Harappan Dancing Girl History and India Pakistan Partition Controversy detailed analysis. गेल्या काही दिवसांपासून हडप्पा संस्कृतीतील ‘डान्सिंग गर्ल’चे (कांस्य स्त्री शिल्पकृती) चित्र एनसीईआरटी (NCERT) पाठ्यपुस्तकातील छायांकनामुळे चर्चेत आले आहे. मात्र, या ५००० वर्षे प्राचीन मूर्तीचा इतिहास पाहिला, तर भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळीही तिच्या मालकीवरून आणि नैतिकतेवरून दोन्ही देशांमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता.
स्त्री शिल्पकृतीची नग्नता का खटकते?
NCERT च्या इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील डान्सिंग गर्लच्या शरीराच्या वरचा भाग चक्क छायांकित करून झाकण्यात आला. या प्रकारानंतर झालेल्या टीकेचा परिणाम म्हणून NCERT ने मूळ प्रतिमा, आहे त्याच स्वरुपात छापण्याचा निर्णय घेतला. परंतु, या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न भेडसावतो तो म्हणजे ५००० वर्षे प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या या कांस्य स्त्री शिल्पकृतीची नग्नता का खटकते?

खरंतर प्राचीन भारतीय संस्कृती ही खर्‍या अर्थाने बोल्ड होती, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ऐतिहासिक खुणा धुंडळताना स्त्री ही मध्ययुगीन स्त्री प्रमाणे जोखडात अडकलेली निश्चितच नव्हती. वेदांमधील स्त्री स्वातंत्र्याच्या व्याख्या स्वार्थापुरत्या वापरू नयेत. एकीकडे वेदांचा दाखला द्यायचा आणि दुसरीकडे वेदांनी स्वतंत्र स्त्रीची वठवलेली भूमिका नाकारायची, हे कितपत योग्य? याचाही विचार होणे गरजेचे आहे.

पुरातत्त्वीय वारश्याचेही विभाजन

भारत-पाकिस्तान फाळणी हे केवळ राजकीय किंवा भौगोलिक विभाजन नव्हते; यात इतिहास, स्मृती, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचेही विभाजन झाले. १९४७ साली ब्रिटिश भारताचे दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. त्यावेळी जमीन, प्रशासन, सैन्य, पैसा यांबरोबर संग्रहालयातील वस्तू आणि पुरातत्त्वीय संपत्ती यांचाही प्रश्न निर्माण झाला.

दक्षिण आशियाच्या सामायिक सांस्कृतिक वारसा

विशेषतः हडप्पा संस्कृतीशी संबंधित पुरावस्तूंबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी परस्परविरोधी दावे केले. पाकिस्तानचे म्हणणे असे होते की, मोहेनजोदारो, हडप्पा आणि हडप्पाकालीन अनेक प्रमुख स्थळे त्यांच्या भूभागात आहेत; त्यामुळे त्या संस्कृतीच्या वस्तूंवर पाकिस्तानचा नैसर्गिक अधिकार आहे. दुसरीकडे भारताचा युक्तिवाद असा होता की, हडप्पा संस्कृतीला आधुनिक राष्ट्राच्या सीमांमध्ये अडकवता येणार नाही; ती संपूर्ण दक्षिण आशियाच्या सामायिक सांस्कृतिक वारसा आहे.

या वादाच्या केंद्रस्थानी दोन प्रसिद्ध पुरावस्तू होत्या. एक म्हणजे मोहेनजोदारोची प्रसिद्ध कांस्य डान्सिंग गर्ल आणि प्रिस्ट किंग म्हणून ओळखली जाणारी शिल्पकृती. या दोन पुरावस्तूंवरून भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक मालकीचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला. पंजाब विद्यापीठातील इतिहासकार आशिष कुमार यांच्या Sahib’s Nautch Girl: Colonial Archaeology and the Identity Formation of a Bronze Girl Statue from Mohenjodaro या शोधनिबंधात या वादाचे महत्त्वपूर्ण तपशील मांडले आहेत (Kumar, 2019).

हडप्पा संस्कृती आणि फाळणीचा प्रश्न

हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती, ही दक्षिण आशियातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एक मानली जाते. मोहेनजोदारो, हडप्पा, चन्हुदारो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा अशा स्थळांमधून या संस्कृतीची नगररचना, व्यापार, धातुकाम, मातीची भांडी, मुद्रा, मूर्ती आणि दैनंदिन जीवनाचे पुरावे मिळतात. ग्रेगरी पोशेल आणि जोनाथन केनॉयर यांसारख्या पुराविदांनी हडप्पा संस्कृतीला विस्तृत प्रदेशात पसरलेली, विविध केंद्रे असलेली आणि दीर्घकाळ विकसित झालेली नागरी परंपरा मानले आहे (Possehl, 2002; Kenoyer, 2006).

फाळणीनंतरचा ऐतिहासिक पेच

फाळणीपूर्वी या सर्व स्थळांचा अभ्यास भारतीय पुरातत्त्व या व्यापक चौकटीत केला जात होता. परंतु, १९४७ नंतर मोहेनजोदारो, हडप्पा आणि चन्हुदारो यांसारखी प्रमुख स्थळे पाकिस्तानात गेली. भारताकडे सुरुवातीच्या काळात गुजरातमधील रंगपूर आणि पूर्व पंजाबमधील कोटला निहंग खान यांसारखी तुलनेने कमी प्रसिद्ध हडप्पाकालीन स्थळे उरली, असे आशिष कुमार नमूद करतात (Kumar, 2019). त्यामुळे पाकिस्तानकडे प्रमुख स्थळे आणि भारताकडे अनेक पुरावस्तू असा विचित्र ऐतिहासिक पेच तयार झाला.

मोहेनजोदारोच्या वस्तू दिल्लीत कशा आल्या?

या वादाची पार्श्वभूमी समजण्यासाठी मॉर्टिमर व्हीलर यांची भूमिका महत्त्वाची आहे. व्हीलर हे १९४४ ते १९४८ या काळात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक होते. त्यांच्या काळात मोहेनजोदारो येथील अनेक हडप्पाकालीन वस्तू प्रदर्शनासाठी लाहोर संग्रहालयातून दिल्लीला आणल्या गेल्या. फाळणी झाली तेव्हा मोहेनजोदारो येथील सुमारे १२,००० वस्तू दिल्लीत होत्या, असे कुमार यांच्या शोधनिबंधात म्हटले आहे (Kumar, 2019). फाळणीनंतर पाकिस्तानने या वस्तू परत मागितल्या.

हडप्पा ही पाकिस्तानी संस्कृती नव्हे

पाकिस्तानचा युक्तिवाद स्पष्ट होता, या वस्तू मोहेनजोदारो येथे सापडल्या आहेत आणि मोहेनजोदारो आता पाकिस्तानात आहे; त्यामुळे वस्तू पाकिस्तानच्या मालकीच्या असाव्यात. भारताने मात्र हा दावा नाकारला. भारताचे म्हणणे असे होते की, या वस्तू जरी आजच्या पाकिस्तानातील स्थळांवरून मिळाल्या असल्या, तरी हडप्पा संस्कृती ही आधुनिक पाकिस्तानचीच नव्हे, तर भारतीय उपखंडाची सामायिक संस्कृती आहे.

सांस्कृतिक वारशावरील दोन दावे

या वादात दोन वेगवेगळ्या संकल्पना भिडताना दिसतात. पहिली म्हणजे भौगोलिक मालकी. या मतानुसार एखादी पुरावस्तू ज्या भूभागातून सापडते, त्या आधुनिक राष्ट्राचा त्या वस्तूवर सर्वाधिक दावा असतो. पाकिस्तानची भूमिका मुख्यतः याच तत्त्वावर आधारित होती. मोहेनजोदारो आणि हडप्पा पाकिस्तानात असल्यामुळे त्या संस्कृतीच्या प्रातिनिधिक वस्तूंवर पाकिस्तानचा अधिकार असावा, असा त्यांचा दावा होता.

सांस्कृतिक सातत्य

दुसरी संकल्पना म्हणजे ‘सभ्यतागत किंवा सांस्कृतिक सातत्य’. भारताचा दावा यावर आधारित होता. भारताने असा मुद्दा मांडला की हडप्पा संस्कृतीचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व संपूर्ण दक्षिण आशियाशी संबंधित आहे. आधुनिक राजकीय सीमा १९४७ साली आखल्या गेल्या; परंतु हडप्पा संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. त्यामुळे तिचा वारसा एका राष्ट्राच्या सीमा आखून निश्चित करणे योग्य नाही. या दोन दाव्यांमुळेच परस्परविरोधी दावे तयार झाले. पाकिस्तान भूभागाच्या आधारे मालकी सांगत होता, तर भारत सांस्कृतिक सातत्य आणि सामायिक वारशाच्या आधारे दावा मांडत होता.

५०:५० विभागणी आणि व्हीलरची मध्यस्थी

या वादावर शेवटी मॉर्टिमर व्हीलर यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला. मोहेनजोदारो आणि चन्हुदारो येथून सापडलेल्या हडप्पाकालीन पुरावस्तूंची भारत आणि पाकिस्तान यांच्यात अर्धी अर्धी विभागणी करण्याचे ठरले. ही विभागणी केवळ वस्तूंची नव्हती; ती फाळणीनंतरच्या नव्या राष्ट्रांनी भूतकाळावर हक्क सांगण्याच्या प्रक्रियेचा भाग होती.

पण ही विभागणी करताना सर्वात मोठा प्रश्न होता, डान्सिंग गर्ल आणि प्रिस्ट किंग या दोन महत्त्वाच्या शिल्पकृतींचे काय करायचे? पाकिस्तानला दोन्ही शिल्पकृती हव्या होत्या. त्यामुळे भारतानेही दोन्ही शिल्पकृती देण्यास नकार दिला. नंतर, भारताने या दोनपैकी एक शिल्पकृती पाकिस्तानला देण्याची तयारी दर्शवली.

डान्सिंग गर्ल आणि प्रिस्ट किंग यातील निवड

पाकिस्तानला डान्सिंग गर्ल आणि प्रिस्ट किंग या दोन शिल्पकृतींपैकी एकाची निवड करायची होती. अखेरीस पाकिस्तानने प्रिस्ट किंगची निवड केली. ही निवड केवळ कलात्मक किंवा ऐतिहासिक निकषांवर झाली नाही. डान्सिंग गर्ल ही कांस्य मूर्ती एका नग्न किशोरवयीन मुलीची प्रतिमा म्हणून पाहिली जात होती. पाकिस्तानातील धार्मिक गटांकडून विरोध होऊ शकतो, या शक्यतेमुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी प्रिस्ट किंगला प्राधान्य दिले, असे कुमार लिहितात (Kumar, 2019).

हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इथे पुरावस्तूचा अर्थ तिच्या पुरातत्त्वीय संदर्भातून न ठरता, आधुनिक समाजाच्या नैतिक, धार्मिक आणि राजकीय कल्पनांमधूनही ठरला. आधुनिक राष्ट्रराज्यांच्या चौकटीत तिच्या नग्नतेला नैतिक प्रश्न मानले गेले.

डान्सिंग गर्लची मागणी

भारताकडे राहिलेली डान्सिंग गर्ल आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातील सर्वाधिक प्रसिद्ध वस्तूंमध्ये गणली जाते. मात्र पाकिस्तानमधून तिच्या पुनर्प्राप्तीची मागणी वेळोवेळी होत राहिली. २०१६ साली बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी लाहोर उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. या याचिकेत पाकिस्तान सरकारला भारताकडून डान्सिंग गर्ल कांस्य शिल्पकृती परत आणण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती (Kumar, 2019).

जगप्रसिद्ध मोनालिसाशी तुलना

जाफरी यांनी या शिल्पकृतीचे महत्त्व अधोरेखित करताना तिची तुलना लिओनार्डो द विंची यांच्या मोनालिसाशी केली. युरोपसाठी मोनालिसाचे जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, तेच महत्त्व पाकिस्तानसाठी डान्सिंग गर्लचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.

नग्नतेच्या चौकटीत

डान्सिंग गर्लचा वाद हा फक्त एका प्राचीन कांस्य शिल्पकृतीचा वाद नाही; तर तो आपल्या समाजाच्या इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आरसा आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका कलाकृतीला आजही तिच्या नग्नतेच्या चौकटीत अडकवले जाते, ही बाब विचार करायला लावणारी आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानने नैतिक आक्षेपांच्या शक्यतेमुळे तिला नाकारले, आणि आजही तिच्या प्रतिमेवर छायांकन करून झाकण्याची वेळ भारतातच येते, यावरून प्राचीन वारशापेक्षा आधुनिक संकोच अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसते.