमध्ये बाबांच्या नाती आणि मंदिर ट्रस्ट यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहे. बाबांचे धाकटे पुत्र धरम नारायण शर्मा यांच्या सहा मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, त्यांच्या वडिलोपार्जित घरावर झालेल्या बेकायदेशीर कब्जावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाबांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सरकारने घोषित केलेल्या पर्यटन परिपथामुळे गावातील रिंग रोड, रस्त्यांची दुरुस्ती आणि स्मशानभूमीवर छप्पर मिळून गावाचा विकास होईल, अशी आशा अकबरपूरच्या गावकऱ्यांना आहे.
