भारतीय महिला क्रिकेट संघाला पहिलेवहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीतने आपला निर्णय जाहीर करण्याच्या आदल्या दिवशीच गुवाहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) आढावा बैठक झाली. त्यात हरमनप्रीतने कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु निवड समितीने नेतृत्वबदलास पसंती दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कर्णधारपद सोडणे हा हरमनप्रीतचा वैयक्तिक निर्णय होता की ‘बीसीसीआय’ आणि निवड समितीच्या भूमिकेनंतर तिला हा मार्ग स्वीकारावा लागला, यावरून चर्चा रंगली आहे.

भावनिक संदेशासह पायउतार

मंगळवारी (६ ऑक्टोबर) समाजमाध्यमांवर भावनिक संदेश लिहित हरमनप्रीतने महिला संघाचे तिन्ही प्रकारांतील कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. “हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. या निर्णयामागे अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर मनात राहतील असे अनेक क्षण आहेत. मात्र, आता मी पुन्हा केवळ खेळाच्या प्रेमासाठी खेळण्यास सज्ज आहे,” असे ३७ वर्षीय हरमनप्रीतने नमूद केले. तिने पाच कसोटी, ५१ एकदिवसीय आणि १५५ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. गेल्याच महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने भारताला सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवून दिले. राष्ट्रीय संघाची कर्णधार म्हणून तिचा हा अखेरचा सामना ठरला.

‘बीसीसीआय’च्या बैठकीत काय घडले?

आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय महिला संघ मायदेशी परतल्याच्या काही दिवसांतच हरमनप्रीत, भारतीय संघाची उपकर्णधार (आताची कर्णधार) स्मृती मनधाना, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत संघाच्या अलीकडील कामगिरीचा आढावा घेण्यात आला, तसेच आगामी वाटचालीचा आराखडा आणि भविष्यातील दिशा यावरही चर्चा करण्यात आली. याच चर्चेत निवड समितीला नेतृत्वात बदल हवा असल्याचे हरमनप्रीतला सांगण्यात आले. पुढील विश्वचषक चक्रासाठी नव्या नेतृत्वाखाली संघाची बांधणी करण्याची गरज असल्याची भूमिका मांडण्यात आली. हरमनप्रीतने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपल्या फलंदाजीच्या लयीचा विचार करून या प्रकारात कर्णधारपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यातून युवा खेळाडूंना संधी मिळू शकते, असेही तिचे मत होते. मात्र, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये नेतृत्व सुरू ठेवण्याची तिची इच्छा होती. ‘बीसीसीआय’ आणि निवड समितीने मात्र एकसंध बदल करण्याची भूमिका कायम ठेवली.

विश्वचषक विजयानंतरही नेतृत्वबदल का?

भारतीय महिला संघाने गेल्याच वर्षी आपला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि हरमनप्रीत भारताला विश्वचषक जिंकून देणारी पहिली महिला कर्णधार ठरली. याशिवाय तिच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच आशिया चषक पटकावला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. मात्र, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यावर्षी जूनमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला साखळी फेरीतच बाहेर पडावे लागले. गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही भारतीय संघ बाद फेरी गाठू शकला नव्हता. त्यातच फलंदाज म्हणूनही हरमनप्रीतला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत होते. गेल्या १५ ट्वेन्टी-२० डावांत तिला केवळ दोनदा अर्धशतकी मजल मारता आली. या पार्श्वभूमीवर निवड समितीने पुढील टप्प्यासाठी नेतृत्वबदलाचा विचार केल्याचे वृत्त आहे.

पुरुष आणि महिला संघांसाठी वेगवेगळे नियम?

भारतीय पुरुष संघात सध्या विभाजित नेतृत्व (स्प्लिट कॅप्टन्सी) आहे. त्यानुसार, कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करतो, तर ट्वेन्टी-२० संघाची धुरा श्रेयस अय्यर सांभाळत आहे. महिला संघासाठीही अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा पर्याय ‘बीसीसीआय’कडे होता. हरमनप्रीत ट्वेन्टी-२० कर्णधारपद सोडण्यास तयार होती. त्यामुळे या प्रारूपात स्मृती मनधानाकडे नेतृत्व सोपवून, कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हरमनप्रीतकडेच कायम राखण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ला घेता आला असता. मात्र, त्यांनी पूर्ण नेतृत्वबदलाला पसंती देत तिन्ही प्रारूपांतील (मर्यादित षटकांचे जाहीर, कसोटीची अधिकृत घोषणा शिल्लक) संघाचे नेतृत्व मनधानाकडे सोपवले.

पुढे काय?

कर्णधारपद सोडले असले तरी हरमनप्रीत भारतीय संघातून बाहेर झालेली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या दोन्ही संघांमध्ये तिचा समावेश आहे. कर्णधारपदाच्या दडपणातून मुक्त झालेल्या हरमनप्रीतला आता फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात महिला चॅम्पियन्स करंडकासारखी मोठी जागतिक स्पर्धा होणार असून, त्यानंतर २०२८ आणि २०२९ मधील आणखी मोठ्या आव्हानांना भारतीय संघाला सामोरे जावे लागणार आहे. “नेतृत्वाची जबाबदारी संपत आहे, पण भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही संपणार नाही. आता आयुष्याच्या नव्या अध्यायाकडे वळण्याची वेळ आली आहे,” असे हरमनप्रीत कर्णधारपद सोडताना म्हणाली. भारताची सर्वांत यशस्वी महिला कर्णधार, लढाऊ वृत्तीसाठी ओळखली जाणारी आणि मोठ्या सामन्यांची खेळाडू अशी ख्याती असलेली हरमनप्रीत आता केवळ खेळाडूच्या भूमिकेत कशी कामगिरी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

anvay.sawant@expressindia.com