Health Effects of Tea: चहाला वेळ नसते; पण वेळेला चहा लागतोच! हे वाक्य भारतीयांसाठी जीवनमंत्रच आहे. रोज करोडो भारतीय चहाचा एक तरी कप घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नाहीत; पण हाच आवडता चहा शरीरासाठी नेमका किती फायदेशीर आणि किती घातक ठरू शकतो, हे फार कमी जणांना ठाऊक असतं. जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला त्या प्रांताचा खास चहाचा प्रकार चाखायला मिळेल. हे प्रकार काही साधेसुधे नाहीत! मला तर वाटतं, पूर्वी इराणी हॉटेलांमध्ये मेनू विचारल्यावर जसे एका लयीत पदार्थांची नावं घेतली जायची, तसंच काही वर्षांनी “एक चहा द्या” म्हटल्यावर “कोणता चहा पाहिजे?… टी, व्हाईट टी, ब्लॅक टी, ग्रीन टी, येलो टी, वूलॉन्ग टी, रुईबॉस टी…” ही यादी संपेपर्यंत चहाची तलफही निघून जाईल.
चहा म्हणजे काय?
चहा हे जगभरात सर्वांत प्रसिद्ध पेय आहे. जागतिक स्तरावर दोन – तृतीयांश लोक या पेयाचा आस्वाद घेतात. Camellia sinensis (चहाची पानं) या पानांवर प्रक्रिया करून चहाची पावडर बनवली जाते. आणि वरील (टी, व्हाईट टी, ब्लॅक टी, ग्रीन टी इ.) प्रकार हे त्या पानांच्या फर्मेंटेशनच्या प्रमाणीकरणावर अवलंबून असतं.
चहा दुधासोबत का उकळू नये?
जगभरात चहावर झालेली बहुतांश संशोधनं ही Camellia sinensis या वनस्पतींच्या पानांपासून बिनदुधाच्या ब्लॅक किंवा ग्रीन टीवर झालेली आहेत. मात्र भारतात चहा दूध, साखर आणि मसाले घालून चांगला उकळवून प्यायला जातो. ICMR-NIN (NATIONAL INSTITUTE OF NUTRITION) यांच्या अभ्यासातून असं आढळलं आहे की, दूध आणि चहा एकत्र उकळल्याने दुधातील ‘केसिन’ (casein) हे प्रथिन चहातील ‘कॅटेचिन्स’शी संयोग पावते. त्यामुळे चहामधील नैसर्गिक औषधी घटकांचं प्रमाण आणि ते शरीरात शोषलं जाण्याची क्षमता काही प्रमाणात कमी होते.
चहाचे फायदे:
‘Tea and Health: Studies in Humans’ या डॉ. नघमा खान आणि डॉ. हसन मुख्तार, यांनी लिहिलेल्या या शोधनिबंधात संशोधकांनी चहाच्या रासायनिक घटकांवर आणि मानवी शरीरावर होणाऱ्या त्याच्या सकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकला आहे:
- अँटीऑक्सिडंट्सचा साठा (polyphenols and catechins) : पॉलिफेनॉल्स हे वनस्पतींमधलं नैसर्गिक पौष्टिक संयुग असतं आणि कॅटेचिन्ससुद्धा पॉलिफेनॉल्सप्रमाणेच अँटीऑक्सिडंट आहे. हे दोन्ही घटक आपल्या शरीरातल्या पेशींना सुरक्षित ठेवतात. ग्रीन टी आणि ब्लॅक टीमध्ये पॉलिफेनॉल्सचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. ग्रीन टीमध्ये EGCG (Epigallocatechin-3-gallate) हा प्रमुख कॅटेचिन असतो; तर ब्लॅक टीमध्ये ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे तयार होणारे थियाफ्लॅव्हिन्स (Theaflavins) आणि थियारुबिजिन (Thearubigins) असतात.
- कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म: संशोधनानुसार, चहामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे ‘ऑक्सिडेटिव्ह डॅमेज’पासून संरक्षण करतात. अनेक क्लिनिकल आणि एपिडिमियोलॉजिकल अभ्यासांत असं आढळून आलं आहे की, चहाचं नियमित सेवन त्वचेचा कर्करोग (Squamous cell carcinoma), फुप्फुसाचा कर्करोग, प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास सहायक ठरू शकतं.
- हृदय व रक्तवाहिन्यांचं आरोग्य : चहामधील फ्लेवोनॉइड्स रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याची प्रक्रिया (Atherosclerosis) रोखण्यास आणि कोरोनरी हृदयरोग (Coronary Heart Disease) टाळण्यास मदत होते.
- चयापचय आणि मधुमेह नियंत्रण : चहा शरीराच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास (Antidiabetic effects) आणि वृद्धत्वविरोधी (Anti-aging) प्रक्रियेस हातभार लावतो.
चहाचे दुष्परिणाम:
जेवणानंतर लगेच चहा का पिऊ नये?
चहामध्ये टॅनिन्स (Tannins) मोठ्या प्रमाणात असतात. हे टॅनिन्स आपण खाल्लेल्या अन्नातील लोहाशी (विशेषतः वनस्पतीजन्य / शाकाहारी नॉन-हीम लोहाशी) संयोग पावतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये लोह शोषले जात नाही.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होतं?
सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही फक्त चहा प्यायलात, तर चहातील टॅनिन्स पोटाच्या आतील आवरणाला उत्तेजित करतात. त्यामुळे चहा प्यायल्यानंतर सतत घशाशी येणं, मळमळणं पोटात दुखायला लागणं हे प्रकार होतात. थोडक्यात रिकाम्या पोटी चहा घेतल्यास ॲसिडिटी वाढते, ज्यामुळे हे सगळे त्रास सुरू होतात.
झोपेच्या वेळापत्रकात अनियमितता: चहामध्ये कॅफिन असतं का?
हो, चहामध्ये कॅफिन असतं. कॅफिन म्हणजे असं द्रव्य जे मज्जासंस्थेला उत्तेजित करतं, त्यामुळे चहा किंवा कॉफीसारखं पेय घेतल्यास तुमची काम करण्याची ऊर्जा वाढते आणि झोप उडून जाते. शरीरात तयार होणारं मेलॅटोनिन हे संप्रेरक झोप येण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे जर तुम्ही झोपेच्या वेळेदरम्यान कॅफिनयुक्त पेय प्यायलात, तर तुम्हाला झोप लागत नाही; पण कामाच्या वेळी जेव्हा कॅफिनचा परिणाम घटतो तेव्हा डुलकी लागते.
अस्वस्थता आणि व्यसन: कॅफिनसारखं द्रव्य जे तुमच्या मज्जासंस्थेला उत्तेजित करतं, त्याचं जर तुम्ही प्रमाणापलीकडे सेवन करीत असाल, तर चिडचिड होणं, हात-पाय थरथरणं, हृदयाचे ठोके अचानक वाढणं, बीपी अनियंत्रित होणं असे अपायकारक परिणाम होऊ शकतात.
चक्कर येणं: जास्त प्रमाणात कॅफिनचं सेवन केल्यानं (किंवा कॅफिन सोडल्यानंतरच्या विड्रॉलमुळे) रक्तदाबावर परिणाम होऊन व्यक्तीला चक्कर किंवा हलकेपणा जाणवू शकतो.
गरोदरपणातील धोके: अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्स (ACOG) नुसार गरोदरपणात दररोज २०० मिग्रॅपेक्षा कमी कॅफिन सुरक्षित मानलं जातं. प्रमाणाबाहेर चहा प्यायल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम होणं किंवा जन्माच्या वेळी वजन कमी असण्याचा धोका संभवतो.
वारंवार लघवीला होणं: ‘चहा प्यायल्यानं शरीरात तरतरी आली, मग आता पाण्याची काय गरज,’ असा विचार जर तुम्ही करत असाल, तर तो तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. अति लघवी होत असल्यानं शरीरातलं पाणी कमी होतं, ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास सुरू होतो. त्यामुळे पाणी पिणं हे चहा पिण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे.
रोज किती कप चहा प्यावा?
चहा पिण्याचे शरीरावर एवढे सारे दुष्परिणाम होणार असतील, तर चहा सोडून देणंच योग्य पर्याय आहे का?
चहा सोडून देणं हा काही या समस्येवरचा उपाय नाही. मात्र, शरीराची काहीही हानी होऊ नये यासाठी चहा पिण्यावर नियंत्रण ठेवण्याजोग्या बाबी खालीलप्रमाणे:
- मर्यादित प्रमाण : जर ॲसिडिटी किंवा निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर दिवसातून दोन-तीन लहान कपांपेक्षा ( दोन वेळा मगभर चहा घेऊन चहाचं प्रमाण कमी करणार असाल, तर ते काही उपयोगाचं नाही) जास्त चहा पिऊ नये.
- रिकाम्या पोटी चहा टाळा : सकाळी उठल्या उठल्या शरीराला तरतरी यावी म्हणून नुसता चहा पिणं टाळा. चहासोबत निदान दोन-तीन खारी, टोस्ट किंवा सरळ नाश्ता करा म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही.
- जेवण आणि चहामध्ये अंतर : जेवणातील लोह शरीराला योग्य प्रकारे मिळावं म्हणून चहा आणि जेवणाच्या वेळांमधलं अंतर पाळा. संध्याकाळी ७ वाजता ऑफिसवरून थकून आलो आणि चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून ७ वाजता चहा घेऊन ८ वाजता जेवायला बसू नका. त्यामुळे शरीराला जेवणातून मिळणारे लोह मिळणार नाही.
- ६-७ वाजताचा चहा टाळा : संध्याकाळी ६-७ वाजता चहा पिणं टाळा. या वेळेत जर तुम्ही चहा किंवा कोणतंही कॅफिनयुक्त पेय प्यायलात, तर झोपेचं चक्र बिघडेल.
चहा हा बहुतांश लोकांच्या आवडीचा विषय आहे. ती आवड जोपासणं आपल्या हातात आहे; मात्र त्या आवडीचं रूपांतर व्यसनात झालं, तर ते आपल्या शरीराला घातक ठरेल.
