HDFC Bank Share Price Fall insights: भारतीय शेअर बाजारात ‘टू बीग टू फेल’ समजल्या जाणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या शेअरने गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांची मोठी निराशा केली आहे. बँक पहिल्या तिमाहीत १९ हजार कोटींच्या नफ्यात असूनही, तिचा शेअर सर्वोच्च किमतीवरून तब्बल ३३ टक्क्यांनी खाली आला आहे.
‘टू बीग, टू फेल’ म्हणजेच कधीही ढासळू शकणार नाही एवढा महाकाय उद्योग म्हणून ज्याचे वर्णन केले जाते अशा कॅटेगरीमध्ये एचडीएफसी बँकेचा शेअर येतो. जवळपास सर्व लार्ज कॅप आणि लार्ज आणि मिडकॅप म्युच्युअल फंड स्कीम्सच्या पोर्टफोलिओ मध्ये एचडीएफसी बँक हा शेअर दिसतोच दिसतो. पण आता मात्र तो ‘असून अडचण….’ या श्रेणीत दाखल झाला आहे की काय, असे वाटते.
कोणत्याही बँकेचा शेअर का वाढतो किंवा घसरतो याची पाच कारणे असतात
- NIM नेट इंटरेस्ट मार्जिन – म्हणजेच बँक लोकांकडून डिपॉझिट घेते आणि कर्ज देते या दोघांतील फरक म्हणजे बँकेचा व्याजातून मिळणारा नफा असतो.
- कर्जातील वाढ – कर्ज देण्याच्या कार्यक्षमतेत सतत वाढ होत असेल तर बँक फायद्यात असते.
- डिपॉझिट किंवा ठेवींमधील वाढ – बँक जे फिक्स डिपॉझिट जमा करून घेते, ते कमीत कमी व्याजदरात मिळाले तर त्याचा नफ्यावर फायदा होतो परिणाम होतो.
- असेट क्वालिटी – बँकेचे बुडीत खाती कर्जाचे प्रमाण कमीत कमी असले पाहिजे.
- आरओआय (Return over Investment)- गुंतवलेल्या भांडवलावर किती टक्के नफा मिळतो.
वरील पाच घटकांचा विचार केल्यास एचडीएफसी बँक अजिबातच असमाधानकारक वाटत नाही.
यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा १९ हजार कोटी रुपये (पाच टक्के वृद्धी) कर्जात १५ टक्के वाढ, ठेवींमध्ये १३.३% वाढ याच बरोबरीने नेट इंटरेस्ट मार्जिन ३.२६% होते. असे असूनही एचडीएफसी बँकेचा शेअर दहा सप्टेंबर २०२६ या दिवशी ६२७ रुपये होता हा भाव त्याच्या सर्वोच्च किमतीपेक्षा ३३ टक्क्यांनी कमी आहे आणि गुंतवणूकदारांसाठीही निश्चित चिंतेची बाब आहे.
महामर्जरचा परिणाम ?
आता एचडीएफसी बँक ही कंपनी आपल्याला दिसते ती मूळ एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी. बँक या दोन वेगळ्या कंपन्यांचे विलीनीकरण होऊन तयार झालेली महाकंपनी आहे. त्यापैकी एचडीएफसी लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी गृह कर्ज देणारी खाजगी कंपनी म्हणून ओळखली जात असे व एचडीएफसी बँक भारतातील आघाडीची खाजगी बँक होती. या दोघांच्या आपापसातील विलीनीकरणानंतर एक महाकाय कंपनी तयार झाली तीच आताची एचडीएफसी बँक होय.
विलीनीकरणानंतर गुंतवणूकदारांना कोणत्या अपेक्षा होत्या ?
एचडीएफसी बँकेच्या नफ्याचे प्रमाण सुधारावे आणि इक्विटी शेअर्सवर चांगले परतावे मिळावेत. मात्र तसे होताना दिसत नाही. याचे कारण बँकेला एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर बॅलन्स शीट नीट सांभाळता आलेली नाही, असा विचार प्रवाह समोर येताना दिसतो.
गव्हर्नन्स आणि एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेचे चेअरमन अतनू चक्रवर्ती यांनी मार्चच्या मध्यावर आपला राजीनामा देताना बँकेत ज्या प्रकारे निर्णय घेतले जातात ते आपल्या वैयक्तिक ‘नीती मूल्यांशी’ जुळत नाही असे कारण दिले आहे. त्याचप्रमाणे बँकेचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर शशीधर जगदिशन यांनी ऑक्टोबर पासून पायउतार होत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत व त्यांना पुन्हा हे पद स्वीकारण्यात स्वारस्य नाही असे सांगितले आहे. गुंतवणूकदारांच्या मनात यामुळे निश्चितच चलबिचल झालेली आहे. ज्यांना एचडीएफसी लिमिटेड या कंपनीचा पूर्वेतिहास माहीत आहे त्यांना दीपक पारेख यांनी तब्बल ४५ वर्ष एचडीएफसी ही कंपनी कशी घडवली याविषयी माहिती असल्याने अशा प्रकारे बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी पायउतार होत असणार हे असणे त्यांना रुचणारे नाही. एचडीएफसी बँकेला विलीनीकरणानंतर एचडीएफसी लिमिटेडची महाग कर्जे जास्त ( व्याजदराने उचललेली दिलेल्या ठेवी ) स्वीकारावी लागल्याने बॅलन्स शीटवर त्याचा परिणाम झालेला आहे असे जरी म्हटले जात असले तरी ते या तिमाहीच्या आकड्यांमध्ये दिसत नाही. कोणत्याही महाकाय कंपन्यांचे आपापसात विलीनीकरण झाल्यावर साधारण वर्ष दीड वर्षापर्यंत परिणाम दिसतोच, पण आता याला चार वर्षे उलटून गेली आहेत, तरीही हे परिणाम दिसत राहणे योग्य नाही.
परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली
एचडीएफसी बँक या शेअरचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमोटर (जे व्यवसाय चालू करतात ते मालक ) असे कोणी नसून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FII) आणि म्युच्युअल फंड सर्वसामान्य नागरिक यांचाच वाटा सर्वाधिक आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स सर्वात मोठे शहर होल्डर्स आहेत आणि त्यांनीच गेल्या वर्षभरापासून एचडीएफसी बँकेचे शेअर्स विकण्याचा सपाटा लावलेला आहे.
अगदी आकडेवारीत सांगायचं झालं तर जून २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांची एकूण गुंतवणूक ४८.८४% होती ती या जून २०२६ अखेरीस घसरून ४१.८२ टक्क्यावर आली आहे. म्हणजेच अक्षरशः हजारो कोटी रुपयांचे शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात विकले आहेत आणि याचा स्पष्ट परिणाम शेअरवर होताना दिसतो आहे.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कायम !
वर लिहिल्याप्रमाणे म्युच्युअल फंड एचडीएफसी बँकेत कायम गुंतवणूक करत आले आहेत. भारतातील जवळपास ७०० फंड योजनांमध्ये मिळून हजारो कोटी रुपयांचे शेअर्स म्युच्युअल फंडांनी अजूनही ‘होल्ड’ करून ठेवले आहेत. त्यातील हिस्सेदारी थोडी कमी झालेली असली तरीही फंड मॅनेजरचा एचडीएफसी बँकेवरील विश्वास कमी झालेला नाही. याचे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली असली तरी बँकेचे नफ्याचे आकडे अजूनही समाधानकारक आहेत. निफ्टी मध्ये एचडीएफसी बँकेचा हिस्सा जवळपास ९.८% आहे. अशावेळी फंड मॅनेजर्स सावधगिरी म्हणून शेअर्स विकत नाहीत. उलट भविष्यात तो शेअर ‘बाउन्स बॅक’ होईल म्हणजेच उसळून वर येईल म्हणून गुंतवणूक कायम ठेवतात.
LIC वाढवणार एचडीएफसी बँकेतील हिस्सेदारी !
एचडीएफसी बँकेचा शेअर फारसा वाढत नसला तरीही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एलआयसी’ने एचडीएफसी बँकेतील आपला हिस्सा वाढवण्यात रस दाखवला आहे ऑगस्टच्या मध्यापर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार एलआयसी एचडीएफसी बँकेमध्ये ४.११% हिस्सा राखून आहे. रिझर्व बँकेकडून हिरवा कंदील मिळाल्यावर ही हिस्सेदारी वाढवून ९.९९% एवढा हिस्सा घेण्यासाठी एलआयसी तयार आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा निश्चितच आशेचा किरण आहे. बाजाराचे चक्र फिरले आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स पुन्हा एकदा परतले तर एचडीएफसी बँक निश्चितपणे वर जाणार यात शंकाच नाही.
