न्यूझीलंडचा पराभव करून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयात मोलाची भूमिका बजावणारा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून पंड्याच्या विरोधात पुण्यापाठोपाठ आता नालासोपारा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वकील वाजिद खान आणि नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्ते कुमार काकडे अशी तक्रारदारांची नावे आहेत. या पार्श्वभूमीवर भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना संपल्यानंतर काय घडले? हार्दिक पांड्याने नेमके काय केले? राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास कोणती शिक्षा होते? त्याविषयीचा हा आढावा…
हार्दिक पांड्याने काय केले?
गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय मैदानात आले होते. त्यावेळी हार्दिक पंड्या आणि त्याची प्रेयसी माहिका शर्माही मैदानात होती. भारताच्या विजयाचा जल्लोष करताना पंड्याच्या खांद्यावर तिरंगा होता. पाठीला तिरंगा बांधून, तो मैत्रिणीसोबत नृत्य करत होता. त्याच्या या कृत्यावर पुण्यातील वकील वाजिद खान यांनी तीव्र आक्षेप घेतला. पंड्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करीत त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.
तक्रारदारांचा नेमका आरोप काय?
नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्ते कुमार काकडे यांनीही त्यांच्या तक्रारीत हार्दिक आणि माहिका यांनी राष्ट्रीय ध्वजाचा मान राखला नसल्याचा आरोप केला. जल्लोषाच्या वेळी राष्ट्रध्वज अंगावर असताना हार्दिक मैदानावरील पोडियमवर (व्यासपीठावर) झोपल्याने ध्वजाचा अनादर झाला असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले. या कृत्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या असल्याने ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अपमान प्रतिबंधक अधिनियम, १९७१’ च्या कलम २ अन्वये हार्दिक व त्याच्या प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करून, कायदेशीर कारवाईची मागणी काकडे यांनी केली. या तक्रारींमुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा : भारतीय वंशाच्या दोन भावंडांना अमेरिकेत ८३५ वर्षांची शिक्षा; कोण आहेत सावनी बंधू? त्यांचा नेमका गुन्हा काय?
राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत कायदा काय सांगतो?
भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांपैकी एक असलेला ‘तिरंगा’ हा प्रत्येक भारतीयाचा गौरव आहे. राष्ट्रध्वज हा भारतीयांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक असून, याच्या सन्मानासाठी आपल्या जवानांसह अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकानेदेखील राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. त्यासाठी संविधानात नियमावली अर्थात ध्वज संहिताही सांगण्यात आली आहे. भारतीय ध्वज संहिता २००२ नुसार, प्रत्येक भारतीय नागरिक आणि संस्थेला राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार आहे. या नियमांनुसार शाळा-महाविद्यालये, तसेच खासगी नागरिक आपल्या घरावरही तिरंगा फडकावू शकतात. मात्र, ध्वजाचा वापर करताना काही नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
तिरंगा फडकवताना पाळावयाचे नियम
राष्ट्रध्वज कसा असावा याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रध्वजात वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा, तर खाली हिरवा अशा तीन रंगांच्या एकाच आकाराच्या पट्ट्या असाव्यात. तसेच पांढऱ्या रंगामध्ये मध्यभागी गडद निळ्या रंगाचे २४ आऱ्यांचे अशोक चक्र असावे. या राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असून, त्याचे प्रमाण ३ : २, असे असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज लोकरी, सुती, खादी कपड्यांमध्ये बनवले जाऊ शकतात. राष्ट्रध्वज नेहमी उंच ठिकाणी सर्वांना दिसेल अशा जागी फडकवायला हवा. सार्वजनिक इमारतींवर राष्ट्रध्वज सूर्योदयानंतर फडकवून, सूर्यास्तापूर्वी तो खाली उतरवला पाहिजे. सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज फडकताना दिसता कामा नये. राष्ट्रध्वज उत्साह आणि स्फूर्तीने हळूहळू खांबावर चढवण्यात यावा आणि त्याच गतीने तो खाली उतरवायला हवा.
तिरंग्याबाबत काय करू नये?
राष्ट्रध्वज केशरी रंग खालच्या बाजूला येईल अशा उलट्या पद्धतीने फडकवणे गुन्हा मानला जातो. तसेच राष्ट्रध्वज फाटलेल्या आणि खराब झालेल्या अवस्थेत फडकवणे हा गुन्हा ठरतो. राष्ट्रध्वज नेहमी स्वच्छ धुतलेला आणि व्यवस्थित इस्त्री केलेला असावा. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा खांब वाकलेल्या अवस्थेत असता कामा नये. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही जाहिरातीत अंगावर घालण्यासाठी, नेसण्यासाठी किंवा त्याचा चादरीसारखा वापर करता येत नाही. राष्ट्रध्वजाला फाडणे, खराब करणे किंवा जाळले जाता कामा नये. फाटलेला किंवा जुना झालेला राष्ट्रध्वज एकांतात योग्य पद्धतीने जाळून किंवा अन्य प्रकारे नष्ट केला जायला हवा. राष्ट्रध्वजाला आकर्षक बनवण्यासाठी त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर केली जाता कामा नये.
हेही वाचा : विश्लेषण : मोदींच्या दौरे धडाक्याने दक्षिणेत भाजपचा जागांचा ‘दुष्काळ’ संपेल का?
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास कोणती शिक्षा?
राष्ट्रध्वजाचा कोणताही अनादर हा ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१’ अंतर्गत गुन्हा मानला जातो. या कायद्याच्या तरतुदीनुसार, सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय ध्वज जाळणे, फाडणे, विकृत करणे, अपवित्र करणे, नष्ट करणे, तुडवणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्याचा अवमान करणे हा गुन्हा मानला जातो. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे सिद्ध झाल्यास आरोपीला किमान तीन वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंड भरावा लागू शकतो. अशा प्रकरणांचा विचार करताना न्यायालय सहसा काही बाबी तपासते. संबंधित व्यक्तीचा राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्याचा हेतू होता का? ही घटना सार्वजनिक ठिकाणी किंवा जनतेसमोर घडली का? त्याच्या कृतीमुळे राष्ट्रध्वजाचा गंभीर अवमान झाला का? तसेच, ही कृती जाणूनबुजून केली होती की चुकून घडली, याचाही विचार न्यायालय करते. कारण- गुन्हा सिद्ध करण्यासाठी हेतू हा महत्त्वाचा घटक मानला जातो.
हार्दिक पंड्यावर गुन्हा दाखल होणार?
हार्दिक पंड्या व त्याच्या प्रेयसीने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. वाजिद खान यांनी याबाबत सुरुवातीला पुणे पोलिसांकडे धाव घेतली तेव्हा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. माध्यमांशी संवाद साधताना वाजिद म्हणाले की, हा प्रसंग अहमदाबादमध्ये घडला असल्याने तो आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असे पोलिसांनी मला सांगितले होते; परंतु तिरंगा हे संपूर्ण राष्ट्राचे प्रतीक असल्याने त्याच्या अवमानाची तक्रार कुठेही दाखल होऊ शकते याचा दाखला मी त्यांना दिला. अखेर शिवाजीनगर पोलिसांनी माझी तक्रार स्वीकारली असून, त्याची प्रत मला दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होते ते पाहूया, असे वाजिद यांनी स्पष्ट केले आहे.
