Difference Between Pain Relief And Recovery: “आता काहीच दुखत नाही, म्हणजे आपण पूर्ण बरे झालो.” वेदना कमी झाल्यावर असा निष्कर्ष काढणं अगदी नैसर्गिक आहे. कारण वेदना म्हणजे त्रास, आणि तो गेला की आपण बरे झालो असं वाटतं. पण फिजिओथेरेपी आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने पाहिलं, तर वेदना कमी होणं आणि पूर्ण बरं होणं यामध्ये मोठा फरक आहे. हा फरक न समजल्यामुळेच अनेकांच्या वेदना तात्पुरत्या बऱ्या होतात आणि पुन्हा पुन्हा उद्भवतात. वेदना म्हणजे शरीरात काहीतरी बिनसले आहे, असा मेंदूने दिलेला इशारा. हा इशारा कधी अगदी अचूक असतो, तर कधी गरजेपेक्षा जास्त तीव्र असतो.
औषधं, विश्रांती, तात्पुरते वेदनाशामक उपाय किंवा थोडा वेळ विशिष्ट हालचाल कमी केली किंवा बंद केली हा मेंदूने दिलेला इशारा शांत होऊ शकतो. पण याचा अर्थ शरीर पुन्हा पूर्वीसारखं कार्यक्षम झालं आहे, असा होत नाही.
वेदना कमी होतात, पण समस्या का राहते?
वेदना कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं एखाद्या इजा झालेल्या भागाला आलेली सुरुवातीची सूज आणि दाह कमी झाला की तिथली वेदना थांबते, मज्जासंस्था थोडी शांत झाली की, वेदना थांबते किंवा वेदनाशामक औषधांमुळे वेदनांचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचत नाही. काही वेळा शरीराला थोडी विश्रांती मिळाल्यामुळे आराम मिळतो. पण या सगळ्या प्रक्रिया मुख्यतः लक्षणांवर काम करतात, मूळ कारणावर नाही.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला कंबरदुखी चा त्रास आहे, त्या व्यक्तीने काही दिवस विश्रांती घेतली, औषधं घेतली, की वेदना कमी होतात. पण कंबरेभोवतालचे स्नायू कमकुवत असतील, हालचालीची पद्धत चुकीची असेल, पुरेशी विश्रांती मिळत नसेल, किंवा कामाचा भार अचानक वाढणार असेल, तर वेदना पुन्हा येण्याची शक्यता खूप जास्त असते. यालाच लोक “दुखणं परत आलं” असं म्हणतात.
रिकव्हरी म्हणजे नेमकं काय?
रिकव्हरी म्हणजे केवळ वेदना नसणं नव्हे. रिकव्हरी म्हणजे जगण्याची गुणवत्ता परत मिळवणं. शरीराची कार्यक्षमता पुन्हा मिळवणं, उदाहरणार्थ रोजची कामं करताना त्रास न होणं, वजन उचलताना आत्मविश्वास वाटणं, चालण्याचा आणि हालचालींचा वेग वाढणं, हालचाली सुलभ वाटणं, थोडं जास्त काम केल्यावरही थकवा न येणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हालचाली करताना आत्मविश्वास वाटणं.

स्नायूंची कार्यक्षमता, सहनशक्ती, संतुलन
रिकव्हरी मध्ये शरीराचं संपूर्ण कार्य बघितलं जातं. स्नायूंची कार्यक्षमता, सहनशक्ती, संतुलन, हालचालींची गुणवत्ता आणि मज्जासंस्थेची प्रतिक्रिया या गोष्टींचा त्यात समावेश होतो. वेदना कमी झालेल्या असल्या, तरी या सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्या नाहीत, तर शरीर अजूनही पूर्णपणे बरे झालेलं नसतं.
वेदना आणि भीती यांचा थेट संबंध
वेदना कमी झाल्यानंतरही अनेक लोकांच्या मनात भीती असते. “हे उचललं तर पुन्हा दुखेल का?”, “जास्त चाललो तर काही होईल का?” ही भीती शरीराच्या हालचालींवर परिणाम करते. व्यक्ती नकळत हालचाल कमी करते , काही कामं टाळते. ही भीतीच कधी कधी वेदना टिकवून ठेवते. कारण हालचाल कमी झाली की स्नायू अजून कमकुवत होतात, रक्तप्रवाह कमी होतो आणि शरीर अधिक संवेदनशील बनतं. ही भीती कमी करणं फार महत्त्वाचं असतं. योग्य माहिती, सुरक्षित वातावरणात हालचाल, आणि हळूहळू वाढवलेला भार यामुळे मेंदूला पुन्हा विश्वास बसतो की शरीराला आता विशिष्ट क्रियेपासून कोणतीही इजा नाही.
तात्पुरती वेदना कमी होणं पुरेसं का नसतं?
सध्या वेदना कमी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वेदनाशामक औषधं, इंजेक्शन, पट्ट्या, बेल्ट्स. यामुळे तात्पुरता आराम मिळतो. पण शरीर पुन्हा कार्यक्षम करण्याचं काम हे उपाय करत नाहीत.
फिजिओथेरेपीमध्ये वेदना कमी करणं हा फक्त पहिला टप्पा असतो. त्यानंतर शरीराची ताकद वाढवणं, हालचालींवर नियंत्रण मिळवणं आणि दैनंदिन कामासाठी शरीर तयार करणं हे खरे महत्त्वाचे टप्पे असतात. हे टप्पे वगळले, तर वेदना कमी झाल्या तरी रिकव्हरी अपूर्ण राहते.
रिकव्हरीला वेळ का लागतो?
शरीराला कोणताही बदल स्वीकारायला वेळ लागतो. स्नायू मजबूत होण्यासाठी आठवडे लागतात. मज्जासंस्थेला नवीन हालचाली सुरक्षित वाटायला वेळ लागतो. शरीरावर भार सहन करण्याची क्षमता हळूहळू वाढवावी लागते. म्हणून रिकव्हरी ही “लगेच होणारी घटना” नसून “टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया” आहे. वेदना कमी झाल्यावर लगेचच पूर्वीसारखं सगळं करणं हा एक सामान्य पण धोकादायक समज आहे. योग्य मार्गदर्शनाखाली शरीरावर भार हळूहळू वाढवला, तरच रिकव्हरी टिकाऊ ठरते.
अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी…
वेदना कमी होणं हा फिजिओथेरेपी उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण ते अंतिम ध्येय नाही. पूर्ण बरं होणं म्हणजे पुन्हा विश्वासाने, भीतीशिवाय आणि थकवा न येता दैनंदिन हालचाली आणि काम करता येणं. यासाठी वेळ, समज, संयम आणि योग्य फिजिओथेरेपी मार्गदर्शन आवश्यक आहे. वेदना कमी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी फिजिओथेरेपी उपचार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यांची सांगड घालणं आवश्यक आहे.
