नजरेने मृत्यू घडवणारा महाकाय सर्प, राखेतून पुन्हा जन्म घेणारा पक्षी, मातीतून उपटताना किंचाळणारी मानवरूपी वनस्पती आणि तीन डोक्यांचा रक्षक कुत्रा…२५ वर्षांपूर्वी हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (Harry Potter and the Philosopher’s Stone) प्रदर्शित झाला, तेव्हा या विलक्षण जादुई विश्वाने प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत नेले. २००१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा मोठ्या पडद्यावर येत असून त्याबरोबरच यापूर्वी न दाखवलेली १२ मिनिटांची पडद्यामागील दृश्येही प्रदर्शित केली जाणार आहेत.
मात्र हॅरी पॉटरच्या विश्वातील सर्व प्राणी, वस्तू आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक नव्हती. फिलॉसॉफर्स स्टोनच्या मागे सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी धडपडणाऱ्या किमयागारांचा इतिहास होता. फ्लफीचे मूळ ग्रीक पुराणातील पाताळाच्या रक्षकात आढळते; तर व्हॉल्डेमॉर्टच्या सर्पिणीचे नगिनी हे नाव संस्कृतमधील नागिण या शब्दाशी जोडलेले आहे.
या जादुई विश्वातील काही प्रतिमा प्राचीन ग्रीक-रोमन साहित्यातून आल्या, तर काहींची पाळेमुळे इजिप्त, पर्शिया, मध्ययुगीन युरोप आणि भारतीय नागपरंपरेपर्यंत पोहोचतात. जे. के. रोलिंग यांनी या मिथकांचा जसाच्या तसा वापर केला नाही; तर शाळा, मैत्री, मृत्यू, भेदभाव आणि सत्तासंघर्षाच्या आधुनिक कथेत त्यांना नवा अर्थ दिला. म्हणूनच हॅरी पॉटरच्या पंचविशीच्या निमित्ताने या कथेतील प्रसिद्ध पात्रांमागे दडलेल्या प्राचीन मिथकांचा घेतलेला हा आढावा.
हॅरी पॉटरमधील पात्रांची प्राचीन पाळेमुळे (फोटो)

Philosopher’s Stone: सोने आणि अमरत्वाचा शोध
पहिल्या कादंबरीचा आणि चित्रपटाचा केंद्रबिंदू असलेला फिलॉसॉफर्स स्टोन अर्थात परिस ही केवळ काल्पनिक वस्तू नव्हती. शतकानुशतके किमयागारांनी सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करू शकणाऱ्या एका विशिष्ट पदार्थाचा शोध घेतला. पाश्चिमात्य किमयाशास्त्रात या रहस्यमय पदार्थाला फिलॉसॉफर्स स्टोन म्हटले गेले. किमया अर्थात ‘अल्केमी’ची परंपरा केवळ मध्ययुगीन युरोपात जन्माला आलेली नव्हती. तर तिची जडणघडण ग्रीक-इजिप्शियन ज्ञानपरंपरा, इस्लामी जगातील रसायनविषयक प्रयोग आणि नंतरच्या लॅटिन युरोपातील अभ्यासातून झाली. धातू शुद्ध करणे, त्यांचे रूपांतर करणे आणि पदार्थातील मूलतत्त्व शोधणे हे या प्रयोगांचे उद्दिष्ट होते.
सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करणाऱ्या दगडाबरोबरच शरीराला दीर्घायुष्य किंवा अमरत्व देणाऱ्या (Elixir of Life) इलिक्सिर ऑफ लाइफची कल्पनाही किमयेशी जोडली गेली. हॅरी पॉटरच्या कथेत या दोन्ही कल्पना एकत्र येतात. निकोलस फ्लॅमेलने तयार केलेल्या दगडापासून अमृत तयार केले जाते आणि त्याचे सेवन केल्यामुळे फ्लॅमेल व त्यांची पत्नी अनेक शतके जिवंत राहतात.
वास्तविक किमयागारांना असा दगड सापडल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. असे असले तरी त्यांच्या प्रयोगांतून रसायनशास्त्र, धातुविज्ञान, औषधनिर्मिती आणि प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही प्रक्रिया विकसित झाल्या. त्यामुळे फिलॉसॉफर्स स्टोन हा केवळ संपत्तीच्या लोभाचे प्रतीक नव्हता; तर तो पदार्थाचे अंतिम रहस्य जाणून घेण्याच्या आणि मृत्यूवर विजय मिळवण्याच्या मानवी आकांक्षेचेही प्रतीक होता.
निकोलस फ्लेमेल खरोखर अस्तित्वात होता?
हॅरी पॉटरच्या पहिल्या कथेत निकोलस फ्लॅमेल हा फिलॉसॉफर्स स्टोन तयार करणारा आणि अनेक शतके जिवंत असलेला महान किमयागार आहे. हे नाव मात्र पूर्णपणे काल्पनिक नाही. निकोलस फ्लॅमेल नावाची व्यक्ती चौदाव्या आणि पंधराव्या शतकातील पॅरिसमध्ये प्रत्यक्षात राहत होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, फ्लॅमेल हे सार्वजनिक लेखनिक होते. करार, अर्ज, पत्रे आणि अन्य अधिकृत कागदपत्रे लिहून देण्याचे काम ते करत असत. त्यांची पत्नी पेरेनेल आणि त्यांनी धार्मिक व सार्वजनिक कामांसाठी देणग्याही दिल्या होत्या.
ऐतिहासिक व्यक्ती व दंतकथांचे अफलातून मिश्रण
फ्लॅमेल यांचा १४१८ साली मृत्यू झाला. मात्र त्यांच्या हयातीत ते महान किमयागार होते किंवा त्यांनी फिलॉसॉफर्स स्टोनचा शोध घेतला, याचा ठोस ऐतिहासिक पुरावा नाही. फ्लॅमेल यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन शतकांनी त्यांच्या नावाने काही किमयाविषयक ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांनी सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर केले आणि अमरत्वाचे रहस्य मिळवले, ही आख्यायिका मुख्यतः सतराव्या शतकात लोकप्रिय झाली. म्हणजेच हॅरी पॉटरमधील फ्लॅमेल हे प्रत्यक्ष ऐतिहासिक व्यक्ती आणि त्यांच्याभोवती मृत्यूनंतर निर्माण झालेल्या दंतकथा यांचे मिश्रण आहे. रोलिंग यांनी या ऐतिहासिक व्यक्तीला थेट कथेत घेतले नाही; तर त्यांच्या मरणोत्तर मिथकाला जादुई विश्वात सत्य ठरवले.
नगिनी: नाव संस्कृतमधून आले का?
व्हॉल्डेमॉर्टची विश्वासू सर्पिणी नगिनी ही त्याच्या आत्म्याचे तुकडे सांभाळणाऱ्या हॉरक्रक्सपैकी एक असते. पुढे फँटॅस्टिक बीस्ट्स चित्रपटांमध्ये ती मूलतः मानवी स्त्री असून एका शापामुळे कायमची सर्परूपात अडकते, असे दाखवण्यात आले. नगिनी या नावाचे मूळ संस्कृतमधील ‘नगिनी’ या शब्दात दिसते. ‘नाग’ म्हणजे सर्प किंवा सर्पाशी संबंधित अर्धदैवी अस्तित्व; त्याचे स्त्रीलिंगी रूप म्हणजे नागिनी. हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये नाग हे केवळ दुष्ट सर्प नाहीत. ते जलस्रोत, पर्जन्य, भूमिगत संपत्ती, सुपीकता आणि संरक्षणाशीही संबंधित आहेत. भारतीय शिल्पकलेत नाग आणि नागिनी मानवी शरीरावर सर्पफणा धारण केलेल्या स्वरूपात किंवा पूर्ण सर्परूपात दिसतात. काही कथांमध्ये त्यांना मानवी आणि सर्प असे दोन्ही आकार धारण करण्याची क्षमता असल्याचे वर्णन आढळते.
असे असले तरी नगिनीच्या नावात आणि तिच्या मानवी-सर्प रूपांतरात भारतीय नागपरंपरेची आठवण येते. मात्र व्हॉल्डेमॉर्टची दुष्ट सहकारी म्हणून उभे केलेले नगिनीचे पात्र प्राचीन भारतीय नागिनीची थेट प्रतिकृती नाही. भारतीय परंपरेतील नाग-नागिनी नैतिकदृष्ट्या एकांगी नसतात. ते संरक्षक, दैवी, कल्याणकारी किंवा प्रसंगी क्रोधित अशा अनेक भूमिकांमध्ये दिसतात. नागिनीला मानवी स्त्रीपासून कायम सर्प बनवणारी ‘मॅलेडिक्टस’ ही संकल्पनाही हॅरी पॉटरच्या काल्पनिक विश्वातील स्वतंत्र निर्मिती आहे. म्हणून तिचे नाव भारतीय असले, तरी संपूर्ण पात्र भारतीय पुराणातून जसेच्या तसे उचलण्यात आले, असे म्हणता येणार नाही.
फ्लफी: ग्रीक पाताळाच्या रक्षकाचे आधुनिक रूप
पहिल्या हॅरी पॉटरकथेत तीन डोक्यांचा फ्लफी एका गुप्त दरवाजाचे रक्षण करतो. त्या दरवाजापलीकडे फिलॉसॉफर्स स्टोन पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक संकटांचा मार्ग आहे. संगीत ऐकल्यानंतर फ्लफी झोपी जातो आणि हॅरी, रॉन व हर्मायनीला पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. फ्लफीच्या मागे ग्रीक पुराणातील सर्बरसची प्रतिमा स्पष्टपणे दिसते. सर्बरस हा मृतांच्या पाताळलोकाचा अधिपती हेडीसच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करणारा महाकाय कुत्रा होता. मृतात्म्यांना बाहेर पडू न देणे आणि जिवंत माणसांना पाताळात प्रवेश करण्यापासून रोखणे हे त्याचे काम होते. होमरच्या साहित्यात त्याचा उल्लेख केवळ हेडीसचा कुत्रा असा येतो. हेसिओडच्या थिओगोनीमध्ये सर्बरस हे नाव आढळते; मात्र तेथे त्याला पन्नास डोकी असल्याचे वर्णन आहे. पुढील ग्रीक-रोमन कला आणि साहित्यात तीन डोक्यांचे रूप अधिक प्रचलित झाले.
सर्बरसला शांत करून पाताळात प्रवेश करण्याच्याही विविध कथा आहेत. रोमन कवी व्हर्जिलच्या ॲनिड मध्ये सिबिल औषधी पदार्थ मिसळलेला खाद्यपदार्थ देऊन त्याला झोपवते. ऑर्फियसच्या संगीताने पाताळातील शक्ती शांत झाल्याची स्वतंत्र ग्रीक परंपराही आहे. हॅरी पॉटरमध्ये अन्नाऐवजी संगीताचा वापर करून या प्राचीन कथेला नवे रूप देण्यात आले. सर्बरस प्रमाणे फ्लफीही दोन जगांच्या सीमेवर उभा आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे सुरक्षित हॉगवॉर्ट्स; तर दुसऱ्या बाजूला अमरत्वाचा दगड, हॉगवॉर्ट्सचे पुनरागमन आणि मृत्यूचा धोका आहे.
बॅसिलिस्क: नजरेने मृत्यू घडवणारा ‘सर्पांचा राजा’
हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्समध्ये हॉगवॉर्ट्सच्या तळघरात दडलेला बॅसिलिस्क नजरेला नजर मिळताच मृत्यू घडवतो. त्याचे प्रतिबिंब किंवा अप्रत्यक्ष नजर पाहिल्यास व्यक्तीचा मृत्यू होत नाही; मात्र ती दगडासारखी निश्चल होते. कोंबड्याचे आरवणे या महाकाय सर्पासाठी घातक ठरते. Basiliskचे मूळ प्राचीन ग्रीक-रोमन परंपरेत आहे. ‘बॅसिलिस्क’ या ग्रीक शब्दाचा अर्थ साधारणतः ‘लहान राजा’ असा होतो.
रोमन अभ्यासक प्लिनी द एल्डरने आपल्या नॅचरल हिस्टरी मध्ये बॅसिलिस्कचे वर्णन लहान पण अत्यंत विषारी सर्प म्हणून केले. त्याच्या डोक्यावरील चिन्ह मुकुटासारखे दिसत असल्यामुळे त्याला सर्पांचा राजा मानले जात होते. पुढील मध्ययुगीन युरोपीय कथांमध्ये त्याचे रूप बदलत गेले. त्यात सर्प, कोंबडा आणि अन्य प्राण्यांची वैशिष्ट्ये मिसळली गेली. वृद्ध कोंबड्याने घातलेल्या अंड्यातून बॅसिलिस्कचा जन्म होतो आणि कोंबड्याचा आवाज त्याच्यासाठी प्राणघातक ठरतो, अशी कल्पना लोकप्रिय झाली. रोलिंग यांच्या बॅसिलिस्कमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन अशा दोन्ही परंपरा एकत्र येतात. त्याची विषारी शक्ती आणि प्राणघातक नजर प्राचीन वर्णनांशी जोडलेली आहे; तर कोंबड्याचा आवाज ही त्याचा कमकुवतपणा मध्ययुगीन लोकविश्वासातून आला आहे. नजरेने मृत्यू किंवा दगड करण्याची क्षमता ग्रीक पुराणातील मेड्यूसाचीही आठवण करून देते.
फिनिक्स: राखेतून पुनर्जन्माची कथा कुठून आली?
डम्बलडोरचा फॉक्स हा साधा पक्षी नाही. तो आयुष्याच्या शेवटी आगीत भस्म होतो आणि त्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो. त्याच्या अश्रूंमध्ये जखम भरून काढण्याची शक्ती आहे. संकटाच्या काळात तो निष्ठावंत व्यक्तीच्या मदतीला येतो आणि अत्यंत जड वस्तू वाहून नेऊ शकतो. पाश्चिमात्य जगातील फिनिक्सची सर्वाधिक परिचित प्रतिमा ग्रीक आणि नंतरच्या रोमन साहित्यामधून विकसित झाली. हा पक्षी दीर्घकाळ जगतो आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेतो, अशी कल्पना त्याच्याशी जोडली गेली. मात्र फिनिक्सच्या सर्व प्राचीन कथांमध्ये तो स्वतःला जाळून राखेतूनच जन्म घेतो असे नाही.
ग्रीक इतिहासकार हेरोडोटसच्या वृत्तान्तात हा पक्षी आपल्या मृत पित्याचे अवशेष इजिप्तमधील सूर्यदेवाच्या मंदिरात आणतो. आगीतून मृत्यू आणि राखेतून पुनर्जन्माची परिचित प्रतिमा पुढील काळात अधिक ठळक झाली. फिनिक्सचा संबंध प्राचीन इजिप्तमधील बेनू (Bennu) पक्ष्याशीही जोडला जातो. बेनू हा सूर्य, निर्मिती आणि पुनर्निर्मितीशी संबंधित होता. मात्र बेनू आणि ग्रीक फिनिक्स पूर्णपणे एकच पात्र होते, असे सरळ म्हणता येत नाही.
पर्शियन परंपरेतील सिमुर्ग हा आणखी एक महत्त्वाचा महापक्षी आहे. शाहनामामध्ये तो ज्ञानी आणि संरक्षक पक्षी म्हणून येतो. त्याच्यात आणि फिनिक्समध्ये दैवी संरक्षण व पुनर्निर्मितीसारखे काही समान धागे दिसतात; तरी दोन्हींच्या स्वतंत्र कथा आणि सांस्कृतिक भूमिका आहेत. म्हणून सिमुर्गला केवळ ‘पर्शियन फिनिक्स’ म्हणणे अतिसुलभीकरण ठरते. हॅरी पॉटरमधील फॉक्समध्ये अग्नी, पुनर्जन्म, उपचार, निष्ठा आणि आशा असे अनेक अर्थ एकत्र येतात. त्यामुळे डम्बलडोरच्या मृत्यूनंतर ऐकू येणारे त्याचे गाणे केवळ शोक व्यक्त करत नाही; ते मृत्यूच्या पलीकडे टिकणाऱ्या जीवनाचे प्रतीकही ठरते.
मॅंड्रेक: औषधी मुळाला मानवी आवाज कसा मिळाला?
चेंबर ऑफ सीक्रेट्समध्ये मॅंड्रेकची रोपे जमिनीतून उपटल्यावर प्रचंड किंचाळतात. प्रौढ मॅंड्रेकचा आवाज ऐकल्यास मृत्यू येऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांना हेडफोन्स घालावे लागलेत. बॅसिलिस्कच्या अप्रत्यक्ष नजरेमुळे निश्चल झालेल्यांना मॅंड्रेकपासून तयार केलेल्या औषधाने पुन्हा सामान्य केले जाते. मॅंड्रेक किंवा मॅन्ड्रागोरा ही प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली भूमध्य प्रदेशातील वनस्पती आहे. तिच्या मुळांचा आकार काही वेळा मानवी शरीरासारखा दिसतो. याच आकारामुळे तिच्याभोवती अनेक लोककथा निर्माण झाल्या. प्राचीन ग्रीक वैद्य डिओस्कोराईड्सने मॅंड्रेकचा औषधी वनस्पती म्हणून उल्लेख केला. तिच्यात शक्तिशाली आणि विषारी रासायनिक घटक असल्यामुळे ती भूल, वेदनाशमन आणि अन्य उपचारांशी जोडली गेली. चुकीच्या प्रमाणात सेवन केल्यास मात्र गंभीर विषबाधा होऊ शकते.
मध्ययुगीन युरोपात तिच्या मानवरूपी मुळाला जादुई शक्ती असल्याचे मानले गेले. ते जमिनीतून उपटताना किंचाळते आणि त्याचा आवाज ऐकणारा माणूस मरतो किंवा वेडा होतो, अशी समजूत होती. काही चित्रित हस्तलिखितांमध्ये मुळाला दोरी बांधून कुत्र्याच्या मदतीने ते उपटताना दाखवण्यात आले आहे. हॅरी पॉटरने या भयावह लोककथेला शाळेतील काहीशा विनोदी प्रसंगात रूपांतरित केले. मात्र वनस्पतीचे औषधी आणि प्राणघातक असे दोन्ही स्वरूप कायम ठेवले.
वेअरवुल्फ: राक्षसाची कथा की सामाजिक बहिष्काराचे रूपक?
मानवाचे लांडग्यात रूपांतर होण्याच्या कथा प्राचीन ग्रीसपासून मध्ययुगीन युरोपापर्यंत आढळतात. ‘लायकॅनथ्रॉपी’ हा शब्द ग्रीक पुराणातील आर्केडियाचा राजा लायकाऑन याच्या नावाशी जोडला जातो. रोमन कवी ओव्हिडच्या मेटामॉरफोसेसमध्ये लायकाऑनच्या क्रूर कृत्यांमुळे (Zeus) झ्यूस त्याचे लांडग्यात रूपांतर करतो. मध्ययुगीन आणि आरंभीच्या आधुनिक युरोपात वेअरवुल्फ हा केवळ काल्पनिक प्राणी राहिला नाही. जादूटोणा, सैतानी शक्ती आणि हिंसक गुन्ह्यांच्या आरोपांशी त्याला जोडण्यात आले. काही व्यक्तींवर वेअरवुल्फ असल्याचे आरोप करून खटलेही चालवण्यात आले.
हॅरी पॉटरमध्ये रेमस ल्युपिनच्या माध्यमातून या प्रतिमेला वेगळे वळण मिळते. ल्युपिन स्वभावाने दुष्ट किंवा हिंसक नाही. लहानपणी झालेल्या हल्ल्यामुळे त्याला ही अवस्था प्राप्त होते. पूर्ण चंद्राच्या रात्री होणाऱ्या अनैच्छिक परिवर्तनामुळे समाज त्याला नोकरी, सुरक्षितता आणि सन्मान नाकारतो. त्याचे नावही अर्थपूर्ण आहे. ‘रेमस’ हे रोमच्या स्थापनेशी संबंधित आणि लांडगिणीने वाढवलेल्या जुळ्या भावांपैकी एकाचे नाव आहे; तर ‘ल्युपिन’ हा लॅटिनमधील लुपस, म्हणजेच लांडगा, या शब्दाशी संबंधित आहे. त्यामुळे प्राचीन शापरूप वेअरवुल्फ हॅरी पॉटरमध्ये आजार, अनैच्छिक ओळख आणि सामाजिक बहिष्काराचे रूपक ठरतो. राक्षसाच्या बाह्य रूपापेक्षा समाज त्या व्यक्तीकडे कसा पाहतो, हा प्रश्न ल्युपिनच्या कथेत अधिक महत्त्वाचा ठरतो.
सेंटॉर: रानटी प्राणी की ज्ञानी शिक्षक?
हॅरी पॉटरच्या फॉरबिडन फॉरेस्ट मध्ये राहणारे फिरेन्झी, बेन आणि रोनन हे सेंटॉर आकाशातील ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करतात. ते मानवी राजकारणापासून दूर राहतात आणि भविष्याबद्दल थेट उत्तर देण्याऐवजी आकाशातील संकेतांचे अर्थ लावतात. ग्रीक पुराणातील सेंटॉर हे अर्धमानव-अर्धघोडे प्राणी होते. त्यांच्या कथांमध्ये मानवी विवेक आणि पशुसुलभ आवेग यांच्यातील संघर्ष दिसतो. बहुतांश सेंटॉर मद्य, हिंसा आणि अनियंत्रित वर्तनाशी जोडले गेले; मात्र कायरॉन (Chiron) त्याला अपवाद होता.
कायरॉन (Chiron) हा ज्ञानी वैद्य, शिक्षक आणि भविष्यवेत्ता मानला गेला. अकिलीज आणि जेसन आणि वैद्यकदेव एस्कलेपियससह अनेक ग्रीक वीरांचा तो शिक्षक होता. इतर सेंटॉरच्या तुलनेत तो संयमी, सुसंस्कृत आणि विद्वान होता. हॅरी पॉटरमधील फिरेन्झीमध्ये कायरॉनच्या प्रतिमेचा प्रभाव जाणवतो. तो हॅरीला वाचवतो, Hogwartsमध्ये भविष्यकथन शिकवतो आणि ज्ञानासाठी स्वतःच्या समुदायाचा विरोध सहन करतो. तरीही रोलिंग यांचे सेंटॉर ग्रीक प्रतिमेची थेट प्रतिकृती नाहीत. त्यांची स्वतंत्र समाजव्यवस्था, मानवी हस्तक्षेपाविषयीचा अविश्वास आणि आकाशवाचनाची विद्या हे नव्याने जोडलेले घटक आहेत.
ग्रिफिन आणि ग्रिफिनडॉर एकच आहेत का?
ग्रिफिन हा सिंहाचे शरीर आणि गरुडाचे डोके व पंख असलेला प्राणी आहे. त्याची प्रतिमा प्राचीन इजिप्त, पश्चिम आशिया, इराण, मध्य आशिया आणि ग्रीक कलांमध्ये विविध रूपांत आढळते. सिंहाची भौतिक शक्ती आणि गरुडाचे आकाशावरील प्रभुत्व यांचा संगम असल्यामुळे तो राजसत्ता, संरक्षण आणि दैवी सामर्थ्याचे प्रतीक झाला. हॅरी पॉटरमधील बकबीक मात्र ग्रिफिन नसून हिप्पोग्रिफ आहे. त्याचे पुढचे शरीर गरुडाचे आणि मागचे शरीर घोड्याचे असते. हिप्पोग्रिफची प्रसिद्ध साहित्यिक प्रतिमा सोळाव्या शतकातील इटालियन कवी लुडोविको अरिओस्टोच्या ऑरलँडो फ्युरियोसोमध्ये आढळते.
‘ग्रिफिनडॉर’या नावात ग्रिफिनचा ध्वनी जाणवत असला आणि त्या घराचा संबंध धैर्याशी असला, तरी हे नाव थेट प्राचीन ग्रिफिन वरूनच घेतले असल्याचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हा संबंध शक्यता म्हणून मांडता येईल; सिद्ध तथ्य म्हणून नाही.
हॅरी पॉटरची खरी जादू कुठे दडली आहे?
‘हॅरी पॉटर’चे विश्व शून्यातून निर्माण झालेले नाही; त्याला हजारो वर्षांच्या मानवी मिथकांचा आधार आहे. ‘फिलॉसॉफर्स स्टोन’मधील अमरत्वाचा शोध असो, ‘फ्लफी’मागील ग्रीक पाताळाचा रक्षक सर्बेरस असो, ‘बॅसिलिस्क’मधील मध्ययुगीन भयकथा असोत की ‘मँड्रेक’मागील प्राचीन औषधशास्त्र… रोलिंग यांनी या प्राचीन प्रतिमांना आधुनिक शाळेच्या वातावरणात अप्रतिमपणे गुंफले आहे. इथे प्राचीन सर्बेरस शाळेच्या तळघरात पहारा देतो, मँड्रेक वनस्पतिशास्त्राच्या वर्गात शिकवला जातो, तर भयंकर वेअरवुल्फ एका संवेदनशील शिक्षकाच्या रूपात समोर येतो. नागिनीच्या उदाहरणातून ही प्रक्रिया आणखी स्पष्ट होते. तिचे नाव भारतीय संस्कृत परंपरेतून आले असले, तरी पात्राला आधुनिक पाश्चिमात्य फँटसी कथानकात स्वतंत्र ओळख मिळते. त्याचप्रमाणे फिनिक्स, बेन्नू आणि सिमुरग यांच्यात काही समान प्रतीके दिसत असली, तरी त्यांच्या स्वतंत्र सांस्कृतिक ओळखी कायम राहतात.
मूलत: मिथकांची हीच प्रवाही शक्ती असते. ती एका संस्कृतीत जन्मतात, दुसऱ्या संस्कृतीत नवे अर्थ धारण करतात आणि आधुनिक लोकप्रिय कथांमध्ये पुन्हा अवतरतात. म्हणून २५ वर्षांनंतरही हॅरी पॉटरची दुनिया परिचित असूनही विलक्षण वाटते. या दुनियेची जादू पूर्णपणे काल्पनिक नसून मानवाने युगांनुयुगं जपलेल्या भीती, आशा आणि अमरत्वाच्या आकांक्षांचाच तो एक नवा आविष्कार आहे!
संदर्भ:
- Spencer, Richard A. Harry Potter and the Classical World: Greek and Roman Allusions in J. K. Rowling’s Modern Epic. McFarland & Company, 2015.
- Groves, Beatrice. Literary Allusion in Harry Potter. Routledge, 2017.
- van den Broek, Roel B. The Myth of the Phoenix According to Classical and Early Christian Traditions. E. J. Brill, 1972.
- Principe, Lawrence M. The Secrets of Alchemy. University of Chicago Press, 2013.
