डॉ. देवदत्त पोखरकर
Moringa (मोरिंगा) हा शब्द कानावर पडताच आपण कोणत्या तरी भारी विदेशी वनस्पतीविषयी ऐकतोय असाच फील येतो. वजन कमी करण्यासाठी, ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी, कोलेस्टेरॉल, इन्फ्लेमेशन, ब्लड प्रेशर, इम्युनिटी वाढविण्याचा रामबाण उपाय अशीच धारणा मोरिंगाबद्दल आहे. त्यामुळे भारतासह आंतरराष्ट्रीय वेलनेस (wellness) आणि सुपरफूड (superfood) बाजारात मोरिंगाची भलतीच क्रेझ आहे. २०२६ मधील बाजार-अहवालांतही मोरिंगा प्रोडक्टची मागणी वेगाने वाढत असल्याचे दिसते. ११ जून २०२६ रोजी Future Market Insights (FMI) या मार्केट रिसर्च आणि कन्सल्टिंग संस्थेने प्रकाशित केलेल्या Moringa Products Market रिपोर्टमध्येही मोरिंगा प्रोडक्टची मागणी वेगाने वाढत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपण मोरिंगा पावडर, टी, कॅप्सूल्स, स्मूदीजच्या नादात भारतीय आहार परंपरेतील शेवग्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले होते का? याचाही विचार होणं गरजेच आहे. असो, काही का असेना मोरिंगा ट्रेंडच्या निमित्ताने मोरिंगा म्हणून प्रसिद्ध झालेल्या शेवग्याचे महत्त्व जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
श्री कृष्णाचा आवडता शेवगा ते उपयुक्त वनस्पती
घराच्या अंगणात, शेताच्या बांधावर किंवा रस्त्याच्या कडेला शेवग्याचे झाड आपल्याला एखाद्या परिचित व्यक्तीप्रमाणे भेटते. उंच वाढलेले, नाजूक हिरव्या पानांनी डवरलेले आणि फांद्यांवर लोंबणाऱ्या लांबच लांब शेंगांनी सजलेले शांतपणे उभे असलेले शेवग्याचे झाड आपले लक्ष सहजच वेधून घेते. शेवग्याच्या शेंगांची आमटी, सांबार, भाजी आणि विशेष म्हणजे त्याच्या कोवळ्या पानांची भाजी हा आपल्या पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. कोकणात, विशेषतः सिंधुदुर्गात गोकुळाष्टमीच्या दिवशी शेवग्याच्या पानांची भाजी नैवेद्याचा भाग म्हणून तयार करण्याची परंपरा आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या या वनस्पतीकडे मात्र आपण अनेकदा केवळ भाजीसाठी शेंगा देणारे झाड म्हणूनच पाहतो. परंतु, प्रत्यक्षात शेवगा हा पोषण, आहार, आरोग्यदायी जीवन आणि पर्यावरण या सर्वच दृष्टीने अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे.
शेवग्याचे शास्त्रीय नाव Moringa oleifera (मोरिंगा ओलेफेरा) असून तो Moringaceae (मोरिंगेसी) या कुलातील वृक्ष आहे. उष्ण आणि कोरड्या हवामानातही तग धरून वाढण्याची त्याची क्षमता विशेष उल्लेखनीय आहे. कमी पाण्यात वेगाने वाढणारे आणि योग्य काळजी घेतल्यास भरघोस उत्पन्न देणारे हे झाड महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांत आढळते. घराच्या परसबागेत, शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत शेवग्याचे झाड सहजपणे लावता येते. त्यामुळे आपल्या भाजीसाठी ताजी पाने, फुले आणि शेंगा सहज उपलब्ध होतात.

पानांमध्ये दडलेले आहे खरे पोषणतत्त्व
शेवग्याचे खरे पोषणवैभव त्याच्या पानांमध्ये दडलेले आहे. शेवग्याची पाने आकाराने लहान असली तरी ती विविध पोषक घटकांनी समृद्ध असतात. त्यामध्ये बीटा-कॅरोटीन, म्हणजेच शरीरात जीवनसत्त्व ‘अ’ तयार करण्यास मदत करणारा घटक, तसेच जीवनसत्त्व ‘क’, ‘ई’ आणि ‘के’ आढळतात. याशिवाय काही ‘ब’ समूहातील जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि आहारातील तंतूही मिळतात. त्यामुळे शेवग्याच्या पानांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास रोजच्या जेवणाच्या पोषणमूल्यात भर पडू शकते.

महाराष्ट्राच्या पारंपारीक खाद्यसंस्कृतीत शेवग्याच्या पानांची भाजी विशेष महत्त्वाची आहे. कोवळी पाने देठापासून वेगळी करून स्वच्छ धुऊन घेतली जातात. त्यानंतर कांदा, लसूण, हिरवी मिरची, जिरे किंवा मोहरी यांची फोडणी करून त्यात शेवग्याची पाने घातली की साधी, चवदार आणि पौष्टिक भाजी तयार होते. कोकण-गोव्याकडे या भाजीमध्ये खोबरे घातले जाते, तर काही ठिकाणी डाळ किंवा डाळीच्या पीठाचा वापर केला जातो. अशा प्रकारे पालेभाजी आणि कडधान्य यांचा संगम झाल्याने जेवण अधिक पौष्टिक होते.

शेवग्याच्या पानांची चव किंचित कडवट किंवा तुरट असते. परंतु हीच त्यांची खासियत आहे. कांदा, लसूण, खोबरे आणि मसाल्यांच्या योग्य वापरामुळे ही चव संतुलित होते. कोवळी पाने वापरल्यास भाजी अधिक मऊ आणि रुचकर लागते. पालेभाजी तयार करताना ती जास्त वेळ किंवा भरपूर पाण्यात शिजवणे टाळणे चांगले. कारण काही जीवनसत्त्वे उष्णतेमुळे किंवा स्वयंपाकाच्या पाण्यात मिसळल्यामुळे कमी होऊ शकतात. त्यामुळे कमी पाण्यात आणि आवश्यक तेवढाच वेळ शिजवल्यास पोषक घटकांचे जतन करण्यास मदत होते.
शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या पानांइतक्याच लोकप्रिय आहेत त्याच्या शेंगा. भारतीय स्वयंपाकघरात शेवग्याच्या शेंगांना विशेष स्थान आहे. महाराष्ट्रात शेवग्याच्या शेंगांची आमटी, रस्सा आणि भाजी केली जाते, तर दक्षिण भारतातील सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगा हा जवळजवळ अनिवार्य घटक आहे. शेंगांमध्ये जीवनसत्त्व ‘क’, कॅरोटेनॉइड्सच्या स्वरूपातील जीवनसत्त्व ‘अ’चे पूर्वघटक आणि काही ‘ब’ समूहातील जीवनसत्त्वे व फोलेट आढळतात. याशिवाय आहारातील तंतू, पोटॅशियम आणि इतर खनिजेही मिळतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा भाजी हा चविष्ट पदार्थ असण्याबरोबरच संतुलित आहारातील एक उपयुक्त घटक ठरतो. शेंगा कोवळ्या असताना त्यातील गर मऊ आणि चवदार असतो. जसजशा त्या जुन्या होतात तसतसे त्यातील तंतू कडक होतात. त्यामुळे भाजी किंवा आमटीसाठी कोवळ्या शेंगा वापरणे अधिक योग्य ठरते. शेंगा शिजवताना त्यातील पोषक घटक टिकवण्यासाठी अतिशय जास्त वेळ शिजवण्याऐवजी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळ शिजवणे महत्त्वाचे आहे.

शेवग्याच्या फुलांची भजी, भाजीही चविष्ट
शेवग्याची फुलेही खाण्यायोग्य आहेत. काही भागांमध्ये शेवग्याच्या फुलांची भाजी, भजी किंवा इतर पदार्थ केले जातात. फुलांचा वापर स्थानिक खाद्यपरंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. झाडाच्या बियांपासून तेलही मिळते. त्यामुळे शेवग्याचे झाड हे केवळ शेंगा मिळवून देणारे झाड नसून त्याच्या अनेक भागांचा उपयोग करता येणारी बहुउपयोगी वनस्पती आहे.

सुपरफूड
आजच्या काळात ‘सुपरफूड’ या संकल्पनेची मोठी चर्चा आहे. विविध देशांतील वनस्पतींचे पोषणमूल्य शोधले जात आहे आणि त्या आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु आपल्या पारंपरिक आहारात शेवग्यासारख्या अनेक पोषक वनस्पती आधीपासूनच होत्या. शेवग्याची पाने, शेंगा आणि फुले यांचा वापर आपल्या ग्रामीण आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीत पिढ्यान्पिढ्या होत आला आहे. त्यामुळे महागड्या किंवा दूरवरून आणलेल्या अन्नपदार्थांच्या शोधात जाण्यापूर्वी आपल्या परिसरातील स्थानिक अन्नसंपत्तीचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे.
पाने किंवा शेंगा संतुलित आहाराचा भाग
शेवग्याच्या पोषणमूल्यांबाबत बोलताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. शेवग्यामध्ये अनेक पोषक घटक असले तरी तो कोणत्याही आजारावरील चमत्कारिक औषध नाही. शेवग्याची पाने किंवा शेंगा संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयुक्त आहेत; मात्र एखाद्या विशिष्ट आजारावर उपचार करण्यासाठी केवळ शेवग्यावर अवलंबून राहणे योग्य नाही.
शेवगा पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कमी पाण्यात वाढण्याची क्षमता असल्यामुळे तो कमी पर्जन्यमानाच्या भागातही उपयोगी ठरतो. आज बदलत्या जीवनशैलीमुळे ताज्या आणि पारंपरिक भाज्यांपेक्षा तयार व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वापर वाढत आहे. अशा वेळी शेवग्याच्या पानांची भाजी आपल्या आहारसंस्कृतीची आठवण करून देते.
पोषणाचा मोठा स्रोत
आपल्या पूर्वजांनी निसर्गातील वनस्पतींचा उपयोग अत्यंत कल्पकतेने केला. शेवग्याचे उदाहरण त्याचे उत्तम प्रतीक आहे. पानांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे, शेंगांमध्ये तंतू व विविध पोषक घटक, फुलांमध्ये खाद्यवैविध्य आणि बियांमध्ये उपयोगिता अशा अनेक गुणांनी हे झाड समृद्ध आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, आरोग्यदायी अन्न नेहमी महागडे किंवा परदेशातून आलेले असते असे नाही. कधी कधी आपल्या घराच्या अंगणात, शेताच्या बांधावर किंवा गावच्या वाटेवर उभे असलेले एखादे साधे झाडच पोषणाचा मोठा स्रोत असते. शेवगा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
