HbA1c चा रिपोर्ट हातात आला की, अनेकांना पहिला प्रश्न पडतो हा आकडा नेमका कशावरून ठरतो? फास्टिंग आणि जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची सरासरी काढून HbA1c ठरतो, असा अनेकांचा समज असतो. मात्र, प्रत्यक्षात तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची पातळीची नोंद करुन HbA1c निर्देशांक ठरवला जातो.

HbA1c (Hemoglobin A1C) ही साधी रक्तचाचणी असून, ती मागील साधारण दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते. मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलचे कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनला किती ग्लुकोज जोडलेले आहे, हे या चाचणीत मोजले जाते. लाल रक्तपेशी साधारण तीन महिने रक्ताभिसरणात फिरत असल्याने, HbA1c मधून मागील दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी समजते.

चाचणीमध्ये नेमकं काय मोजलं जातं?

HbA1c चाचणीसाठी रक्ताचा नमुना घेतला जातो. त्यामध्ये हिमोग्लोबिनला किती प्रमाणात ग्लुकोज जोडले गेले आहे, म्हणजेच हिमोग्लोबिनचा किती भाग ‘ग्लायकेटेड’ झाला आहे, हे तपासले जाते. या चाचणीचा निकाल साधारणपणे टक्केवारीत दिला जातो. उदाहरणार्थ, HbA1c ७ टक्के असल्यास, तपासलेल्या हिमोग्लोबिनपैकी सुमारे ७ टक्के हिमोग्लोबिन ग्लायकेटेड झाले आहे, असा त्याचा अर्थ होतो.

मात्र, या चाचणीचा निकाल थेट रक्तातील साखरेच्या प्रमाणाशी जोडता येत नाही. HbA1c ७ टक्के आहे याचा अर्थ असा होत नाही की रक्तातील साखरेचे प्रमाण देखील ७ टक्के आहे किंवा दिवसभर ते एका ठरावीक पातळीवरच राहणार आहे. HbA1c चाचणी ही रक्तातील साखरेचे थेट प्रमाण दर्शवत नाही, तर हिमोग्लोबिनला जोडलेल्या ग्लुकोजचे प्रमाण दर्शवते, असे डॉ. घोडी यांनी स्पष्ट केले.

HbA1c चाचणी म्हणजे केवळ गेल्या ९० दिवसांची सरासरी असते का?

तज्ज्ञांच्या मते, नाही! HbA1c ही केवळ गेल्या तीन महिन्यांच्या रक्तातील साखरेची साधी सरासरी नसते, तर ती एका भारित सरासरीवर (Weighted Average) आधारित असते.

गेल्या तीन किंवा चार महिन्यांतील साखरेच्या नोंदींपेक्षा गेल्या काही आठवड्यांतील रक्तातील साखरेच्या प्रमाणाचा HbA1c च्या निकालावर अधिक प्रभाव पडतो, असे डॉ. घोडी सांगतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, “जर एखाद्या रुग्णाने गेल्या काही आठवड्यांत आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या नियंत्रणात आणले असेल, तर पूर्ण तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच ही सुधारणा HbA1c च्या रिपोर्टमध्ये दिसू शकते,” असे डॉ. घोडी यांनी नमूद केले.

HbA1c वरून साखरेची सरासरी पातळी कशी ठरते?

HbA1c आणि रक्तातील सरासरी साखरेचे प्रमाण (eAG – Estimated Average Glucose) यांचा थेट संबंध दर्शवणारे एक ठरावीक गणितीय सूत्र (Formula) आहे:

eAG(mg/dL)=(28.7HbA1c)-46.7

उदाहरणार्थ,
HbA1c ६% असल्यास, तुमची गेल्या ३ महिन्यांतील रक्तातील सरासरी साखर सुमारे १२६ mg/dL असते
HbA1c ७% असल्यास, रक्तातील सरासरी साखर सुमारे १५४ mg/dL इतकी असते

HbA1c ची टक्केवारी जितकी जास्त, तितकी रक्तातील सरासरी साखरेची पातळीही जास्त असते.

HbA1c च्या रिपार्टमध्ये दिशाभूल होऊ शकते का?

होय, असा प्रकार घडू शकतो! HbA1c ही अतिशय उपयुक्त चाचणी असली, तरी त्याचा निकाल नेहमीच स्वतंत्रपणे गृहीत धरू नये.

डॉ. घोडी सांगतात की, “शरीरातील तांबड्या रक्तपेशींचे आयुष्य (RBC Lifespan) किंवा पुनर्रचना बदलणाऱ्या काही विशिष्ट आजार, हिमोग्लोबिनच्या प्रकारांतील बदल, अलीकडच्या काळातील अति-रक्तस्राव किंवा रक्तसंक्रमण (Blood Transfusion) यांसारख्या वैद्यकीय कारणांमुळे HbA1c चे रिपोर्ट बदलू शकतात.”

अशा परिस्थितीमध्ये अचूक निदान करण्यासाठी डॉक्टर केवळ HbA1c च्या निकालावर अवलंबून न राहता, रक्तातील साखरेच्या प्रत्यक्ष नोंदींशी त्याची तुलना करतात किंवा इतर पूरक चाचण्यांचा वापर करतात, असेही डॉ. घोडी यांनी नमूद केले.

HbA1c बाबत काय लक्षात ठेवले पाहिजे?

HbA1c या चाचणीकडे रक्तातील साखरेच्या एकाच वेळच्या रिपोर्टऐवजी, दीर्घकालीन ‘ग्लुकोज रिपोर्ट कार्ड’ म्हणून पाहिले पाहिजे. “ग्लुकोमीटर तुम्हाला एका विशिष्ट क्षणासाठी रक्तातील साखरेची पातळी किती आहे ते सांगतो, तर HbA1c ही चाचणी गेल्या काही आठवड्यांपासून ते महिन्यांपर्यंतची ग्लुकोजची एकूण स्थिती दर्शवणारे अधिक व्यापक चित्र समोर आणते. या दोन्ही चाचण्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि मधुमेहावरील (Diabetes) नियंत्रणाचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी या दोन्ही चाचण्या उपयुक्त ठरू शकतात,” असेही डॉ. घोडी यांनी नमूद केले आहे.

थोडक्यात, दररोजची साखरेची पातळी आणि HbA1c हे दोन वेगवेगळे पैलू आहेत. रोजचे ग्लुकोमीटर रीडिंग हे ‘तत्काळ चित्र’ दाखवते, तर HbA1c ही चाचणी काही आठवडे किंवा महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी दर्शवते. म्हणूनच, मधुमेहाच्या प्रभावी उपचारांसाठी आणि योग्य नियंत्रणासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने या दोन्ही चाचण्यांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे.