Harappan Civilization फाळणीनंतर सिंधू संस्कृतीची साक्ष देणारी बरीच ठिकाणे पाकिस्तानात गेलेली असली तरी काही ठिकाणे भारतातही आढळली आहेत. १९५५ ते १९६० दरम्यान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये उत्खननाची एक मोहीमच हाती घेतली होती. एस.आर. राव यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते. या मोहिमेतूनच सिंधू संस्कृतीची साक्ष देणाऱ्या काही ठिकाणांचा शोध लागला. यात लोथल येथील गोदीचाही समावेश होता. अहमदाबादपासून ८५ किमीवर असलेल्या भाल या ठिकाणी ही गोदी आहे. सिंधू संस्कृती दरम्यान, लोथल हे व्यापारी केंद्र होते. या ठिकाणाहूनच पश्चिम आशिया आणि आफ्रिकेच्या देशांपर्यंत व्यापार केला जात होता. १९५० च्या दशकात गुजरातच्या भाल प्रदेशात असलेल्या लोथल येथे हडप्पाकालीन स्थळाचा शोध लागल्यापासून सिंधू संस्कृतीच्या काळात या ठिकाणी डॉकयार्ड (गोदी) अस्तित्वात होते की नाही यावर पुरातत्त्वशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु नव्या संशोधनाच्या मदतीने हे मत बदलू शकते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-गांधीनगरने (IITGn) केलेल्या संशोधनात गोदीच्या अस्तित्त्वाला पाठबळ देणारे नवे पुरावे सापडले आहेत. या संशोधनात अहमदाबादला लोथल, नल सरोवर पाणथळ जागा आणि लिटल रण आणि धोलावीरा यांना जोडणारा प्रवासी मार्गही होता. उपग्रह प्रतिमांच्या मदतीने साबरमती नदीच्या जुना प्रवाहाविषयी समजून घेण्यास मदत होते. लोथलचे प्राचीन समृद्ध मार्गावर असलेले स्थान त्याचे महत्त्व विशद करते. हे संशोधन डॉकयार्ड सिद्धांताला पाठबळ देणारे आहे. तसेच नदीच्या प्राचीन प्रवाहाविषयी माहिती देते त्यामुळे लोथल गोदीचा नदी आणि समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापाराशी असलेला संबंध समजण्यास मदत होते असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा? मल्टी-सेन्सर डेटा, क्लाउड-कॉम्प्युटिंग आणि मल्टी-प्लॅटफॉर्म्स इत्यादींचा समावेश असलेले हे संशोधन ऑगस्टमध्ये जर्नल ऑफ आर्किऑलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- गांधीनगरच्या एकता गुप्ता, व्ही एन प्रभाकर आणि विक्रांत जैन या अभ्यासकांकडे या संशोधनाचे श्रेय जाते. या संशोधनात काढण्यात आलेल्या निष्कर्षांचा आणि तंत्रांचा घेतलेला हा आढावा. अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत? या अभ्यासात संशोधकांनी एक महत्त्वाचे गृहीतक मांडले होते. त्यांनी या संशोधनात लोथलपासून ते कच्छचे रण यांच्यातील आंतरदेशीय नेटवर्क समजून घेण्याचा प्रयत्न केला. या संशोधनात गुप्ता यांनी एका जलवाहिनीचा शोध लावला. अभ्यासाअंती ही जलवाहिनी पूर्वीची साबरमती नदी असल्याचे लक्षात आले. ती लोथलमार्गे वाहत होती. नंतर ती सध्याच्या मार्गाकडे वळली. आता ती पूर्वीच्या स्थानापासून २० किमी पलीकडे वाहत आहे. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना प्रभाकर म्हणाले, “तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही साबरमती नदीचे हळुहळू स्थलांतर कसे झाले आणि ती सध्याच्या स्थानापर्यंत कशी पोहोचली हे शोधू शकलो. यात एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे लोथल हे हडप्पा काळात बंदर होते आणि साबरमती ही तिथूनच वाहत होती. तर नल सरोवर पूर्ण प्रवाहित होते आणि त्यातूनच नदी बाहेर आली. यामुळे सहजच कोणीही थेट नल सरोवर आणि येथून छोटे रण आणि नंतर धोलाविरा येथे जाऊ शकत होते. एका व्यक्तीने बोटीने प्रवास केला तर तो दोन दिवसात तिथे पोहोचू शकत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे प्रवास केला असावा, माल हस्तांतरित केला असावा कारण, लोथल येथून आम्हाला परदेशी व्यापाराचे भरपूर पुरावे मिळाले आहेत.” अभ्यासात असे दिसून आले आहे की, व्यापारी खंबातच्या आखातातून गुजरातमध्ये आले, बहुधा रतनपुरा येथे व्यापारी माल आणण्यासाठी गेले आणि तो मेसोपोटेमिया (आधुनिक इराक) येथे नेण्यात आला. अधिक वाचा: विश्लेषण: राजस्थानात सापडली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत; पुरावे काय सांगतात? अभ्यास कसा केला गेला? अभ्यासकांनी या संशोधनाविषयी सुरुवातीचे नकाशे, उपग्रह प्रतिमा आणि डिजिटल एलिव्हेशन मॉडेल - 3D मॉडेल्सचा डेटा वापरला. संशोधकांनी विशेषत: १९ व्या शतकातील दोन टोपोग्राफिक नकाशांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी पॅलिओचॅनेल — जुन्या किंवा प्राचीन नदी वाहिन्या — बारमाही प्रवाहांपासून वेगळे करण्यासाठी आणि गेल्या १५० वर्षांत झालेले भूस्तरीय बदल समजून घेण्यासाठी नकाशांचा वापर केला. प्रभाकर यांनी स्पष्ट केले की, उपग्रह प्रतिमांचा अभ्यास केल्याने त्यांना आणि त्यांच्या टीमला जमिनीच्या सर्वेक्षणासाठी खर्च होणारा वेळ वाचवण्यास मदत झाली. ते म्हणाले की तंत्रज्ञानामुळे त्यांना "जगात कुठेही डोकावण्याची, मानवजातीसाठी दुर्गम असलेल्या दुर्गम भागात प्रवेश करण्याची आणि नंतर जमिनीवर पडताळणी करता येणारी संभाव्य ठिकाणे ओळखण्यात मदत झाली" असे त्यांनी सांगितले.