Heart attack cases rising गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हृदयविकाराचा धोका केवळ वयस्करांनाच नाही, तर तरुणांनाही आहे. कामाचा तणाव आणि अपुरी झोप यांसारख्या आधुनिक जीवनशैलीच्या सततच्या ताणामुळे हे घडत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. भारतात हृदयविकार हा सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, पाश्चात्य देशांतील लोकांच्या तुलनेत भारतीयांना हृदयविकार सुमारे दहा वर्षे आधीच जडण्याची शक्यता असते. यामागील कारणे काय? धोका टाळण्यासाठी डॉक्टर स्वतः काय करतात? जाणून घेऊयात…
दैनंदिन सवयींचा हृदयावर होणारा परिणाम
हृदयविकाराची सुरुवात थेट हार्ट अटॅकने होत नाही. कामाच्या वेळा, मधुमेह, धूम्रपान, अपुरी झोप आणि वैद्यकीय तपासणी लांबणीवर टाकणे या गोष्टी दररोज हृदयावर ताण निर्माण करतात. भुवनेश्वर येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. बिस्व रंजन जेना यांनी स्पष्ट केले की, झोपेचा अभाव, अनियंत्रित ताण, अस्वच्छ आहार, व्यायामाचा अभाव आणि तंबाखूचे सेवन यामुळे हृदयाचे हळूहळू नुकसान होते. लखनौ येथील टेंडर पाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. गौतम स्वरूप यांनी नमूद केले की, हे धोके आता तरुणांमध्ये आणि अगदी मुलांमध्येही दिसून येत आहेत.
सोलापूरच्या अपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार डॉ. रिझवान उल हक यांनी सांगितले की, सुरुवातीच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते किंवा ती ॲसिडिटी किंवा थकवा असल्याचे समजून चुकीचा अर्थ काढला जातो आणि त्यामुळे उपचारांना धोकादायक विलंब होतो. औषधे घेण्याइतकेच रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी माहीत असणे महत्त्वाचे आहे. दररोज चालणे, योगासने किंवा श्वसनाचे व्यायाम आणि संतुलित आहार यांसारख्या साध्या सवयी हृदयाच्या आरोग्याचे दीर्घकाळ संरक्षण करतात, असेही तज्ज्ञ सांगतात.
वयानुसार हृदयाची काळजी कशी घ्यावी?
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांनी हृदयाच्या काळजी कशी घ्यावी, यासाठी काही दैनंदिन सवयी सांगितल्या आहेत. तसेच, ते स्वतःच निरोगी हृदयासाठी काय करतात, हेदेखील सांगितले आहे.
- ४० वर्षांखालील व्यक्तींसाठी : नियमित घरातील व्यायाम सुरू ठेवा, भरपूर पाणी प्या (थंडीत तहान कमी लागते) आणि अचानक थंडीच्या संपर्कात येणे टाळा.
- ४० ते ६० वयोगटासाठी : रक्तदाबावर लक्ष ठेवा, मद्यपान आणि तळलेले पदार्थ मर्यादित करा आणि हायड्रेट राहा.
- ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी : जिममधील व्यायाम टाळा, फ्ल्यू लस टोचून घ्या आणि छातीत दुखत असल्यास त्वरित उपचार घ्या. एकूणच, नियमित हलका, पौष्टिक आहार घेण्यावर भर द्या आणि रात्री उशिरा जास्त जेवण करणे टाळा.
निरोगी हृदयासाठी डॉक्टर स्वतः काय करतात?
१. दररोज ३० ते ४५ मिनिटे एरोबिक व्यायाम आणि एक दिवसाआड वेट ट्रेनिंग.
२. तणाव कमी करण्यासाठी दररोज योगासने.
३. प्रामुख्याने वनस्पती-आधारित आहार, प्रथिनांसाठी अंडी (पांढरा भाग) आणि मासे.
४. प्रक्रिया केलेले, पॅक केलेले पदार्थ किंवा मिठाई टाळणे.
५. ७ तासांची झोप आणि त्याआधी योगनिद्रा.
धोक्यात असलेली तरुण पिढी
हृदयविकार आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तिरुवनंतपुरम येथील पीआरएस हॉस्पिटलचे डॉ. टाइनी नायर यांनी स्पष्ट केले की, जास्त स्क्रीन टाईम, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मुलांमधील आणि किशोरावस्थेतील मुलांमधील हृदयाचा धोका वाढत आहे. ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. के. ए. सांबशिवम यांनी लवकर उद्भवणारा मधुमेह, लठ्ठपणा आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत असल्याचे सांगितले.
गुंटूर येथील कारुमुरी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. कारुमुरी श्रीनिवास रेड्डी यांनी अधोरेखित केले की, लहान वयात लागलेल्या सवयी अनेकदा प्रौढपणीच्या हृदयाचे आरोग्य ठरवतात. मैदानी खेळांचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन आणि झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे, असेही ते सांगतात. घरात आणि शाळांमध्ये जीवनशैलीविषयक शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हृदयविकाराच्या वाढत्या घटना
भारतातील हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग किंवा हृदयरोग ही देशापुढील मोठ्या सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. जगात हृदयरोगामुळे २.०५ कोटी लोकांचे मृत्यू होतात आणि बहुतांश मृत्यू भारतात होतात. या मृत्यूंचा परिणाम केवळ कुटुंबांवरच होत नाही, तर त्यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचेदेखील (GDP) नुकसान होते. हृदयरोग आनुवंशिक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, हृदयविकाराचा झटका येण्यावर अनेक घटकांचा प्रभाव असतो. भारतीय लोकांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण, वाढता लठ्ठपणा, एचडीएल-कोलेस्ट्रॉल (चांगले कोलेस्ट्रॉल)चे कमी प्रमाण आदी बाबी यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
हृदयविकाराचा धोका आनुवंशिक आहे की जीवनशैलीशी संबंधित?
भारतीय आहारात शुद्ध (रीफाईन) कर्बोदके, साखर आणि ट्रान्स फॅट्स जास्त प्रमाणात असतात; तर फळे, भाज्या व सुक्या मेव्याचे सेवन कमी प्रमाणात केले जाते. शहरांमध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नाचे (प्रोसेस्ड फुड्स) सेवन जास्त प्रमाणात केले जाते, त्यामुळेच बहुतांश लोकांच्या शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढत आहे. मिठाचे सेवनही शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. या आहार पद्धतीमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह वाढत आहे, विशेषतः तरुणांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे.
दरम्यान, भारतात वायुप्रदूषण जागतिक सरासरीपेक्षा तिपटीने जास्त आहे, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका आणखी वाढतो आहे. कामाचे जास्त तास, ताण व अपुरी झोप ही समस्या अधिक वाढवतात, विशेषतः शहरी भागात. त्यामुळे हृदयरोग केवळ आनुवंशिक नसून, या वाढत्या प्रमाणासाठी जीवनशैलीही कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे.

