ApoB test for heart attack prevention research: हार्ट अटॅकच्या बातम्या सध्या रोजच्याच झाल्या आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर हसत खेळत असणारी व्यक्ती काही सेकंदात खेळणं बंद पडतं त्याचप्रमाणे स्तब्ध होते. अनेक प्रकरणांमध्ये पुढील वैद्यकीय उपचारांसाठीही वेळ मिळत नाही. त्यामुळे हृदयविकार हा आजच्या आधुनिक जीवनशैलीने आपल्यासाठी निर्माण केलेला मोठा शत्रूच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

वैद्यकीय क्षेत्रात रक्तातील ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ (LDL) मोजून हृदयविकाराच्या धोक्याचा अंदाज लावण्याला प्राधान्य देण्यात येत होते. मात्र, LDL कोलेस्ट्रॉल चाचणी फक्त हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक रोखण्यासाठी पुरेशी नाही, असा निष्कर्ष अमेरिकेतील ‘नार्थवेस्टर्न मेडिसिन’ (Northwestern Medicine) संस्थेने त्यांच्या संशोधनात मांडला आहे. त्याबरोबरीने एका अधिक प्रभावी चाचणीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले आहे. ती चाचणी कोणती आणि का महत्त्वाची त्याचाच घेतलेला हा आढावा.

अमेरिकेतील ‘नार्थवेस्टर्न मेडिसिन’ (Northwestern Medicine) संस्थेने ‘अपोलिपोप्रोटीन बी’ (Apolipoprotein B – apoB) ही चाचणी अधिक अचूक, प्रभावी आणि किफायतशीर असल्याचा निष्कर्ष आपल्या संशोधनात काढला आहे. सुप्रसिद्ध ‘जामा’ (JAMA) या वैद्यकीय जर्नलमधून हे संशोधन Cost-Effectiveness of ApoB, Non–HDL-C, and LDL-C Goals for Primary Prevention Lipid-Lowering Therapy या शोधनिबंधाच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे संशोधन प्रत्यक्ष रुग्णांवरील क्लिनिकल ट्रायल नसून संगणकीय सिम्युलेशनवर आधारित आहे.

काय आहे हे नवे संशोधन?

लाखो लोक दरवर्षी रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासण्यासाठी ‘लिपिड प्रोफाइल’ चाचणी करतात. यात प्रामुख्याने LDL (Low-Density Lipoprotein) मोजले जाते. परंतु, संशोधकांचे म्हणणे आहे की, केवळ रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मोजण्यापेक्षा, रक्तातील हानिकारक कणांची संख्या मोजणे अधिक महत्त्वाचे आहे, हे काम ‘apoB’ चाचणी करते.

संशोधनाचे सहलेखक डॉ. सियारान कोहली-लिंच (Ciaran Kohli-Lynch) सांगतात, “आम्हाला असे आढळले आहे की, जर कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे (Statins) सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा डोस वाढवण्यासाठी apoB चाचणीचा आधार घेतला, तर सध्याच्या पद्धतीपेक्षा अधिक प्रभावीपणे हृदयविकाराचे झटके आणि स्ट्रोक रोखण्यास मदत होवू शकते.” विशेष म्हणजे, ही पद्धत आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त आर्थिक ताण न टाकता अधिक चांगले परिणाम देणारी आहे. डॉ. कोहली-लिंच हे नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या (Northwestern University) फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.

LDL विरुद्ध ApoB: फरक काय?

गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर उपचार ठरवण्यासाठी ‘LDL’ आणि ‘Non-HDL’ या दोन मापदंडांवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, हे मापदंड रुग्णाला किती धोका आहे याचे पूर्ण चित्र स्पष्ट करत नाहीत. डॉ. कोहली-लिंच स्पष्ट करतात की, “संशोधन असे दर्शवते की, apoB हे हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी अधिक चांगले साधन आहे. कारण, ते धमन्यांमध्ये अडथळे (Plaques) निर्माण करू शकणार्‍या रक्तातील सर्व हानिकारक कणांची एकूण संख्या मोजते.” हे सूक्ष्म कण धमन्यांच्या भिंतींमध्ये अडकल्यानंतर कालांतराने रक्तप्रवाह खंडित होतो आणि त्याचे रूपांतर हार्ट अटॅकमध्ये होते.

संशोधनाची कार्यपद्धती आणि निष्कर्ष

या अभ्यासासाठी नार्थवेस्टर्नच्या शास्त्रज्ञांनी एका मोठ्या संगणकीय सिम्युलेशन मॉडेलचा वापर केला. यामध्ये २.५ लाख अमेरिकन प्रौढांचा डेटा घेऊन त्याचे विश्लेषण करण्यात आले. जे स्टॅटिन (Statins) औषधे घेण्यास पात्र होते परंतु त्यांना अद्याप कोणताही हृदयविकार झाला नव्हता, अशा रुग्णांची निवड करण्यात आली होती.

नॉर्थवेस्टर्न मेडिसिनच्या संशोधकांनी एका प्रगत संगणकीय सिम्युलेशन मॉडेलद्वारे उपचारांच्या तीन भिन्न पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला. या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट हे होते की, कोलेस्ट्रॉलचे कोणते मानक (Marker) गृहीत धरून उपचार वाढवले असता रुग्ण सर्वाधिक सुरक्षित राहू शकतो.

या प्रयोगासाठी त्यांनी तीन स्वतंत्र गट तयार केले होते: पहिल्या गटात LDL पातळी 100 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष्य ठेवले, दुसऱ्या गटात Non-HDL पातळी 118 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले, तर तिसऱ्या गटात ApoB ची पातळी 78.7 mg/dL पेक्षा कमी राखण्याचे धोरण स्वीकारले. जर एखाद्या रुग्णाची कोलेस्ट्रॉल पातळी या ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आढळली, तर उपचारांची तीव्रता वाढवण्यात आली. ज्यामध्ये ‘स्टॅटिन’ (Statin) या औषधाचा डोस वाढवणे किंवा ‘ईझेटिमिब’ (Ezetimibe) सारखे दुसरे औषध वापरणे अशा पर्यायांचा समावेश होता.

या सर्वसमावेशक सिम्युलेशन अभ्यासाअंती असे निष्कर्ष समोर आले की, ज्यावेळी डॉक्टरांनी ApoB ला मुख्य लक्ष्य मानून उपचार पद्धतीत बदल केले, त्यावेळी हृदयविकाराचे झटके आणि स्ट्रोकचे प्रमाण इतर दोन पद्धतींच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाले. यावरून हे सिद्ध झाले की, ApoB आधारित उपचार पद्धतीमुळे रुग्ण केवळ जास्त काळ जगू शकत नाहीत, तर ते अधिक चांगल्या आरोग्यस्थितीत आपले जीवन व्यतीत करू शकतात.

ApoB चाचणी का दुर्लक्षित राहिली?

इतके भक्कम पुरावे असूनही, नियमित आरोग्य तपासणीत apoB चा वापर का केला जात नाही? याचे मुख्य कारण म्हणजे खर्च आणि सोय असे संशोधक सांगतात. सामान्यतः नेहमीच्या लिपिड प्रोफाइलमध्ये ही चाचणी समाविष्ट नसते, त्यासाठी स्वतंत्र रक्त चाचणी करावी लागते. मात्र, या अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे की, सुरुवातीला थोडा अधिक खर्च झाला तरी, भविष्यात होणाऱ्या हार्ट अटॅकवरील उपचारांचा प्रचंड खर्च पाहता ही चाचणी अधिक फायदेशीर (Cost-effective) ठरते.

तरुण पिढीसाठी महत्त्वाची बातमी

अमेरिकन हार्ट असोसिएशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता कमी वयातच कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपचार सुरू करण्याची शिफारस केली जात आहे. डॉ. कोहली-लिंच म्हणतात, “यामुळे हे अधिक महत्त्वाचे झाले आहे की, नेमक्या कोणत्या रुग्णाला अधिक उपचारांची गरज आहे, हे अचूकपणे ओळखण्यासाठी ApoB महत्त्वाची भूमिका बजावू शकते.”

भारतासाठी सर्वाधिक फायदेशीर?

संशोधनात सहभागी असलेले हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जॉन विल्किन्स आणि डॉ. सॅम्युअल लुएबे यांच्या मते, ही चाचणी वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकते. भारतासारख्या देशात, जिथे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे, तिथे अशा अचूक चाचण्यांमुळे वेळेत निदान होण्यास मदत होईल. apoB विशेषतः type 2 diabetes, high triglycerides, cardiovascular-kidney-metabolic syndrome, known CVD अशा गटांत residual risk समजण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

जर तुमच्या कुटुंबामध्ये मधुमेहाचा (Diabetes) इतिहास असेल, रक्तातील ट्रायग्लिसराइड्स (Triglycerides) सतत जास्त राहत असतील किंवा तुम्हाला मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर्स (Metabolic risk factors) यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असतील, तर केवळ साधी कोलेस्ट्रॉल चाचणी पुरेशी ठरणार नाही. अशा परिस्थितीत, हृदयविकाराचा संभाव्य धोका अधिक अचूकपणे ओळखण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी ‘ApoB’ चाचणीबद्दल चर्चा करणे अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त ठरू शकते.

एकूणच, ApoB ही चाचणी काही रुग्णांत LDL-C पेक्षा हृदयविकाराचा धोका अधिक अचूकपणे मोजण्यास मदत करू शकते. नव्या JAMA simulation अभ्यासात ती कमीत कमी खर्चात उत्तम निदान करणारी चाचणी म्हणून पुढे आली असली, तरी LDL-C अजूनही मुख्य कलिनिकल मार्कर आहे आणि ApoB सध्या निवडक रुग्णांमध्ये अतिरिक्त रिस्क मॅनेजमेंटसाठी अधिक उपयुक्त मानली जात आहे. म्हणूनच, हृदयविकाराच्या लढाईत आता केवळ ‘कोलेस्ट्रॉल’ मोजणे पुरेसे नाही, तर ते वाहून नेणाऱ्या कणांचा हिशोब ठेवणे हीच काळाची गरज झाली आहे.