Heart disease in 30s and 40s: जगभरात आणि भारतातदेखील आजही सर्वाधिक मृत्यूचे पहिले कारण हृदयविकारच आहे. हे वास्तव धक्कादायक असले, तरी त्याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे अनेकांना याची जाणीवच नसते. कॅन्सर, अपघात किंवा संसर्गजन्य आजारांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते; मात्र हृदयविकार हा हळूहळू वाढणारा आजार असल्याने तो अनेकदा दुर्लक्षित राहतो. लक्षणे उशिरा दिसतात आणि तोपर्यंत आजार बराच पुढे गेलेला असतो.
भारतात तर हे चित्र आणखी गंभीर होत चालले आहे. हृदयविकार आता केवळ वृद्धांचा आजार राहिलेला नाही. पूर्वी ६० वर्षांनंतर दिसणारा हा आजार आज ३०-४० वयोगटातील तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. जीवनशैलीत झालेले बदल, दीर्घकाळ बसून काम करणे, अपुरी झोप, सततचा मानसिक ताण, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव या सगळ्यांचा एकत्रित परिणाम हृदयावर लवकर होऊ लागला आहे. विशेषतः भारतीयांमध्ये पोटाभोवती साचणारी चरबी आणि मेटाबॉलिक असमतोल यामुळे धोका अजून वाढतो. त्यामुळे “मी अजून तरुण आहे” किंवा “मला काही होत नाही” अशी भावना आज हृदयविकाराच्या बाबतीत धोकादायक ठरू लागली आहे.

रोग क्वचितच एका रात्रीत उद्भवतो. बहुतांश वेळा तो रोजच्या छोट्या-छोट्या सवयींचा परिणाम असतो. या सवयी इतक्या नेहमीच्या असतात की, आपण त्याकडे लक्षही देत नाही. पण वर्षानुवर्षे त्या सवयींचा एकत्रित परिणाम होत कोणतीही ठळक लक्षणे दिसण्याआधीच शरीराच्या आत खोलवर बदल होत राहतो. आपत्कालीन घटना आपल्याला हादरवतात, मात्र आजाराचा खरा धोका हा अशा हळूहळू घडणाऱ्या प्रक्रियांमध्ये दडलेला असतो. हे वास्तव विशेषतः हृदयविकारांच्या बाबतीत अधिक ठळकपणे दिसून येते. कारण हृदयविकार हा अचानक होणारा आजार नसून, तो बहुतेक वेळा दीर्घकाळ शांतपणे वाढत राहिलेला आजार असतो. अधूनमधून व्यायाम केला किंवा एखाद्या तपासणीत रिपोर्ट ‘नॉर्मल’ आला तर एवढ्यावर हृदय सुरक्षित राहत नाही. इथे खरी कसोटी असते ती रोजच्या सवयींची.
याच मुद्द्याकडे लक्ष वेधणारा अनुभव सांगत २० वर्षांहून अधिक काळ हृदयरोगावर उपचार करणाऱ्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ संजय भोजराज यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना काही बाबींकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, जगभरात आजही मृत्यूचे क्रमांक एकचे कारण हृदयविकारच आहे आणि हे वास्तव अनेकांना माहीतच नसते.
कागदावर निरोगी असणं पुरेसं नसतं
डॉ. भोजराज सांगतात की, वैद्यकीय तपासण्यांमध्ये सर्व काही ठीक दिसत असतानाही अनेक लोक पुढे जाऊन हृदयविकाराने आजारी पडतात. कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर, बीपी हे आकडे ‘मर्यादेत’ असले तरी शरीराच्या आत घडणाऱ्या सूक्ष्म प्रक्रियांकडे दुर्लक्ष होते. ते स्वतःचा अनुभव सांगतात… , सुरुवातीच्या काळात तेही इतर डॉक्टरांप्रमाणेच काम करत होते. मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार आणि रिपोर्ट ठीक आहेत म्हणजे रुग्ण सुरक्षित आहे असे समजत होते. पण जेव्हा सर्व नियम पाळणारे रुग्णसुद्धा हृदयविकाराने त्रस्त होऊ लागले, तेव्हा या दृष्टिकोनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांना उमगले की, मृत्यूचे प्रमुख कारण क्वचितच एखादी अचानक आपत्ती असते. बहुतेक वेळा कोणताही मोठा इशारा न देता हृदयविकार शांतपणे वाढत राहतो.
मग प्रतिबंध कुठून सुरू होतो?
डॉ. भोजराज यांच्या मते, हृदयविकाराचा प्रतिबंध हा मोठ्या, टोकाच्या उपायांपासून सुरू होत नाही, तर अगदी मूलभूत दैनंदिन सवयींपासून सुरू होतो. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात आणि वैद्यकीय सरावात तीन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
१) झोप- दुर्लक्षित पण निर्णायक घटक
दररोज किमान सात तासांची दर्जेदार झोप घेणे हे हृदयासाठी अत्यंत आवश्यक आहे. अपुरी झोप सतत राहिल्यास रक्तदाब वाढलेला राहतो, शरीरात दाह वाढतो आणि तणावाशी संबंधित हार्मोन्स नियंत्रणाबाहेर जातात. हे सगळे घटक हळूहळू हृदयावर अतिरिक्त ताण टाकतात. झोप ही विश्रांती नाही, तर हृदयाच्या दुरुस्तीची प्रक्रिया आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
२) हालचाल- हृदय हा स्नायू आहे
नियमित हालचाल किंवा व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठी नसतो. हृदय हे एक स्नायू असल्यामुळे त्यालाही नियमित वापराची गरज असते. बसून राहण्याची जीवनशैली हृदयाला कमकुवत बनवते. रोज चालणे, हलका व्यायाम, शरीर सक्रिय ठेवणे या सवयी दीर्घकाळात हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात.
३) मेटाबॉलिक आरोग्य; आतून होणारे नुकसान
मेटाबॉलिक आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. विशेषतः इन्सुलिन रेसिस्टन्स ही अशी अवस्था आहे जी लक्षणे दिसण्याआधीच रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असते. म्हणूनच केवळ साखर किंवा कोलेस्ट्रॉलच्या आकड्यांवर न थांबता शरीर एकूण कसे प्रतिसाद देत आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आकड्यांपेक्षा अनुभूती महत्त्वाची
डॉ. भोजराज ठामपणे सांगतात की, आरोग्य हे फक्त लॅब रिपोर्टमध्ये मोजता येत नाही. तुम्हाला रोज कसं वाटतं, ऊर्जा आहे की थकवा, मनात स्पष्टता आहे की अस्पष्ट असं बरंच काही, शरीर मजबूत वाटतं की जड हे खरे संकेत असतात. याच जाणिवेने त्यांची वैद्यकीय पद्धत बदलली. टोकाच्या उपायांऐवजी त्यांनी मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. आज ते रुग्णांना फक्त रिपोर्ट सुधारायला नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यात अधिक सक्षम, ऊर्जावान आणि मजबूत करायला मदत करतात.
हृदयविकार टाळायचा असेल, तर मोठा धक्का बसण्याची वाट पाहू नका. बदलाची सुरुवात रोजच्या साध्या सवयींपासूनच होते आणि तीच सुरुवात सर्वात प्रभावी ठरते.
काही महत्त्वाचे प्रश्न (FAQs):
प्रश्न: माझे कोलेस्ट्रॉल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरीही मला धोका आहे का? उत्तर: हो. अनेकदा केवळ कोलेस्ट्रॉल नॉर्मल असून चालत नाही; रक्तवाहिन्यांची लवचिकता आणि शरीरातील अंतर्गत सूज (Inflammation) तपासणे गरजेचे असते.
प्रश्न: हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे काय असतात? उत्तर: जिने चढताना धाप लागणे, सतत थकवा जाणवणे, छातीत जडपणा किंवा अपचनाचा वारंवार त्रास होणे ही प्राथमिक लक्षणे असू शकतात.
प्रश्न: वयाची ४० ओलांडल्यानंतर कोणत्या चाचण्या कराव्यात? उत्तर: लिपिड प्रोफाईलसोबतच, HbA1c (साखर), ब्लड प्रेशर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'कॅल्शियम स्कोअरिंग' किंवा 'TMT' चाचणी करावी.

